दिवाळीचा आनंद हा केवळ कुटुंब आणि मित्रांसह साजरा न करता त्याच्याही पलीकडे जाऊन साजरा करण्याची अनेकांची वृत्ती असते. हल्लीच्या नवतरुणाईपुढे तर अशी कुटुंबाची वेस ओलांडून आनंद साजरा करण्याचे अनेक मार्ग आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तर या काळात विशेष ऊर्मी दिसून येते. मग, अनाथ मुले वा वृद्धाश्रमांमध्ये मिठाईवाटप असो की एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन किंवा कॉलेज कट्टय़ावर बेत ठरवून केलेले एखादे सामाजिक कार्य, या सगळ्यातच ही तरुण मंडळी हिरिरीने सहभागी होतात. आपल्यातील कला-गुणांतून इतरांना आनंद देण्यासाठी दिवाळीसाठी वेगळ्या मार्गावर ही तरुणाई मार्गक्रमण करत असून त्यांच्या दिवाळीच्या आनंदाचे स्वरूप आता बदलत चालले आहे.

परीक्षेनंतरची मोठी सुट्टी, घरात रोषणाईची लगबग, फिरण्याची मौज, मिठाई-फराळाचा आस्वाद, नवे कपडे आणि सुहृदांच्या भेटी-गाठी असा महिनाभर पुरेल इतका भरगच्च मेनू दर वर्षी दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. लहान आणि युवांना याचे विशेष अप्रूप असल्याचे पाहण्यास मिळते. हल्ली मात्र आनंदाचे हे ‘१०० टक्के पॅकेज’ युवा मंडळी इतरांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन साजरी करताना दिसतात. यातून इतरांच्या उपयोगी पडणे हाच त्यांचा हेतू नसून नवी शिकवण, आपल्यातील कलेला वाव आणि यातून मिळणाऱ्या नव्या आनंदाचे समाधान असे युवांचे गृहीतक असते. यात आघाडीवर असतात ती महाविद्यालयीन मुले-मुली. मुंबईसह नजीकच्या बहुतांश महाविद्यालयातील मुले या काळात आदिवासी पाडय़ांवर जाऊन फराळ वाटप करणे, दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करणे वा आयोजनात सहभागी करणे, कंदूल कार्यशाळा किंवा दुर्गभ्रमंती करणे, पैसे काढून गरिबांना मदत करणे आदी नानाविध उपक्रमात सहभागी होताना दिसतात. या काळात महाविद्यालये स्वत:हून फार कमी उपक्रम राबवताना दिसली तरी विद्यार्थी मात्र आपापल्या परीने अनेक उद्योगांत रमलेले असतात. यंदा अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परीक्षा सुरूच असल्याने त्यातले विद्यार्थी यापासून लांब असले तर अन्य काही विद्यार्थी अशीच अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करत असून यातील अनेकांनी पर्यावरणपूरक दिवाळीचाही ध्यास घेतला आहे.

प्रत्येक सणाला नव्याने शिकते..

दर वर्षी मी एखाद्या सणाच्या वेळी नव्याने काही तरी शिकण्याचा प्रयत्न करते. यातून आनंद साजरा करणे हा हेतू असला तरी समाजातील प्रत्येकापर्यंत आपण नवे काही तरी घेऊन पोहोचावे हा त्यामागचा हेतू असतो. यंदा मी कंदील बनवण्यास शिकले आहे. आणि नुसतेच न शिकता १०० रुपयांना एक याप्रमाणे मी आत्तापर्यंत पाच कंदील विकलेदेखील आहेत. गेल्या वर्षी दिवाळीत मी अशीच भेटकार्डे बनवण्यास शिकले होते व त्यांची विक्री केली होती. वर्षभर प्रत्येक सणाला मी असा एक नवा ध्यास जपते. यासाठी मी ‘युटय़ूब’चीही मदत घेतली व त्यावरून एक कंदील शिकले. याचबरोबर आमच्या शिक्षिका शोभा कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली दर वर्षी एक सामाजिक कार्यदेखील करतो. विलेपार्ले पूर्वेला असलेल्या बामणवाडा येथे आम्ही शालेय मुलांना कंदील बनवण्यास शिकवले. त्यांच्या वयोगटाप्रमाणे विविध आकारांचे कंदील त्यांना शिकवले. यंदाच्या दिवाळीत सांताक्रूझ वाकोला येथे एका खासगी क्लासमध्ये आम्ही हा उपक्रम राबवणार आहोत.

– प्रियांका मयेकर, रूपारेल महाविद्यालय.

शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम

दिवाळीनिमित्त कलेचा वारसा पुढे न्यावा हा माझा हेतू असतो. मला व माझ्या काही मित्रांना शास्त्रीय संगीताची खूप आवड असल्याने आम्ही दिवाळीच्या दिवसांत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करण्याचे ठरवले. चार वर्षांपूर्वी गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या कार्यक्रमांना सुरुवात केली. यातूनच आमच्या ‘अभ्यंग संगीत साधना मोहत्सवास’ सुरुवात झाली. मी स्वत: याचे आयोजन करतो. हल्ली बरेच तरुण पाश्चात्त्य संगीताकडे वळत असले तरी शास्त्रीय संगीताकडे वळणाऱ्या युवा पिढीचा ओढा अधिक आहे. याच युवा पिढीला आम्ही या महोत्सवात व्यासपीठ उपलब्ध करून देतो. यंदा २७ ऑक्टोबरला पुण्यात आणि २९ ऑक्टोबरला साताऱ्यात हा कार्यक्रम होईल. संपूर्ण आजवर दिवाळीत हे कार्यक्रम झाले असून २०१४ मध्ये दिवाळीत हा कार्यक्रम झाला होता. दिवाळीचा आनंद साजरा करण्याची प्रेरणा या कार्यक्रमांतूनच मिळाली.

– मुकुंद पाबळे, मुंबई विद्यापीठ (आयडॉल विभाग)

‘फटाके टाळा’ हे सांगण्यातच आनंद..

ग्रामीण भागातील दिवाळी आणि शहरी भागातील दिवाळी साजरी करणे यात बराच फरक आहे. हल्ली गावोगावी फटाक्यांची दुकाने सुरू झाल्याने येथे त्यांचा खप वाढला आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद फटाके फोडून साजरा करण्यात अनेक जण धन्यता मानतात. फटाके फोडण्याच्या स्पर्धेत काही गावांतील वीज जाण्याचे प्रकारही घडले आहेत. अखेर दिवाळीचा आनंद फटाके फोडण्यात नाही हा संदेश आम्ही आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे ठरवले. यासाठी तलासरी तालुक्यातील चार-पाच शाळा आणि दोन महाविद्यालयांत जाऊन आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी व प्राध्यपकांनी फटाके फोडण्याच्या दुष्परिणाम दाखवून देणारे कार्यक्रम केले. किमान दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात आम्ही यशस्वी झालो. हाच आमचा दिवाळीचा वेगळ्या स्वरूपाचा आनंद ठरला.

– डॉ. भगवान राजपूत, 

प्राचार्य, कॉ. गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालय, तलासरी

संकेत सबनीस sanket.sabnis@expressindia.com