‘गोविंदा आला रे आला..’ म्हणत सर्व गोविंदा पथकांनी मोठमोठय़ा मंडळांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आमचा गोविंदा पथक आठ ते दहा थर सहज लावू शकतो अशी शक्कल लढवत पथक सुपारी घेत आहेत. मात्र दहीहंडीच्या थरांवर ठरवले जाणारे पैसे हे उत्सवांचा आनंद भंग करणारे आहे. ज्या उत्सवामुळे कोणाला प्राण गमवावा लागत असेल तर अशा उत्सवातून काय शिकवणूक मिळणार? पैशांची लालसा दाखवून उत्सवांचेही राजकीय व्यासपीठ केल्यामुळे याचा दुष्परिणाम लोकांना सहन करावा लागत आहे. तर कित्येकांना कायमचे अपंगत्व पत्करावे लागत आहे. त्यामुळे ‘गोविंदांनो दहीहंडी साजरी करा पण, स्वयंशिस्तीने’..

दहीहंडी हा साहसी खेळ आहे यासाठी तुमची शारीरिक क्षमता चांगली असावी लागते. महिन्यांपासून गोविंदा पथक जोरदार तयारीला लागलेले असतात. मात्र अनेक अपघातांमुळे या उत्सवाला गालबोट लागते. त्यात आयोजकांची मुजोरी आणि अवास्तव थरांचा डोलारा यामुळे दहीहंडी उत्सवातून आनंद मिळत नाही. या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी काही ठोस नियमावलींची आखणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे दहीहंडी आनंदाने साजरा केला जाईल.

– तेजस राणे, साठय़े महाविद्यालय

दहीहंडी उत्सव साजरे करताना नियमांचे बंधन असणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने सध्या गोविंदा पथकाला १२ वर्षांची अट घालून दिली आहे त्यामुळे प्रत्येकाने त्याचे पालन करावे. त्याशिवाय सुरक्षिततेच्या खबरदारी घ्यावात आणि राज्यशासनाने याचा पाठपुरावा करावा. प्रत्येक पथकांमध्ये डॉक्टरांची टीम असावी ज्यामुळे काही गंभीर अपघातात तातडीने उपचार केले जातील. दहीहंडीसाठी गोविंदा पथक खूप मेहनत घेत असतात. या मेहनतीचे चांगले फळ मिळावे यासाठी प्रत्येक गोविंदाने स्वत:वरच काही बंधने लावली तर हा उत्सव आनंदाने साजरा केला जाईल.

– सुमेध म्हात्रे, मुंबई विद्यापीठ

पूर्वी सण, समारंभ आनंदासाठी साजरे केले जायचे. कोणतेही नियम नसताना वेळेचे भान, साधेपणा यामुळे उत्सवातील आनंद द्विगुणित होत असे. मात्र आता उत्सवांचे बदलेले स्वरूप, भपका, स्वरूप, बेधुंदपणा आणि अतिस्पर्धा यामुळे सामाजिक भान गमावून बसलो आहोत. यावर विस्कळीत झालेली परिस्थिती मूळ पदावर आणण्यासाठी नियमावलींची आवश्यकता आहे. त्याच्या अंमलबजावणीबरोबरच लोकांनी स्वयंशिस्तीने आणि उत्स्फूर्तपणे नियमाचे पालक करणे गरजेचे आहे.

– प्रियांका मयेकर, रुपारेल महाविद्यालय

दहीहंडी हा सण आहे त्याची स्पर्धा करणे चुकीचे आहे. अशा मानसिकतेमुळे आपण सणांचे महत्त्व कमी करीत आहोत. उत्सवांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्यामुळे त्याचा परीघ वाढला असला तरी त्याला स्पर्धेचे रूप आले आहे. दहीहंडीचे थर वाढविण्यापासून लहान मुलांकडून दहीहंडी फोडण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहे. यात अनेक जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. उत्सव हे आपल्याला एकत्र आणण्यासाठी आणि आनंदाने साजरे करण्यासाठी आहे, मात्र त्याचा विपर्यास झाला तर त्याचे महत्त्व कमी होते.

– अनिकेत नाईक, मुंबई विद्यापीठ