केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकतेच देशातील विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था यांची गुणवत्ता यादी जाहीर केली. यात सवरेत्कृष्ट १०० विद्यापीठांच्या यादीत राज्यातील तीन पारंपरिक विद्यापीठे आणि एका अभिमत विद्यापीठाचा समावेश आहे. यापैकी तीन विद्यापीठांच्या कुलगुरूंकडून हे यश मिळवण्यास नेमके काय केले आणि त्यांच्यासमोरील आव्हाने जाणून घ्यायचा केलेला हा प्रयत्न.

आयटीसी : निर्मिती क्षमतेचा केंद्रबिंदू

रसायन तंत्रज्ञान संस्था म्हणजेच इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आता आधुनिक रसायन विज्ञानाच्या क्षेत्रात देशातील अग्रगण्य संस्था झाली आहे. देशभरातील चार हजारांहून अधिक विद्यापीठांमध्ये दुसरे स्थान आम्हाला नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे, गेल्या अनेक वर्षांत संस्थेच्या माध्यमातून झालेल्या कामाचे खऱ्या अर्थाने चीज झाले. तरीही, क्रमांक एक होण्यासाठीच आमचा प्रवास निश्चितच सुरू राहील. आज संस्थेत पदवीचे ९, पदव्युत्तरचे १६, पीएच.डी.चे २९ आणि पदव्युत्तर पदविकेचा एक अभ्यासक्रम असून २ हजार एकशे अठ्ठय़ात्तर विद्यार्थी यात शिक्षण घेत आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर रसायनशास्त्राशी निगडित अभ्यासक्रम राबविणारे हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. गेल्या वीस वर्षांत ३४८ तर, फक्त गेल्या वर्षांत ६७ पेटंट संस्थेने मिळवले आहेत. संस्थेच्या या संशोधनकार्याची दखल घेत, ख्यातनाम उद्योगपती बिल गेट्स यांच्या मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने चार लाख डॉलर खर्चाच्या चार प्रकल्पांची जबाबदारी संस्थेवर सोपविली आहे. आमच्या अशा कार्यात वृद्धी व्हावी म्हणून आम्ही एक नवा प्रयोग करत आहोत. यासाठी आम्ही अभ्यासक्रमात एक बदल करणार आहोत. देशात स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया आदी उपक्रमांमुळे नव-संकल्पनांना चांगले वातावरण प्राप्त झाले आहे. त्यामुळे, या वातावरणाचा विद्यार्थ्यांनाही उपयोग व्हावा या हेतूने रसायन विज्ञान संस्थेने शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांचा एक गट तयार करून त्यांना एक प्रकल्प राबविण्यास देण्याचे ठरवले आहे.

विद्यार्थ्यांना संशोधनासाठी एक प्रकल्प देण्यात येणार असून त्यावर संशोधन करून त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यास त्याचे पुढे उद्योगात रूपांतर करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व मदत करणार आहोत. जेणेकरून संस्थेकडून नव उद्योजकांची निर्मिती होऊन ‘मेक इन आय.सी.टी’चे आमचे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल. संस्थेला सध्या मिळालेले देशातले दुसरे मानांकन व आजवरची वाटचाल यांमुळे ओरिसा सरकारने त्यांच्या राज्यात विद्यापीठाची शाखा उघडण्यासाठी आमंत्रण दिले असून एखाद्या अभिमत विद्यापीठाला दुसऱ्या राज्याने बोलविण्याची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्रातदेखील आम्ही सरकारकडे मुंबई पट्टय़ात संस्था वाढविण्यासाठी १०० एकर जागेची मागणी केली असून औरंगाबादमध्ये संस्थेने एक शाखा सुरू करावी अशी सरकारने अपेक्षा व्यक्त केली आहे. रसायन तंत्रज्ञान संस्थेने संशोधन क्षेत्रात काम करताना पर्यावरणाची जाणीव राखत विद्यापीठ आवारात हरित परिसर संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. आवारातील पालापाचोळा, कचरा यांवर प्रक्रिया करून जैव खतांची निर्मिती सुरू केली असून वाया गेलेल्या व खराब पाण्यावरही प्रक्रिया करून वापरण्यायोग्य पाण्याची निर्मिती करत

आहोत. हे सगळे करताना सौर ऊर्जेचा वापर करूनच प्रकल्प राबवत आहोत. संस्थेचा विकास हेच आमच्यापुढील धेय्य असून यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

– डॉ. जी. डी. यादव, कुलगुरू, रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई

नावीन्यपूर्ण उपक्रमांचे फलित

प्रयोगशाळा ते जमीन, प्रयोगशाळा ते उद्योग, ‘स्मार्ट व्हिलेज’, कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजना, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन योजना.. असे उपक्रम उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी राबविले जातात. पायाभूत सुविधा देण्यावर विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले. परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार करून खान्देशातील विद्यार्थी स्पर्धेत मागे राहू नये याची दक्षता घेतली. संशोधनाला चालना देण्यासाठी अविरत प्रयत्न झाले. याची फलशृती देशभरातील विद्यापीठात ‘उमवि’ने आपले वेगळेपण राखत ५९ वा क्रमांक मिळविण्यात झाली, अशी भावना कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांनी व्यक्त केली. पारंपरिक विद्यापीठात महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ द्वितीय क्रमांकावर आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शिक्षण आणि संसाधने, संशोधन कामगिरी व व्यावसायिक सहभाग, पदवी परिणाम, आकलन आणि शिक्षणाच्या पलीकडे जाऊन समावेशकतेसाठी केलेले प्रयोग हे निकष निश्चित केले होते. विद्यापीठातील प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता, औद्योगिक व शैक्षणिक अनुभव, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचे प्रमाण, ग्रंथालय व प्रयोगशाळा, संशोधनाचे पुन:संदर्भ, विज्ञान, वेब, प्राप्त झालेले पेटंट, विज्ञान तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, परीक्षेतील विद्यार्थ्यांची कामगिरी, स्पर्धा परीक्षेतील कामगिरी, विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या कार्यशाळा, परिषदा, चर्चासत्र, नियामक मंडळांमधील महिलांचा सहभाग व सबलीकरण, सामाजिक व आíथकदृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राबविलेले उपक्रम यात ‘उमवि’ची कामगिरी प्रभावी ठरली. विद्यापीठात जवळपास ५५ टक्के विद्यार्थी ग्रामीण व आदिवासी भागातील आहेत. त्यांची पिढी पहिलीच पदवीधर झाली आहे. विद्यापीठाने २०४० पर्यंतचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार केले आहे. पुढील काळात संशोधन, ज्ञानदान यात परिपक्वता कशी येईल, यासाठी गुणवत्तेवर आधारित विविध उपक्रमांचे नियोजन आहे. ‘उमवि’च्या अंतर्गत २४० महाविद्यालये असून त्यात अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

स्पर्धात्मकता महत्त्वाची ठरली..

‘‘आतापर्यंत चांगले विद्यापीठ कसे ठरवणार यासाठी काही निकषच नव्हते. आता मनुष्यबळ विकास मंत्रालयानेच ही व्यवस्था केल्यामुळे विद्यापीठांना नेमके काय कमी आहे याची जाणीव होईल. त्यातच क्रमवारीचे निकष निश्चित करताना आपल्याकडील वातावरणाचा विचार करण्यात आला आहे. क्रमवारीमुळे आणि राज्य विद्यापीठांना केंद्रीय संस्थांशीही स्पर्धा करावी लागत असल्यामुळे स्पर्धात्मक भाव वाढेल, हेदेखील प्रगतीच्या दृष्टीने स्वागतार्हच आहे. शिवाजी विद्यापीठातील सर्वसमावेशकता, समाजाशी विद्यापीठाची असलेली जोडणी ही विद्यापीठाची बलस्थाने आहेत. विद्यापीठाशी २८० महाविद्यालये संलग्न आहेत. पायाभूत सुविधा, पात्रताधारक शिक्षक या निकषांवरही विद्यापीठाची कामगिरी चांगली दिसत आहे.

मात्र विद्यापीठाचा ‘एम्प्लॉयमेंट इंडेक्स’ कमी आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याचे प्रमाण हे शहरी भागातील विद्यापीठांच्या तुलनेत कमी आहे. त्यासाठी कौशल्यविकासावर भर देणे आवश्यक आहे. विद्यापीठाने यापूर्वीच त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील क्रमवारीत अधिक वरचे स्थान मिळवण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करेल.’’

– डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर</strong>