24 February 2018

News Flash

दिवाळी युवकांक हवा..

१५ जानेवारी १८९६ मध्ये काशिनाथ मित्र यांनी ‘मनोरंजन’ या मासिकाची सुरुवात केली.

संकेत सबनीस | Updated: November 3, 2016 12:13 AM

दिवाळीच्या आनंदात तिखटगोड चवीचा फराळ जितकी लज्जत आणतो, तितकीच लज्जत दिवाळी अंकांच्या साहित्यरूपीफराळातून अभिजात वाचकांना मिळते. किंबहुना खरे वाचक या दोन्हीपैकी काकणभर महत्त्व हे दिवाळी अंकांनाच देतात. साहित्याची आवड असणाऱ्यांना तर या अंकांच्या रूपाने मोठी मेजवानीच मिळते. मात्र, हरतऱ्हेच्या वयोगटासाठी असलेल्या या दिवाळी अंकांचा एक महत्त्वाचा वाचकवर्ग हल्ली याकडे पाहायला तयार नाही, याची खंत आहे. अर्थात आजच्या तरुणाईचे भावविश्व त्यात मांडले जात नसल्याची तक्रारही करण्यात येत आहे. ती खरी म्हणायची तर अंकनिर्मिती करणाऱ्यांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आलेलं नाही, असाही एक यातून अर्थ काढावा लागेल..

१५ जानेवारी १८९६ मध्ये काशिनाथ मित्र यांनी ‘मनोरंजन’ या मासिकाची सुरुवात केली. या मासिकाला त्या काळात चांगला वाचकवर्गही मिळाला. काही वर्षांतच मित्र यांच्या हाती परदेशातील एक मासिक लागले आणि या मासिकापासून प्रेरणा घेत दिवाळीत अशा प्रकारचा अंक का निघू नये? हा प्रश्न घेऊन त्यांनी १९०९ मध्ये दिवाळी अंकाच्या परंपरेची रुजुवात घातली. आज दिवाळी अंकांचे अवकाश पार परदेशापर्यंत विस्तारले आहे.

आचार्य अत्रे, दुर्गाबाई भागवत, जी. ए. कुलकर्णी, ग. त्र्यं. माडखोलकर, लक्ष्मणशास्त्री जोशी, वि. दा. सावरकर, वि. आ. बुवा, पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर यांनी दिवाळी अंकांत लेखन केले आहे. मराठी साहित्याला ललामभूत ठरलेल्या या दिवाळी अंकांच्या परंपरेला १०७ वर्षांचा इतिहास आहे. आजही अगदी हजारो अंक दिवाळीच्या काळात निघत आहेत. वाचकांच्या यावर उडय़ा पडत असल्या तरी एक विशिष्ट वयोगट या अंकांपासून दुरावतोय. तो आहे आजचा युवावर्ग व त्यातही आजचे महाविद्यालयीन युवा. जे हल्ली दिवाळी अंक वाचताना आढळत नाहीत. कालांतराने ‘अरे यार, दिवाळी अंक म्हणजे काय?’ असे विचारण्यापर्यंत ही मंडळी गेली तर कोणी आश्चर्य वाटून घेऊ नये. या मंडळींकडे हे अंक न वाचण्याची कारणेही असंख्य आहेत. म्हणजे, दिवाळीच्या काळात परीक्षा असतात दिवाळी अंक वगैरे कोण वाचेल किंवा वाचायला आम्हाला वेळ वगैरे कुठे असतो या छापाची उत्तरे यांच्याकडे तयार असतात. मात्र, दिवाळी अंकांचे एकूण वैभव माहीत असलेले काही ठरावीक महाविद्यालयीन तरुण हे अंक का वाचत नाहीत याचीही कारणे तळमळीने देतात. आमचे भावविश्व मोहरून टाकेल असे या अंकात आम्हाला काही आढळतच नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. हे नेमके कारण सध्याच्या दिवाळी अंकांच्या एकूण स्वरूपावर बोट ठेवणारे आहे. कथा, लेख, माहितीपर लेख, कविता यापेक्षाही वेगळे जे आम्हाला वाचनाकडे पुन्हा ओढून आणेल असे काहीतरी असावे ही प्रमुख मागणी या युवकांची आहे. तसेच, समाजमाध्यमांचा माहिती आणि अन्य बाबींसाठी प्रभावी वापर करणारी ही मंडळी त्यांना हव्या त्या गोष्टी माहितीच्या महाजालातून मिळवितात. त्यामुळेही अनेकांना या अंकांची गरज भासत नाही, असेही काहींचे म्हणणे आहे. या अंकांवर नव्या जमान्याचा आणि तरुणाईला आवडेल असा तोडगा म्हणून काही महाविद्यालयीन तरुणांनी मिळून यंदा पहिल्या मराठी ‘ध्वनिमुद्रित दिवाळी अंकाची’ निर्मिती केली आहे. ज्यात तरुणाईला साजेसे लेख थेट ध्वनिमुद्रित करण्यात आले आहेत. म्हणजेच दिवाळी अंकांचे स्वरूप जर बदलले तर मोठा वर्ग या अंकांकडे पुन्हा वळेल.

काळ परीक्षांचा असतो..

माझ्या घरी दिवाळी अंक येतात. अंक वाचण्यात मला रस आहे. मात्र नेमके दिवाळीच्या काळात किंवा दिवाळीनंतर परीक्षा असतात. त्यामुळे इच्छा असूनही दिवाळी अंक वाचता येत नाही. तसेच हल्ली अभ्यासक्रमाचा आवाकाही वाढल्याने अभ्यासाकडेच जास्त लक्ष द्यावे लागते. त्याचाही परिणाम विद्यार्थ्यांच्या दिवाळी अंक किंवा अवांतर वाचनावर होतो.

प्रिया तरडे, डी. जी. रुपारेल महाविद्यालय

 

युवकांचा अंक हवा

महाविद्यालयात विद्यार्थी दिवाळी अंक वाचतात का याबद्दल शंकाच आहे. साहित्याच्या दृष्टीने हे अंक प्रगल्भ असले तरी या अंकांमध्ये आमच्या पिढीला काही मिळेल असे दिसत नाही. आमच्या भावविश्वात हल्ली फार वेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्याचे प्रतिबिंब या अंकांमध्ये उमटताना दिसत नाही. यात एकंदर तरुण वाचत नाहीत असेदेखील नाही त्यांना हव्या त्या, आवडेल त्या बाबी ते शोधून वाचतातच.

सौरभ नाईक, मुंबई विद्यापीठ

 

वृत्तपत्र तरी वाचावे..

सध्याच्या विद्यार्थ्यांची मानसिकता पाहता ते दिवाळी अंक वाचत असतील असे वाटत नाही. अनेक पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध असताना त्यातही विशेष करून समाजमाध्यमांचा पर्याय त्यांच्यापुढे असल्याने ते अंकांकडे वळत नाहीत. किंबहुना ते रोजचा पेपर वाचत असतील की नाही याबाबतही शंका आहे. दिवाळी अंकांचे स्वरूप हे ठरावीक असते. त्यामुळे नव्या पिढीच्या मुलांसाठी वेगळा दिवाळी अंक असावा.

सुहास पेडणेकर, प्राचार्य, रुईया महाविद्यालय

 

इतर साधनांची विपुलता

तरुणवर्गात मराठी वाचन करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दिवाळी अंक हे करमणूकप्रधान असतात. माहितीपर दिवाळी अंक हे कमी असतात. ही माहिती तरुणांना समाजमाध्यमांवर व इंटरनेटवर उपलब्ध असते. त्यामुळे मुद्दाम दिवाळी अंक घेऊन ते वाचण्यात तरुणांना फारसा रस नसतो. परंतु, त्यांना एखादा प्रकल्प दिला तर ते अशा अंकांकडे वळताना दिसतात. विद्यापीठातील विद्यार्थी २२ ते ४० वयोगटातील आहेत.  मात्र त्या आतील वयोगटाकडे हल्ली माहिती मिळवण्यासाठी अन्य साधने असल्याने त्यांना अंकांमध्ये रस नसतो.

डॉ. प्रतिभा गोखले, निवृत्त ग्रंथपाल, मुंबई विद्यापीठाचे ग्रंथालय

First Published on November 3, 2016 12:13 am

Web Title: diwali ank
  1. No Comments.