अरे, सुमंत आज रुपारेलला जाणारेस का? माझ्यासाठी पण एक फॉर्म घेऊन ये हं.. मी आज साठय़ेला जाणार आहे, तुझ्यासाठी पण फॉर्म आणतो.. बारावीच्या निकालानंतर  विद्यार्थ्यांमध्ये या ‘लेनदेन’चा प्रसंग हमखास येतो. करिअर फोकस ठेवून मनाजोगत्या महाविद्यालयाची निवड करावयाची असते, तर अकरावीत पर्याय नसल्याने मिळेल त्या महाविद्यालयामध्ये दाखल झालेले विद्यार्थी चांगल्या महाविद्यालयात अ‍ॅडमिशन मिळविण्यासाठी जंगजंग पछाडतात.

आवडीच्या महाविद्यालयाची निवड करताना विद्यार्थ्यांची दाणादाण उडते. महाविद्यालयांच्या खेटा घालत उन्हं-पाऊस झेलीत महाविद्यालयांची माहितीपत्रिका आणि अर्जानी खचाखच भरलेल्या दप्तरांना श्वास घेण्यासही जागा मिळत नसते. महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेच्या लढाईवर फत्ते करण्यासाठी कधी मित्रमैत्रिणींच्या गटाने तर कधी पालकही या मोहिमेत सामील होतात. या वेळी अनेक ‘काळजीवाहू’ पालक मुलांना मदत म्हणून ऑफिसला दांडय़ा मारून मुलांसोबत महाविद्यालये फिरत असतात. मात्र प्रथम वर्षांच्या प्रवेश प्रक्रियांचे अर्ज ऑनलाइन मिळू लागले आणि विद्यार्थ्यांचा ताण काही अंशाने कमी झाला. सध्या मुंबईतील अनेक महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने घेतले जात आहेत. यातील काही महाविद्यालये तर गेली अनेक वर्षे प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेत आहेत. भवन्स, कीर्ती, साठय़े, एनएम, बिर्ला, विवा, एमसीसी, जोशी-बेडेकर, सोमय्या, झेवियर, सेंट अ‍ॅड्रय़ूज, मिठीबाई, एनएम या महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया घेतल्या जातात.

महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे हे ऐकून नक्कीच विद्यार्थ्यांमधील आनंद द्विगुणित झाला असेलच.

एरवी आई-बाबांना घेऊन महाविद्यालयांची सफर करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एफवायच्या प्रवेश अर्जासाठी महाविद्यालयात जाण्याची गरज नाही, असे जरी असले तरी आपण ज्या महाविद्यालयात दाखल होणार आहोत त्या महाविद्यालयाविषयी जाणून घेण्यासाठी किमान एकदा तरी महाविद्यालयाची भेट घेणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी मित्र-मैत्रिणींचा घोळका मजा करीत महाविद्यालयीन सहल करीत होता, यातून महाविद्यालयांची माहिती मिळवून घेत होता. मात्र आता हे चित्र ऑनलाइन पद्धतीमुळे दुर्मीळ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांपेक्षाही त्यांच्या पालकांचा ताण कमी होणार आहे. ऑनलाइनमुळे मुलांना शांतपणे घरी बसून अर्ज भरण्याची संधी मिळणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांना भेट न देता प्रवेश घेणे मला योग्य वाटत नाही. मुलांना ऑनलाइन सोय असली तरी त्यांनी महाविद्यालय जावे. यातून महाविद्यालयाला जाण्याचा मार्ग, लागणारा वेळ, येणाऱ्या अडचणी याबद्दलची माहिती मिळते. खरे पाहता प्रत्येक महाविद्यालयाची वास्तू वेगवेगळी असते आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये एक भावना निर्माण होते. स्वत: हून ती वास्तू पाहत नाही तोवर त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. सुट्टय़ांमध्ये बाहेर जाणाऱ्या मुलांनी फक्त प्रवेश प्रक्रियेसाठी महाविद्यालयात न येता बसल्या जागी स्मार्ट फोनच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया भरता येईल. माझ्या मते, परीक्षेनंतरच उन्हाळ्याच्या सुट्टीत महाविद्यालयात मुलांसाठी प्रवेश प्रक्रियेचे अर्ज उपलब्ध व्हायला हवे. ज्यातून सुट्टय़ांमध्ये मुलांना जसा वेळ मिळेल त्यानुसार ते भेट देऊ शकतील. मुलांना महाविद्यालयांना भेटी देता येईल.

 कविता रेगे,  प्राचार्य, साठय़े महाविद्यालय

ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या सर्वाधिक फायदा मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांना होणार आहे. मुंबईतील महाविद्यालयांमध्ये अ‍ॅडमिशन घेण्याच्या इच्छेने मुंबईबाहेरील विद्यार्थीही उत्सुक असतात. मात्र त्यांना येथील महाविद्यालयांमध्ये फिरणे शक्य होत नाही, मात्र ऑनलाइन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरणे सोपे झाले आहे. त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना यामुळे वेगवेगळ्या महाविद्यांमध्ये प्रवेश अर्ज भरता येणार आहे. त्याचबरोबर पालकांची होणारी धावपळही यामुळे कमी होईल. पालकांना मुलांसोबत शांतपणे घरीच हा अर्ज भरून घेता येणार आहे.

वासंती कच्छी, भवन्स महाविद्यालय प्राचार्य

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. नवीन पिढी ही तंत्रज्ञानाच्या अधिक जवळ आहे त्यामुळे यामधील बारकावे त्यांना ओळखता येते. याची दखल घेऊन विवा महाविद्यालयातील मुलांनी तयार केलेली विवा सॉफ्टवेअर सॉल्युशन ही प्रणाली महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर घेण्यात आली आहे. ही प्रणाली मुलांना प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यासाठी मदत करते. या प्रणालीच्या मदतीने विद्यार्थ्यांना बारावीत मिळालेल्या टक्क्यांनुसार आणि महाविद्यालयाच्या कटऑफनुसार अर्ज भरता येतो. ऑनलाइन फॉर्ममुळे विद्यार्थ्यांना स्मार्ट फोनच्या साहाय्याने कुठेही बसून हा अर्ज भरता येतो. यामुळे निकालानंतर मुलांची धावाधाव बऱ्याच अंशाने कमी होईल.

रवी किरण भगत, प्राचार्य विवा महाविद्याल

महाविद्यालातील प्रवेश आणि अ‍ॅडमिशन प्रक्रिया ऑनलाइन झाल्यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे सर्वच प्रक्रिया खूप स्वच्छ आणि स्पष्ट  झाल्या आहेत. गेली दहा वर्षे जोशी-बेडेकरमध्ये अ‍ॅडमिशनच्या प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातात. मात्र ऑनलाइन असले तरी काही कामासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येणे गरजेचे आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात यावे लागणार आहे. मात्र यात विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ नको म्हणून महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये माहिती देणाऱ्या केंद्राची सोय करण्यात आली आहे. अभ्यासक्रमांच्या शाखेनुसार ही नोंदणी केंद्र  असणार आहेत. तर अर्जामध्ये फेरफार करणे यासाठी महाविद्यालयाची संगणक लॅब मुलांसाठी उपलब्ध असणार आहे. नेहमीच नवीन अ‍ॅडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी महाविद्यालयातील मुलेही पुढाकार घेत असतात. एकंदर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा मुलांना नक्कीच फायदा होत आहे.

शाकुंतल सिंह, जोशी-बेडेकर महाविद्यालय प्राचार्य