16 December 2017

News Flash

‘रुईया’त पर्यावरण, जागतिकीकरणाचा जागर

जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारून देशाला २५ वर्षे पूर्ण झाली.

कॅम्पस कट्टा वार्ताहर  | Updated: February 4, 2017 12:18 AM

रामनारायण रुईया महाविद्यालयात नुकतीच २३, २४ आणि २५ जानेवारी २०१७ रोजी ‘विष्णुशास्त्री चिपळूणकर व्याख्यानमाला’ पार पडली. चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला १९७४ साली कवी वसंत बापट यांच्या पुढाकाराने सुरू झाली. विषयवैविध्य हे व्याख्यानमालेचं खास वैशिष्टय़. याशिवाय विषयांवर विचार मांडण्यासाठी लाभलेले वक्ते हेही एक आकर्षण होते. यंदा अतुल देऊळगावकर, प्रा. पुष्पा भावे, डॉ. अनिरुद्ध पंडित हे वक्ते म्हणून लाभले होते. जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारून देशाला २५ वर्षे पूर्ण झाली. या काळात पर्यावरण, समाज आणि संस्कृती आणि शिक्षण या तीन क्षेत्रांत झालेल्या बदलांचा वेध या तीन वक्त्यांनी व्याख्यानात घेतला.

पहिल्या दिवशी ‘विनाशकाले..’ या विषयावर बोलताना जागतिकीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, हवामान बदलाचे परिणाम यावर प्रकाशझोत टाकला. जैवविविधतेचा होणारा ऱ्हास, आर्थिक विषमता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अन्नधान्य उत्पादनाविषयीच्या विविध समस्या अशी मांडणी करत भावी जलसंघर्षांकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. अतिरेकी कारवाया आणि जागतिक पाणी समस्या यांच्यातील आंतरसंबंधही त्यांनी उलगडून दाखवले.

दुसऱ्या दिवशी बदलत्या सांस्कृतिक पर्यावरणावर भाष्य करताना ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पुष्पा भावे म्हणाल्या की, जागतिकीकरणानंतर लोकांना असे वाटले की जातिसंघर्षांतून सुटका होईल, नोकरी आणि सुविधा मिळतील, आर्थिक विषमता लयास जाईल; पण हा आशावाद फोल ठरला. उलट जागतिकीकरण हे जुन्या साम्राज्यशाहीचेच नवे रूप म्हणता येईल. जागतिकीकरणामुळे झालेले बदल केवळ आर्थिक नाहीत तर ते मूल्यात्मक आहेत. अनेक अनिष्ट गोष्टींना जागतिकीकरणामुळे ऐट मिळाली. नवे मोह निर्माण झाले; एवढेच नव्हे तर देशप्रेम, देशद्रोह या संकल्पनांमध्ये बदल झालेलाही आज दिसतो आहे.

तिसऱ्या दिवशी ‘आधुनिक शिक्षणपद्धती : वेग आणि मर्यादा’ हा विषय श्रोत्यांसमोर ठेवताना डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी शैक्षणिक क्रांतीची गरज प्रतिपादित केली. प्राथमिक शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाल्याशिवाय शिक्षणक्षेत्राचे चित्र बदलणार नाही, असे ते म्हणाले.

या व्याख्यानमालेला तीनही दिवशी श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध महाविद्यालयांतील आजी-माजी प्राध्यापक, विद्यार्थी आणि अनेक मान्यवर श्रोते म्हणून उपस्थित होते. श्रोत्यांनी व्याख्यानानंतर उत्स्फूर्तपणे अनेक प्रश्न विचारत व्याख्यानमालेची प्रश्नोत्तरांची परंपरा कायम राखली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर व्याख्यानमालेला तिन्ही दिवशी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांच्याच हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रा. गायत्री लेले, प्रा. पूजा ठाकूर, प्रा. डॉ. पद्माकर साठे यांनी वक्त्यांची ओळख

करून दिली. तर सेजल नातू, प्रणय चव्हाण आणि देविका जोशी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्याध्यक्ष प्रा. शिल्पा नेवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मराठी विभागातील सहकारी प्रा. लीना केदारे, प्रा. शारदा गांगुर्डे, प्रा. अनघा पेंडसे आणि ४० विद्यार्थी स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.

 

आचार्यची स्त्री जागरूकता

अक्षय मांडवकर

चेंबूरमधील आचार्य महाविद्यालयाच्या महिला विकास आणि फाऊंडेशन विभागाच्या आणि लायन्स क्लबच्या वतीने ‘स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण’ कार्यक्रम झाला. देशात युवाशक्तीची ताकद मोठी आहे. युवाशक्तीला योग्य दिशा आणि उत्तम मार्गदर्शन दिल्यास एकसंघ भावनेमुळे देशाचाही विकास साधता येतो, असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांनी केले.

या वेळी पत्रकारिता, न्याय आणि सामाजिक क्षेत्रातील मातबर मंडळी उपस्थित होती. सन्माननीय अतिथी म्हणून ‘विदाऊट गन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चेंबूरच्या पोलीस जनसंपर्क अधिकारी शालिनी शर्मा यांनी अभ्यासपूर्ण संवादातून निर्णयक्षमता, कामाचे नियोजन, नेतृत्वगुण, व्यवसाय दृष्टी आणि जनसंपर्क कला या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याशिवाय ‘नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट’च्या सरचिटणीस शीतल करदेकर यांनी मुलींना त्यांचे हक्क आणि कायद्यांची माहिती करून घेण्याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ‘पिंक’ हा चित्रपट दाखविण्यात आला. ‘स्त्री जागरूकता’ या विषयावर मुक्त चर्चा झाली. पोलीस विभाग, पत्रकार, सामाजिक संघटना आणि शिक्षणतज्ज्ञांनी मिळून अशा स्वरूपाचे उपक्रम राबविल्यास सुजाण समाजाची निर्मिती करणे शक्य होईल, अशी आशा व्यक्त केली. मुलींसाठी सुरक्षित वातावरण, मुलेमुली समानता या विषयांवर महिला विभागप्रमुख डॉ. सुजाता वोरियर यांनी चर्चा करण्यात आली.

 

नागमंत्री जागरण : संस्कृती शोध

नीलेश अडसूळ

मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री इला अरुण यांच्या उपस्थितीत लोकसाहित्याचे अभ्यासक प्रकाश खांडगे आणि गणेश चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान प्रांतातील ‘काल्बेलीया’ आणि त्याच पाश्र्वभूमीवर आधारलेल्या महाराष्ट्रातील ‘नागमंत्री’ या दोन लोककला प्रकारांचा मेळ साधण्यात आला. साप पकडणारे आणि त्यांचे खेळ सादर करणारे तसेच त्यांचे विष उतरवणारे हे लोक दोन्ही प्रांतांत आढळतात. राजस्थानात ही जमात काल्बेलीया नृत्य करते तर आपल्याकडे नागमंत्री जागरण केले जाते. त्यामुळे अशा दुर्मीळ लोककलांची लोकगाथा विद्यार्थ्यांपुढे मांडली जावी या हेतूने ही कार्यशाळा आयोजित केली गेली होती. ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र नाचताना आणि गाताना दिसले. नागमंत्री जागरणाला मूळ बारी असा शब्द प्रयोग असून या बारीमध्ये पाण उतरवण्याचे असे गीत सादर होते. पाण चढणे म्हणजे विषबाधा होणे आणि पाण उतरवणे म्हणजे विष नाहीसे करणे. नागमंत्री जागरण म्हणजे नक्की काय? त्यावर बोलताना प्राध्यापक चंदनशिवे म्हणाले, ‘पूर्वी गावखेडय़ात अनेक लोकांना साप चावत असत मग सर्पदंशावर धार्मिक उपाय म्हणून हे नागमंत्री जागरण केले जाते. महाराष्ट्रातील खानदेश, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातही हा प्रकार दिसून येतो.

श्रावण महिन्यात शंकराची उपासना करून रात्री घरामध्ये हे नागमंत्री बोलावले जातात. त्यानंतर सापाच्या दहा प्रतिमा तयार करून त्याची पूजा करून विष उतरवणारे मंत्र व गाणी गायली जातात. यामध्ये पितळेच्या घागर आणि ताटाचा विशेष वाद्य म्हणून वापर केला जातो. हा संपूर्ण प्रकार जरी आता अंधश्रद्धेचा भाग झाला असला तरी अपवादात्मक गोष्टी वगळता हा एक उत्तम लोककला प्रकार असल्याने त्याचा प्रयोग एनसीपीएमधील एका नाटय़गृहात इला अरुण यांच्या समवेत सादर केला गेला. याप्रसंगी इला अरुण यांच्यासोबत

परदेशातील काही मान्यवर उपस्थित होते. त्यापैकी प्रत्येकाने महाराष्ट्रातल्या लोकपरंपरेचं भरभरून कौतुक केले.

First Published on February 4, 2017 12:17 am

Web Title: college festivals in mumbai 3