Yes Bank Forex Card Fraud 2026: येस बँकेने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी ५,००० ग्राहकांच्या ‘मल्टी-करन्सी प्रीपेड फॉरेक्स कार्ड’चा वापर करून ०.२८ दशलक्ष डॉलर्स (२.५५ कोटी रुपये) किमतीचे अनधिकृत व्यवहार केले आहेत. ही कार्डे BookMyForex.com सोबतच्या भागीदारीत जारी करण्यात आली होती.

बँकेने म्हटले आहे की, एका लॅटिन अमेरिकन देशामध्ये रातोरात झालेल्या व्यवहारांमध्ये असामान्य वाढ दिसून आली, यामुळे बँकेच्या फसवणूक देखरेख प्रणालीने हे व्यवहार फेटाळून लावल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

“हे अनधिकृत व्यवहार केवळ विशिष्ट बँक आयडेंटिफिकेशन नंबरवर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता”, असे बँकेने एका निवेदनात म्हटले आहे.

येस बँकेने सांगितले की, “हे फसवणुकीचे व्यवहार लॅटिन अमेरिकन देशातील १५ व्यापाऱ्यांच्या माध्यमातून, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ३:३० ते ८:३० या दरम्यान करण्यात आले. संबंधित देशामध्ये ई-कॉमर्स व्यवहारांसाठी ‘टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन’ अनिवार्य नाही.”

“सुरक्षेचा उपाय म्हणून, बँकेने त्यानंतर त्या विशिष्ट लॅटिन अमेरिकन देशातील ई-कॉमर्स व्यवहार प्रतिबंधित केले आहेत”, असेही बँकेने पुढे नमूद केले.

बँकेच्या अंतर्गत तपासात असे दिसून आले आहे की, “या घटनेच्या काळात ५,००० ग्राहकांच्या वतीने अंदाजे ०.२८ दशलक्ष डॉलर्स (२.५५ कोटी रुपये) किमतीच्या व्यवहारांना मंजुरी मिळाली होती.”

बँकेने पुढे सांगितले की, “बँकेच्या देखरेख आणि नियंत्रण यंत्रणेमुळे ६८८ अनधिकृत व्यवहारांचे प्रयत्न फेटाळले गेले, ज्यामुळे अंदाजे ०.१ दशलक्ष डॉलर्स (९१ लाख रुपये) वाचवण्यात यश आले आहे.”

बँकेने म्हटले आहे की, पीडित ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी बँक कार्ड नेटवर्कसोबत मिळून चार्जबॅक प्रक्रियेवर काम करत आहे.

“बँक या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व संबंधित घटकांशी समन्वय साधत आहे”, असेही बँकेने नमूद केले.