‘जिंकलो रे जिंकलो’ अशा आरोळ्या सध्या मुंबई-ठाण्यातील महाविद्यालयात ऐकू येत आहेत. प्रचंड मेहनत, जिंकण्याची इच्छा आणि मानांकित महाविद्यालयांतील चुरशीची धुसपुस अशा वातावरणात मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव रंगत असतो. असेच काही वातावरण या वर्षीच्या ४९ व्या युवा महोत्सवात पाहायला मिळत असून विद्यापीठाच्या शाहीर अमर शेख सभागृहात महोत्सवाच्या अंतिम फेऱ्या उत्साहात पार पडत आहेत. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी निवडून गेल्यानंतर महाविद्यालयांचे सांस्कृतिक वर्तुळ जिवाचे रान करत अंतिम फेरीच्या तयारीला जोमाने लागतात. तहान-भूक विसरून ही मंडळी तालमी करीत आहेत. दिवसभर महाविद्यालयाच्या जिमखान्यात नृत्य, एकांकिकाचा सराव सुरू आहे. महाविद्यालयात नवीन दाखल झालेले पहिल्या वर्षांतील विद्यार्थीही दादा-ताईच्या सादरीकरणासाठी आपला खारीचा वाटा उचलत आहेत. आपल्या सादरीकरणाच्या विषयाचे गुपित ठेवून दुसऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी सादरीकरणासाठी कुठला विषय घेत आहेत याचा शोधही जोरात सुरू आहे. यंदाच्या वर्षीही पोद्दार, मिठीबाई, साठय़े, डहाणूकर, जोशी बेडेकर या महाविद्यालयांमध्ये अंतिम फेरीतल्या स्पर्धा रंगत असून सादरीकरण आणि फाइन आर्ट विभागातील काही स्पर्धा पार पडल्या आहेत. १८ ऑगस्टपासून सुरू झालेल्या अंतिम फेरीच्या लढाईत आतापर्यंत कोणत्या महाविद्यालयांच्या पारडय़ात अधिक पदके पडणार याची सारे जण आतुरतेने वाट पाहत आहे.

ही मेनका…

जोशी-बेडेकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या पदवीत्तर अभ्यासक्रमात शिकणाऱ्या निधी प्रभू हिने शास्त्रीय नृत्य स्पध्रेत ‘धमार’ तालाचे सादरीकरण करून सुवर्णपदकाची कमाई करीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या मेनका ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. निधी गेली बारा वर्षे डॉ. मंजिरी देव आणि पं.मुकुंदराज देव यांच्याकडून कथ्थक नृत्याचे शिक्षण घेत आहे. निधीने कथ्थक विशारदपर्यंतचे नृत्यालंकाराचे शिक्षण पूर्ण करण्याची तयारी करत आहे. मुंबईत कथ्थक नृत्यासाठी मानाच्या समजल्या जाणाऱ्या पं.विष्णुशास्त्री पलुस्कर पारितोषिक आणि स्वरसाधना या स्पध्रेत उल्लेखनीय कामगिरी करीत या वर्षी तिने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. आई-वडिलांचा पािठबा आणि गुरूंनी केलेले उत्तम मार्गदर्शन यामुळेच ‘मेनका’ मिळवण्याचे माझे स्वप्न साकार झाले असे निधी सांगते. यापुढे नृत्यामध्येच करियर करण्याचा तिचा मानस आहे.

सवरेत्कृष्ट अभिनेता

जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या ‘कडमिंचे’ या मराठी एकांकिकेसाठी विशाल चव्हाण याने यंदाच्या युथचा सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा मान पटकावला आहे. ही एकांकिका स्मशानभूमीत काम करणाऱ्या एका कुटुंबावर बेतलेली असून त्यातील शिवराम या पात्रासाठी  विशालला सवरेत्कृष्ट अभिनेत्याचे सुवर्णपदक मिळाले. शाळेय जीवनात विशालला नाटक पाहण्याची आवड होती पण प्रत्यक्ष नाटक अनुभवण्याची आणि त्यात काम करण्याची संधी त्याला महाविद्यालयात आल्यावरच मिळाली. सुरुवातीस नाटकामागील समूहात काम करणाऱ्या विशालची यावर्षी पहिल्यांदाच मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली आणि संधीच सोने करीत त्याने सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. नाटकात काम करून मला आपण इतर सामान्य माणसांपेक्षा वेगळे आहोत याची जाणीव होते, असे विशाल सांगतो.

उत्कृष्ट वादपटू

साठय़े महाविद्यालयात पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या आदित्य कुलकर्णी याने या वर्षी युवा महोत्सवातील उत्कृष्ट वादपटूचा पुरस्कार पटकावत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. कोकणातून शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या आदित्यला सुरुवातीला वक्तृत्वाची फारशी आवड नव्हती त्याला अभियनयात रस होता. परंतु नाटकातून देहबोलीचा वापर करीत आपण रंगमंचावर वावरतो मग वाचिक अभिनय करीत वक्तृत्व ही करू शकतो याची जाणीव झाल्यानंतर आदित्यने वक्तृत्व स्पर्धामधून सहभाग घेण्यास सुरुवात केली. याआधी वक्तृत्वासाठी आदित्यने युवा महोत्सवात दोन वेळा सुवर्णपदक पटकावले असून विद्यापीठाच्या राष्ट्रीय संघातही तो सहभागी होता. या वर्षी वादविवाद स्पध्रेत ‘विद्यार्थी संघटना-चळवळ की राजकारण’ या विषयावर राजकारण या मुद्दय़ावर प्रभावीपणे आपले मत मांडत तो या वर्षीचा उत्कृष्ट वादपटू ठरला.

सवरेत्कृष्ट अभिनेत्री

जोशी-बेडेकर महाविद्यालयात बीएमएम मध्ये शिकणारी प्रणिता साळुंखे हिला ‘कडमिंचे’ या एकांकिकेतील तुळसा या पात्रासाठी सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचे सुवर्णपदक मिळाले आहे. अभिनयात काही रस नसणाऱ्या प्रणिताला महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतरच अभिनयाची गोडी लागली. गेल्या वर्षीपर्यंत समूहात काम करणाऱ्या तिला या वर्षी ‘कडमिंचे’मधील तुळसा साकारण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच संधीत तिला सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यापुढे अभिनयातच करियर करण्याचा प्रणिताचा विचार आहे.

युवा महोत्सवाचे आतापर्यंतचे विजेते

मराठी एकांकिका

  • जोशी-बेडेकर महाविद्यालय – कडिमचे
  • पोदार महाविद्यालय – इंन्ट्रोल
  • सी एच एम महाविद्यालय – भाव अपूर्ण श्रद्धांजली

शास्त्रीय नृत्य

  • जोशी-बेडेकर महाविद्यालय
  • रुईया महाविद्यालय
  • वझे केळकर महाविद्यालय
  • नॅशनल महाविद्यालय

मराठी वक्तृत्व

  • जोशी-बेडेकर महाविद्यालय
  • साठय़े महाविद्यालय
  • मॉडर्न महाविद्यालय