वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जागतिक पातळीवर मंदीसदृश परिस्थिती आणि कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय) आव्हानानंतरही आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी विप्रो शेअर बायबॅकचा विचार करत आहे. विप्रोने समभाग पुर्नखरेदी (बायबॅक) करण्याची योजना आखत आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या १५ आणि १६ एप्रिलच्या नियोजित बैठकीत समभाग पुनर्खरेदीचा प्रस्ताव चर्चेला घेतला जाणार आहे.
विप्रोकडून शेअर बायबॅकच्या पर्यायाचा विचार करण्याची ही गेल्या तीन वर्षांतील पहिलीच वेळ असेल. यापूर्वी जून २०२३ मध्ये १२,००० कोटी रुपयांचे समभाग पुर्नखरेदी करण्यात आले होते. विप्रोने २२ जून ते ३० जून २०२३ या कालावधीत १२,००० कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. यामध्ये कंपनीने ४४५ रुपये प्रति शेअर या दराने २६.९६ कोटी समभाग खरेदी केले.
समभाग पुर्नखरेदी हा भागधारकांना भांडवल परत करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. विप्रोकडून मागील काही वर्षांत सलगपणे भागधारकांना या पद्धतीतून लाभ दिला गेला आहे. विप्रोने आतापर्यंत पाचवेळा समभाग पुनर्खरेदी योजना राबवली होती. ‘सेबी’च्या नियमानुसार, कोणत्याही कंपनीला समभाग पुनर्खरेदी ही १२ महिन्यांमध्ये एकदाच करता येते. विप्रोने यापूर्वी जून २०२३, त्याआधी ऑक्टोबर २०२१ मध्ये समभाग पुनर्खरेदी प्रक्रिया राबविली होती. त्यामुळे या नव्या पुनर्खरेदीचा कंपनीचा मार्ग खुला झाला आहे.
भागधारकांना लाभाचे दान
‘बायबॅक’ वर्ष २०१६ २०१७ २०१९ २०२१ २०२३
आकारमान (रु. कोटी) २,५०० ११,००० १०,५०० ९,५०० १२,०००
प्रति समभाग किंमत (रु.) ६२५ ३२० ३२५ ४०० ४४५
अधिमूल्य % ४ १९ ३३ – १९
