सरकारी नोकरी मिळणे हे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. ती मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा हे माध्यम निवडणारे अनेक विद्यार्थी आहेत. नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा नागरी सेवांचा निकाल जाहीर करण्यात आला असून विदर्भातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील उत्तीर्णतेची टक्केवारीही वाढली आहे. बरेच विद्यार्थी एमपीएससी आणि यूपीएससीचा अभ्यास एकत्र करतात. मात्र, अखिल भारतीयस्तरावर प्रथम आलेल्या टीना धाबी हिने केवळ यूपीएससीवर फोकस करून अभ्यास केला होता. काही विद्यार्थी अभ्यास करीत राहतात आणि स्टेनोपासून ते इतर स्पर्धा परीक्षाही देत राहतात. कोणत्यातरी ठिकाणी निवड होऊन सरकारी नोकरी लागावी, अशी अल्पसंतुष्ट वृत्ती बाळगून विद्यार्थी प्रयत्न करीत असतात. सरकारी नोकरी हे असले तरी विद्यार्थ्यांचा पहिल्या परीक्षेचा अनुभव, त्यांचे अंदाज आणि यानिमित्त वास्तवाला सामोरे गेल्यानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न..

एमपीएससीची पूर्वपरीक्षा यूपीएससीपेक्षाही कठीण

मी मुळचा नागभीड तालुक्यातील छोटाशा गावचा. गेल्यावर्षी यूपीएससीची पूर्व परीक्षा दिली. थोडे प्रेशर आले होते. वाचन तेवढे नव्हते पण तरीही एनसीईआरटीची पुस्तके एका महिन्यात जेवढी वाचता येईल, तेवढी वाचली. परीक्षा केंद्रावर परीक्षा देताना सुरुवातीची १५ मिनिटे खूपच टेंशनमध्ये होतो. हळूहळू टेंशन कमी झाले. त्यानंतर एमपीएससी व यूपीएससीच्या तुलनात्मक अभ्यासक्रमात जाणवले की दोन्हीचा अभ्यासक्रम बरच व्यापक आहे. पण, यूपीएससीमध्ये विचारांतील नेमकेपणा पाहिला जातो. एमपीएससीची पूर्वपरीक्षा यूपीएससीपेक्षा कठीण वाटली. व्यापक अभ्यासक्रम असल्याने पाठांतरावर भर असल्यांचे चांगले फावते तसेच विद्यार्थ्यांची थॉट प्रोसेस अशीतशीच असली तरी चालते.

– महेश डबले

भारतीय नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र पुण्या-मुंबईला प्रत्येकजण स्पर्धक वाटतो!

मूळचा मूलचा आणि नागपुरात विद्यापीठाच्या बार्टी केंद्रात शिक्षण घेत असलो तरी नागपुरात तसे स्पर्धा परीक्षेचे वातावरण नाही. येथील वातावरणाचा काही फरकही पडत नाही. शिवाय खूप कॉम्पिटिशनही वाटत नाही. पण तेच मुलाखतीला नागपूरच्या बाहेर पुण्याला किंवा दिल्ली मुंबईला गेल्यानंतर फरक जाणवतो. तेथे गेल्यावर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी स्पर्धक वाटायला लागतो. एमपीएससी व यूपीएससीच्या परीक्षेचा विचार केल्यास एमपीएससी वस्तुनिष्ठ प्रश्नांकडे झुकलेली असते. महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित प्रश्न असतात. एखादी कन्सेप्ट समजलाच पाहिजे, असे नाही. केवळ अंदाज बांधून परीक्षा पेपर सोडवता येत नाही. यूपीएससीमध्ये विश्लेषणात्मक बाजू विचारात घेतली जाते. एखादी कन्सेप्ट विद्यार्थ्यांला किती समजली हे पाहिले जाते. भारत आणि जगाचा विचार या परीक्षेत करायला असल्याने विषयाच्या मुळाशी जावून विषय समजावून घ्यावा लागतो. तर्कसंगत अभ्यास असतो. विषय वाचलेला असल्याने अंदाज बांधूनही लिहू शकतो. त्यामुळे पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा केवळ अनुभवासाठी दिली. आणि दुसऱ्यांदा परीक्षेला बसलो तर अभ्यासक्रम बदलला. गोंधळ किंवा प्रेशर असे काही झाले नाही पण बुद्धिमत्ता कल चाचणी परीक्षेत टेंशन आले होते.

– रुपम निमगडे 

नागपूर विद्यापीठाचे बार्टी केंद्र दहावी-बारावीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करावी

स्पर्धा परीक्षेची तशी काही कल्पना नव्हती. इतरांना पाहून अधिकारी बनावे असे वाटत होते. एमपीएससीची पूर्व परीक्षा तर पहिल्याच प्रयत्नात पास झालो होतो. जेव्हा मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला गेलो तेव्हा एमपीएससी आणि यूपीएससीच्या अभ्यासक्रमातील फरक जाणवला. मुळात आपल्याकडे आपण फार उशिरा स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागतो. दहावी-बारावीपासूनच तशी तयारी करायला हवी. शिवाय त्याचे मार्गदर्शन करणारे घरीच असतील तर एक फोकस करून अभ्यास करता येतो. नाहीतर एमपीएससी किंवा यूपीएससी देतानाच विद्यार्थी क्लरिकल आणि बँकिंगच्या परीक्षाही देतात. तेच मी केले. शिक्षकांचे मार्गदर्शनही घेत होतो. अभ्यासक्रमानुसार अभ्यास करायचा असतो हेही माहीत नव्हते. एखादे पुस्तक घेऊन तेच वाचत रहायचे यालाच आम्ही तयारी म्हणायचो. आता तसे नाही. नेमकेपणाने अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. शिक्षक म्हणायचे स्पर्धा परीक्षांना फार सहज घेऊ नका. मला स्पर्धा परीक्षेविषयी फारसे काही माहीत नसल्याने सुरुवातीला मी फार गंभीरपणे त्याकडे पाहिले नाही.

– प्रमोदकुमार कन्हेकर  नागपूर विद्यापीठ राज्यशास्त्र विभाग