डॉ. आशीष थत्ते
Zebra Telugu movie review :
तेलगू चित्रपट असला तरी याच नावाने ‘यू-ट्यूब’वर हिंदीमध्ये सुद्धा चित्रपट बघता येणार आहे. चित्रपट तब्बल १.७ कोटी लोकांनी बघितला आहे, म्हणजे हिंदीत ध्वनिमुद्रित केलेला असला तरी लोकांच्या पसंतीस उतरलेला आहे असे वाटते. बँकेत काम करणारा कर्मचारी म्हणजे त्याचे जीवन साधेसुधे असते किंवा जास्तीत जास्त थोडीसी फसवणूक करेल असे वाटते. साऊथ इंडियन सिनेमा असल्यामुळे अतिरंजित गोष्टी असणे काही नवल नाही पण तरीही बँकेच्या काही कार्यपद्धती सुद्धा त्यात आहेत. ऑनलाईन व्यवहार, बँकेवर दरोडा आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण अर्थात ‘एनसीएलटी’ सुद्धा त्यात घेतले आहे. बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तर नक्कीच हा सिनेमा बघितला पाहिजे.

कथेचे ठिकाण हैद्राबाद आहे आणि चित्रपटाच्या सुरुवातीच्या संवादात बँकेत लोक पैसे का ठेवतात ते सांगितले आहे आणि तो म्हणजे बँकिंग क्षेत्रावर असणारा सामान्यांचा भरवसा त्यामुळे सामान्य लोक आपला पैसा बँकेत ठेवतात आणि जिथे पैसा असतो तिथे चोरी होणे स्वाभाविक आहे. अभिनेता सत्यदेव म्हणजे सूर्या हा चित्रपटाचा नायक बँकेत ‘सेल्समन’ म्हणून नोकरी करत असतो आणि सामान्य जीवन जगत असतो. त्याचे आयुष्य बदलते जेव्हा त्याची मैत्रीण त्याला फोन करून सांगते की, तिच्या सहकाऱ्याने चार लाख रुपये चुकून दुसऱ्या खात्यामध्ये टाकले आणि तिने न बघताच ते स्वीकृत केले आणि ज्याच्या खात्यामध्ये पैसे गेले त्याने ते काढून देखील घेतले. आता जेव्हा त्याला फोन करून विचारणा केली तेव्हा त्याने सांगितले की, चूक तुमची आहे त्यामुळे मी पैसे द्यायला बांधिल नाही. अर्थात चित्रपट असल्याने पुढील कथा घडते पण रोजच्या जीवनात तुम्हाला अशा प्रसंगाला सामोरे जाऊ लागू शकते.

तुमच्या खात्यामध्ये जर असे पैसे जमा झाले तर ते खर्च करू नयेत कारण बँकेला ते पैसे परत घेण्याचा पूर्ण हक्क असतो. जर कुण्या ग्राहकाने ते खर्च केले आणि परत देण्यास नकार दिला तर बँक ग्राहकावर फौजदारी गुन्हा देखील दाखल करू शकते. तुमचे पैसे अशा पद्धतीने बँकेने दुसऱ्या कुणाच्या खात्यात जमा केले आणि परत द्यायला टाळाटाळ केली तर तुम्ही बँकेविरुद्ध तक्रार दाखल करू शकता आणि रिझर्व्ह बँकेच्या लोकपालाकडे सुद्धा तक्रार करू शकता. जे चित्रपटात दाखवले आहे ते सुद्धा महत्त्वाचे आहे आणि ते म्हणजे बँकेच्या कर्मचाऱ्यावर होणारा परिणाम. नायिका अतिशय घाबरलेली असते कारण या चुकीमुळे तिच्या कारकिर्दीवर वाईट परिणाम होणार असतो. पैसे दुसऱ्या खात्यात वर्ग करतानाची चूक मुद्दामून नसून नजरचुकीने झालेली असते. तरीही अशा वेळेला बँकेतील तुमचे ‘रेकॉर्ड’ मात्र खराब होतात.

हे पैसे परत मिळवण्यासाठी मग नायक बँकेच्या प्रणालीमधील पळवाटा शोधून ते ४ लाख रुपये परत त्याच ग्राहकाकडून परत मिळवतो, ज्याचे नाव बेनी असते. खरी कथा इथूनच सुरू होते. बेनीचा मुख्य उद्योग इतरांची फसवणूक करणे आणि काळा पैसा पांढरा करून देणारा एक गुमास्ता किंवा ‘एजन्ट’ म्हणून काम करणे असते. एका इतर मोठ्या व्यवहाराच्या रकमेतील ५ कोटी रुपये जे बेनीला राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणातील व्यवहारात लाच म्हणून द्यायचे असतात ते त्याचा खात्यामधून आता गायब होऊन नायकाच्या बनावट खात्यामध्ये येतात. तिथून सुद्धा ते कित्येक खात्यांमध्ये वर्ग करून गायब केले जातात. अर्थातच त्याचा आळ नायकावर येतो आणि त्याला ते पैसे परत देण्यास सांगितले जाते.

चित्रपट मग पुढे सरकतो तो अगदी साऊथ इंडियन सिनेमाप्रमाणे आणि बऱ्याच नाट्यमय घडामोडींनंतर नायक निर्दोष आहे, हे सगळ्यांना समजते. तेलगू चित्रपट असल्याने आपल्याला कुठलेच ओळखीचे चेहरे दिसत नाहीत. पण मला मात्र एक ओळखीचा चेहरा दिसला तो होता बाहुबली चित्रपटातील कटाप्पा म्हणजे सत्यराज ज्यांनी एक वेगळीच भूमिका या चित्रपटात साकारली आहे.

चित्रपटातील एका संवादात नामनिर्देशित व्यक्ती किंवा नॉमिनी नसल्यामुळे परदेशी खातेधारकांचे सुमारे ४० लाख रुपये बँकेच्या शाखेत असल्याचे आपल्या मित्राला सांगतो. ही रक्कम फक्त आपल्या शाखेची आहे आणि रिझर्व्ह बँकेत असे १२ हजार कोटी रुपये असल्याचे सुद्धा सांगतो. ११ ऑगस्ट २०२६ ला राज्यसभेतील एका उत्तरात ही रक्कम ९८ हजार कोटी असल्याचे सांगितले होते अर्थातच भारतीय आणि परदेशी खातेधारकांची मिळून असावी. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ही रक्कम अगदी सहज नायक आपल्या खात्यात वळवतो पण प्रत्यक्षात असे होत नाही. जुन्या खात्यात ज्यात १० वर्षे काहीही व्यवहार झाले नाहीत अशा खात्यांची रक्कम रिझर्व्ह बँकेत वर्ग केली जाते, ज्याला ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधी असे म्हणतात. तुमच्याही काही जवळच्या नातेवाईकांच्या अशा खात्याबद्दल माहित असेल तर तो रिझर्व्ह बँकेच्या उद्गम या संकेतस्थळावर त्यांचे नाव आणि बँकेचे नाव शोधू शकता.

चित्रपट अतिरंजित असला तरी बँकेतील व्यवहारातील कित्येक गोष्टी त्यात दाखवल्या आहेत म्हणूनच तो रंजक ठरतो. बँकिंग क्षेत्रातील त्रुटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केला जाणारा आर्थिक घोटाळा अतिशय रंजक पद्धतीने दाखवला आहे. चित्रपटाचे नाव मात्र ‘झेब्रा’ असे का ठेवले ते मला समजले नाही कदाचित काळा पैसा आणि पांढरा पैसा यात प्रतीत करत असावा. पण तुम्हाला समजले तर नक्की कळवा. चित्रपट ‘यूट्यूब’वर तुम्ही बघू शकता तो देखील हिंदीमध्ये तेव्हा नक्की बघा पण वित्तीय नजरेतून!