14 December 2017

News Flash

महाभारतावर बोलू काही

महाभारत या महाकथेची सखोल चर्चा करणारा  महोत्सव रुईया महाविद्यालयात पार पडला.

नीलेश अडसूळ   | Updated: February 11, 2017 12:24 AM

महाभारत या महाकथेची सखोल चर्चा करणारा  महोत्सव रुईया महाविद्यालयात पार पडला. संस्कृत भागाने ही नावीन्यपूर्ण संकल्पना राबवली. नव्या बांधणीत या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. महाभारत हा विषयच व्यापक आहे. महाभारतातील कथा लोकसंगीतातून मांडल्या तर त्यातील आशयाला थेट भिडता येईल आणि विषय आणखीनच सोपा करून सांगता येईल, अशी संकल्पना मांडण्यात आली. त्यावर काम करण्यात आले. त्यातूनच संस्कृत आणि मराठीची विशेष सांगड घालण्यात आली. यात चिकित्सक दृष्टिकोनातून महाभारताकडे पाहण्याचे आशयसूत्र महोत्सवातून गुंफण्यात आले. दिनांक ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी महोत्सव पार पडला. सर्वासाठी खुल्या असणाऱ्या या चर्चासत्रात विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यात काही मातबर वक्त्यांनी सहभाग घेतला होता. यंदाचे हे महोत्सवाचे चौथे वर्ष होते. व्यास, भास आणि रामायण महोत्सव असे तीन महोत्सव झाले आहेत. भारताची प्राचीन परंपरा आणि वाङ्मय नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी संस्कृत विभागाच्या विभागप्रमुख डॉ. मंजुषा गोखले सतत कार्यरत असतात. महाभारताचा इतिहास, पाश्र्वभूमी अशा अनेक मुद्दय़ांवर सकस आणि सखोल चर्चा झाली. डॉ. अरुणा ढेरे, डॉ. सरोज देशपांडे, डॉ. सरोजा भाटे, डॉ. वैशाली दाबके, डॉ. सिंधू डांगे, डॉ. श्रीनंद बापट, डॉ. गौरी माहुलीकर, डॉ. कुमुद कानिटकर, डॉ. परिणिता देशपांडे, डॉ. अंजली पर्वते आदी मान्यवरांनी रसिकांना वेगळी अनुभूती दिली. तसेच डॉ. प्रसाद भिडे यांनी आजी-माजी विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन मनोरंजनपर कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाची सांगता लोकमहाभारत म्हणजे जांभूळ आख्यान या वैशिष्टय़पूर्ण कलाप्रकाराने करण्यात आली. नंदेश उमप यांनी जणू महोत्सवाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. कल्पेश दळवी यांनी यक्षप्रश्नांचा पोवाडाही सादर केला. विद्यार्थी, शिक्षक वर्ग आणि रसिक श्रोते यांना महाभारत महोत्सव म्हणजे ज्ञानाची एक पर्वणीच ठरली.

 

रेझनन्स महोत्सवात निर्मिती संकल्पनेचा प्रतिध्वनी

  • पराग गोगटे

एसआयडब्लूएस महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान व संगणक विज्ञान विभागाचा ‘रेझनन्स’ हा वार्षिक शैक्षणिक महोत्सव नुकताच महाविद्यालयात साजरा झाला. तीनदिवसीय या महोत्सवात विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याशी निगडित विविध तांत्रिक आणि निर्मितीवर भर देणाऱ्या स्पर्धा आणि खेळ घेण्यात आले. यातील पहिल्या दिवशी ‘लोगो क्रिएटिव्हिटी’, ‘ब्लाइंड टायपिंग’, ‘क्रॉस कोडिंग’सारखे रंजक खेळ घेण्यात आले. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘क्लॅश ऑफ क्लॅन’, ‘बॅटल ऑफ शतरंज’ आणि ‘मिनी मिलिटीआ’ या स्पर्धा झाल्या. महोत्सवाच्या समारोपाला विज्ञानाशी निगडित लघु प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. यात टाकाऊपासून टिकाऊ  ही संकल्पना वापर करून लघु प्रतिकृती बनवण्यात आल्या होत्या. यात आइस्क्रीमच्या कांडय़ा, घरातील जुन्या बॅटऱ्यांचा वापर करून काही प्रकल्प मांडण्यात आले. शिवाय रोकडरहित भारत (कॅशलेस इंडिया) मोहिमेचा संकल्पनेसाठी वापर केल्याने महोत्सवाची रंगत आणखीनच वाढली.

 

साठय़े महाविद्यालयात भावी पत्रकारांना मार्गदर्शन

  • सायली चाळके

मुद्रित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतील फरक आणि त्यातील नोकरीच्या संधी याबद्दल असलेले अज्ञान दूर करण्यासाठी पार्ले येथील साठय़े महाविद्यालयाच्या बीएमएम विभागाने ७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान हे या शिबिराला वक्ते म्हणून लाभले होते. या शिबिरात त्यांनी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यम ही तिन्ही क्षेत्रे कसे वेगळे आहेत तसेच या क्षेत्रात काम करत असताना पत्रकाराकडे कोणते गुण असावेत आणि त्या, त्या क्षेत्रातील पात्रता तसेच या क्षेत्रात काम करत असताना कोणती दक्षता घ्यावी या सर्व विषयांबद्दल पत्रकार शिक्षणातील भावी पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या क्षेत्रात काम करत असताना त्यांना आलेले अनुभव हे वेगवेगळ्या प्रसंगातून त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्याचप्रमाणे पत्रकाराने एखाद्या प्रसंगातून कशा प्रकारे बातमी शोधावी याबद्दल वेगवेगळी उदाहरणे देऊन तसेच ही तिन्ही माध्यम क्षेत्रे किती फोफावली आहेत आणि पुढे ती कशी फोफावतील याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.

माध्यम क्षेत्रात पैसा आणि प्रसिद्धीकडे न पाहता ओळख आणि संपर्क वाढविण्याच्या दृष्टीने भावी पत्रकारांनी पाहणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. मार्गदर्शन शिबिरात बीएमएम विभागातील विद्यार्थी आणि विभागप्रमुख गजेंद्र देवडा आणि इतर शिक्षकवर्ग उपस्थित होता.

First Published on February 11, 2017 12:24 am

Web Title: college festival 2