विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या एका अल्पवयीन मुलाकडे परवान्याची विचारणा केल्यामुळे मारहाण झालेल्या विलास शिंदे यांना सात दिवसांच्या मृत्यूच्या झुजीनंतर प्राण गमवावा लागला. समाजाचे रक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या रक्षकांचीच सुरक्षितता धोक्यात आल्यानंतर जनतेच्या सुरक्षिततेचा गाडा कोण ओढणार? नियमांची पायमल्ली न करणे, शिक्षेची भीती नसणे आणि स्वत:च्या भावनांवर नियंत्रण नसणे अशा अनेक कारणांमुळे पोलिसांवरील हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे.

सुसंवादाची गरज

camp-cपोलिसांकडे सत्ता असल्यामुळे अनेकदा ते सर्वसामान्य नागरिकांशी बोलताना अरेरावी करतात. अगदी सर्वच पोलीस उद्धट असतात असे नाही. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांना माझे समर्थन नाही. मात्र नाण्याची दुसरी बाजूही लक्षात घेणे गरजेचे आहे. पोलिसांनी नागरिकांशी सुसंवाद केला तर अनेक प्रश्न तेव्हाच सोडविले जाऊ शकतात. मात्र असे होताना दिसत नाही. तर नागरिकही अनेकदा शिक्षेची पळवाट असल्यामुळे पोलिसांवर हल्ले करतात. दोन्ही बाजूने चांगल्या पद्धतीने संभाषण झाले तर त्याचे रूपांतर भांडणात होणार नाही.

– वृषाली गावकर, डहाणूकर महाविद्यालय

मानवता संपत चालली आहे

camp-bपोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक पोलिसांच्याबाबतीत याचे प्रमाण अधिक आहे. नियमांचे पालन न करता सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे हे आता नेहमीचेच झाले आहे. नियम हे समाजात सुव्यवस्था राहावी यासाठी गरजेचे आहे. मात्र आजची पिढी मूल्य गमावून बसली आहे. पोलीस आपले काम करीत असतात, अशा वेळी त्यांचा आदर ठेवून नियम पाळले तर वाद उद्भवणार नाही आणि विनाकारण कुणाला आपला जीव गमवावा लागणार नाही. नागरिकांनी आपल्यातील मानवता जिवंत ठेवावी आणि नियमांचे, कायद्याचे पालन करावे.

– प्रणाली नार, साठय़े महाविद्यालय

मानसिकता समजून घ्यावी

camp-aपोलिसांवर होणारे हल्ले हा प्रश्न सोडविण्यासाठी नागरिक आणि पोलीसांची मानसिकता समजून घेण्याची गरज आहे. सध्या वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे वाढणारी लोकसंख्या आणि वाहनांबरोबर त्यांचा ताणही वाढत आहे. त्याशिवाय पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात संभाषणाचा अभाव आहे. तर अनेक पोलीस नागरिकांशी बोलताना उद्धटपणे बोलतात. आधीपासून पोलिसांची प्रतिमा लाचखाऊ असल्यामुळे नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी चीड आहे जी या घटनांमध्ये व्यक्त होत असते. मात्र यात एखाद्याचा जीव घेण्याची वृत्ती घातक आहे.

अमित जाधव, मुंबई विद्यापीठ