Deepinder Goyal Gurugram Flat Price : गेल्या काही वर्षांत भारतात रिअल इस्टेटमधील गुंतवणूक वेगाने लोकप्रिय होत आहे. पूर्वीसारखे रिअल इस्टेट केवळ गृहखरेदी किंवा प्लॉट घेण्यापुरते मर्यादीत राहिले नसून उत्पन्नाचा नवीन पर्याय म्हणून समोर येत आहे. जर भविष्यातील संधी ओळखून योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर काही वर्षातच अफाट नफा कमावून देण्याची क्षमता यात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे ‘झोमॅटो’चे सह-संस्थापक दीपिंदर गोयल यांची रिअल इस्टेट गुंतवणुकीने सध्या लक्ष वेधून घेतलं आहे. गुरुग्राममधील उच्चभ्रू सोसायटीत खरेदी केलेल्या त्यांच्या फ्लॅटच्या मूल्यात झालेली वाढ पाहून अनेकांचे डोळे विस्पारतील.
५२ कोटींचे अवघ्या ४ वर्षात १४० कोटी रुपये
गुरुग्राममधील अलिशान मानल्या जाणाऱ्या ‘डीएलएफ द कॅमेलियाज’ मध्ये त्यांनी २०२२ मध्ये तब्बल ५२.३ कोटी रुपयांना एक फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटची सध्याची अंदाजे बाजारपेठ किंमत आता १४० कोटी रुपयांच्या पार पोहोचली आहे. अवघ्या काही वर्षांत या मालमत्तेच्या मूल्यात ८८ कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.
५२ कोटींचा फ्लॅट कसा आहे?
गुरुग्राममधील प्रसिद्ध ‘गोल्फ कोर्स रोड’ येथे वसलेले ‘डीएलएफ द कॅमेलियाज’ हे देशातील सर्वाधिक आलिशान आणि महागड्या निवासी प्रकल्पांपैकी एक मानले जाते. दीपिंदर गोयल यांचे हे अपार्टमेंट तब्बल १०,८१३ स्क्वेअर फूट परिसरात पसरलेले आहे. या अपार्टमेंटमध्ये भव्य लिव्हिंग एरिया, अनेक बेडरूम्स, भव्य छते आणि थेट गोल्फ कोर्सचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. या परिसराचे मोक्याचे ठिकाण आणि अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था यामुळेच श्रीमंत आणि नामांकित उद्योगपतींची पहिली पसंती या सोसायटीला मिळत आहे.
खरेदीवेळी ३.६६ कोटींचे मुद्रांक शुल्क
ऑगस्ट २०२२ मध्ये गोयल यांनी हा फ्लॅट थेट डीएलएफ डेव्हलपरकडून ५२.३ कोटी रुपयांना खरेदी केला होता. या व्यवहाराची खरेदीखत नोंदणी मार्च २०२५ मध्ये पूर्ण झाली. विशेष म्हणजे, या मालमत्तेच्या नोंदणीसाठी गोयल यांनी तब्बल ३.६६ कोटी रुपये फक्त स्टॅम्प ड्युटी म्हणून भरले आहेत.
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा लोकप्रिय ट्रेंड
भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात गेल्या काही वर्षांत वेगाने बदल झाले आहे. हे क्षेत्र केवळ पारंपारिक जमीन किंवा फ्लॅट खरेदीपुरते मर्यादित राहिलेले नाही. आजच्या काळात रिअल इस्टेट हा गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय ठरत आहे. विशेष करुन मुंबई, दिल्ली आणि पुण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये याकडे भविष्यातील मोठा परतावा म्हणून पाहिले जात आहे. मोठे कलाकार, क्रिकेटर्स आणि सेलिब्रिटींकडून रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून शाहरूख खानपर्यंत आणि रोहित शर्मापासून विराट, शुभमन गिलपर्यंत अनेक दिग्गज प्रॉपर्टी खरेदीला प्राधान्य देत आहेत.
