सांस्कृतिक कार्यक्रम असो  वा क्रिकेटचा सामना असो, भारत आणि पाकिस्तान हा आमनेसामने आले की, त्यात राजकारण होतेच होते. खेळ आणि मनोरंजन कार्यक्रमांच्या बाबतीत होणारे राजकारण चुकीचे असते असे तरुणाईचे मत आहे.

पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने किंवा काही दिवसांपूर्वी गायक गुलाम अलींना भारतात येण्यासाठी विरोध केला जात होता हे पूर्णत: चुकीचे असून यामुळे भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यापेक्षा दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. पाकिस्तानमधील काही दहशतवाद्यांमुळे पाकिस्तानातील संपूर्ण नागरिकांना दहशतवादी समजणे चुकीचे आहे. आपल्याकडे तर प्रत्येक मुस्लीम नागरिकावर शंका घेतली जाते. क्रिकेट हा खेळ आहे, यातून खिलाडूवृत्ती दाखविणे अपेक्षित असते. मात्र सध्या देशात भारत-पाक मुद्दय़ावरून राजकारण केले जात आहे जे भारताच्या भविष्यासाठी घातक आहे.

– कमल मुदगल, गुरुनानक महाविद्यालय.

मला पाकिस्तानी संघाने भारतात येऊ नये असेच वाटते. मुळात कुठल्याही पाकिस्तानमधील नागरिकाला वा कलाकाराला भारतात येण्यासाठी केलेला विरोध समर्थनीय आहे. आजपर्यंत पाकिस्तानसोबत सलोख्याचे संबंध ठेवूनदेखील भारतावर अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. तर आजही दर दोन दिवसांनी भारतीय सैनिक सीमेवर हुतात्मा होत आहेत. कित्येक वेळा भारतावर हल्ला करण्याऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने मदत केली आहे. अशा वेळी सलोख्याच्या संबंधांनी हे प्रश्न सुटणार नाही हे तर नक्की झाले आहे. आता यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. त्यामुळे बंदी हे पाऊल आहे असेच मला वाटते.

– ईश्वरी सुराशे, जोशी-बेडेकर महाविद्यालय

नागरिकांनी पाकिस्तानकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे अत्यंत गरजेचे आहे. पाकिस्तान म्हणजे दहशतवादी हे नाते इथपर्यंतच सीमित राहिले आहे. कुठल्याही परदेशातील नागरिकाला आपल्या देशात सुरक्षित वाटू नये ही धोक्याची चिन्हे आहे. पाकिस्तानमधील गायक, लेखक, क्रिकेट संघ यांना भारतात येण्यासाठी विरोध करणे यामुळे भारत-पाकिस्तानमधील नाते आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. मात्र याला भारतीय नागरिकांनी कधीच विरोध केला नाही. मलाही गुलाम अलींचा कार्यक्रम पाहण्याची इच्छा होती, मात्र वादाच्या वातावरणात गुलाम अलींनी येण्यास नकार दिला. तर पाकिस्तानी संघाला भारतात येण्यासाठी सुरक्षित वाटत नाही.

– सुकन्या पाटील, मुंबई विद्यापीठ.

भारत-पाकिस्तान नातेसंबंध हा राजकीय नेत्यांसाठी राजकारण करण्याचा विषय असतो. या मुद्दय़ाला धरून नेतेमंडळी आपले वर्चस्व आणि ताकद दाखवू पाहतात. मात्र तरुण पिढीवर याचा वाईट परिणाम होत असतो. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी कलाकारांना भारतात कार्यक्रम घेण्यासाठी भारतातील काही राजकीय पक्षांकडून विरोध केला जात होता. यानंतर आता पाकिस्तानी क्रिकेट संघालाही विरोध केला जात आहे. मात्र विरोध करणारे हे राजकारणी आहेत हे भारतीयांनी लक्षात घ्यायला हवे. कारण गुलाम अली हे गझलसम्राट म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्यासारख्या मान्यवर व्यक्तिमत्त्वाचा कार्यक्रम भारतात आयोजित केला जाणे ही कौतुकाची बाब आहे. मात्र कला, संगीत, खेळ अशा सर्जनशील क्षेत्रांमध्ये प्रांतभेद निर्माण करणे हे अतिशय धोक्याचे आहे. कदाचित या कलात्मक देवाणघेवाणीतून नक्कीच काही समाजहितार्थ गोष्टी वा नाते निर्माण होऊ शकते.

– समीर उबाळे, जे जे कला महाविद्यालय.