List of 10 Jobs that are safe from AI: एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जास्तीत जास्त वापरामुळे अनेक कामे कालबाह्य होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आयटी क्षेत्रात गेल्या काही काळापासून सुरू असलेली नोकरकपात याचेच द्योतक असल्याचे सांगितले जाते. एआयच्या वाढत्या वापरात कोणती कामे टिकणार आणि कोणती जाणार? याची चर्चा होत असताना भारतीय टेक अब्जाधीश श्रीधर वेम्बू यांनी आपले मत नोंदवले आहे. एआयच्या वाढत्या वापरातही काही कामे टिकून राहतील आणि चांगले पैसे मिळवून देतील, असे वेम्बू म्हणाले आहेत.
श्रीधर वेम्बू यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एक्स पोस्टनंतर त्या पोस्टखाली अनेकांनी विविध प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांना उत्तर देत असताना वेम्बू यांनी विविध कामांची यादी दिली आहे. तंत्रज्ञानाची प्रगती होत असली तरी मानवआधारित कामांना पर्याय नाही, असे वेम्बू म्हणाले.
आधुनिक युगात माणूस प्रगतीचे मापदंड कसे निश्चित करतो, यावरून बऱ्याच गोष्टी ठरणार असल्याचे वेम्बू म्हणाले. जर आर्थिक प्रगती आणि बौद्घिक संपदेला जर माणूस प्रतिष्ठा देत असेल तर एआय त्यांच्यासाठी मोठे संकट ठरू शकते. कारण बौद्धिक कामांना यंत्र चांगला पर्याय देऊ शकते. त्यामुळे अनेक व्हाईट कॉल कामांना एआय तंत्रज्ञानामुळे तिलांजली मिळू शकते. मात्र याशिवाय अनेक अशी कामे आहेत, ज्यावर एआयचा काहीही परिणाम होणार नाही.
ही १० कामे एआयपासून सुरक्षित
वेम्बू यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काही कामांची यादी दिली आहे. जी एआयच्या जगातही टिकून राहतील. ज्यामध्ये, मुलांची काळजी घेणे, शिकवणी घेणे, वृद्धांची काळजी घेणे, उच्च पगाराची नोकरी सोडून शेतीत परतणे, निसर्गाच्या प्रेमापोटी वनरक्षक म्हणून काम करणे, स्थानिक मंदिरात दैनंदिन विधी करण्यासाठी पुजारी म्हणून काम करणे आणि गर्दीची पर्वा न करता सराव आणि सादरीकरण करणारे शास्त्रीय संगीतकार म्हणून करिअर करणे.. अशा काही कामांची यादी वेम्बू यांनी दिली आहे.
वेम्बू यांच्या मते, हे मार्ग निवडणारे लोक पैशांसाठी काम करत नसतात. म्हणूनच एआय त्यांची जागा घेऊ शकत नाही. तंत्रज्ञान कार्यक्षमतेवर आधारित कामाची जागा घेत असताना माणसांनी हळूहळू अशा अर्थपूर्ण प्रयत्नांभोवती स्वतःला अधिक एकत्रित करायला हवे.
वेम्बू यांच्या पोस्टमुळे वाद
वेम्बू यांनी जी कामे सुचवली आहेत, त्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये अशी कामे व्यवहार्य ठरू शकतात का? असे अनेक लोक बोलत आहेत. तर नेटिझन्सच्या कमेंट्सचा वेम्बू यांनी प्रतिवादही केला आहे. ते म्हणाले, एआयमुळे अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
वेम्बू यांच्या युक्तिवादावार अनेकांचे समाधान झालेले नाही. विष्णू अग्रवाल नावाच्या हँडलने कमेंट करत म्हटले की, छंद किंवा आवड म्हणून केलेल्या कामातून आर्थिक आव्हाने पेलली जाणार नाहीत. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, तुमची कंपनी जागतिक स्तरावर एआय आधारित सेवा देऊन डॉलर्समध्ये पैसे कमावत आहे. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना रुपयांमध्ये वेतन देता आणि वरून इथल्या तरूणांना तुलनेने कमी दर्जाचे (आर्थिकदृष्ट्या) काम करायला सांगता, हा तुमचा दुटप्पीपणा नाही का?
