‘शोर’ या शब्दाच्या अपभ्रंशातून सुरू झालेल्या दक्षिण मुंबईतील ‘चोर’ बाजारावरील नकारात्मक वलय पुसून त्या परिसरातील साहित्यिकांचा वावर, चित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींच्या अनुभवाला मिठीबाई व टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांनी माहितीपटातून समाजासमोर आणले आहे. चोर बाजार हा परिसर ‘चोरी’ किंवा ‘जावेद चिकना’ यांसारख्या गुंडांसाठी न ओळखता या परिसरातील जुने चित्रपट व जावेद अख्तर यांसारख्या दिग्गजांच्या नावाने ओळखला जावा, असा दृष्टिकोन या माहितीपटातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

चोर बाजार हा परिसरात चोरीच्या वस्तू विकण्याचा बाजार या नावाने ओळखला जातो. मात्र चोरीच्या वस्तू मिळण्याव्यतिरिक्त या बाजारात १०० वर्षांपूर्वीच्या वस्तूंचा खजिना आहे. तर चित्रपट व साहित्यिक क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचे या परिसरातील दुकानदार व रहिवाशांशी चांगले नातेसंबंध आहे. चोर बाजाराची खरी ओळख समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विलेपार्लेतील मिठीबाई व टाटा सामाजिक विज्ञान संशोधन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी चोर बाजारावर माहितीपटाची निर्मिती केली आहे. गेल्या महिन्यात मिठीभाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांचा माहितीपट महाविद्यालयात दाखल केला.

मास मीडिया याचे शिक्षण घेणाऱ्या मिठीबाई महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी चोर बाजारावर १० मिनिटांचा माहितीपट तयार केला आहे. या मुलांनी चोर बाजारातील अनेक दुकानदारांच्या मुलाखती घेतल्या. रमजान काळात चोर बाजारात विविध धर्माचे नागरिक खाण्याचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. या परिसरातील ‘ओल्ड इज गोल्ड’ या दुकानात जुन्या वस्तू, जुन्या चित्रपटांच्या कॅसेट्स, पोस्टर्स मिळतात. संजय लीला भन्साली या दिग्दर्शकाने ‘देवदास’ या चित्रपटासाठी मॅग्नीफायर या दुकानातूनच मागविले होते. परप्रातीयांसाठीदेखील चोर बाजाराविषयी वेगळे आकर्षण आहे. दररोज येथे अनेक पर्यटक खरेदीसाठी येतात, असे मिठीबाई महाविद्यालयाच्या अमित पांडे या विद्यार्थ्यांने सांगितले.

चोर बाजारात आठवडय़ाच्या शुक्रवारी पहाटेपासून विविध वस्तूंची बाजार भरतो. तर जुन्या वस्तूंचा बाजार इतर दिवसांमध्ये सुरूच असतो. अनेक चित्रपटांमधून दाऊद इब्राहिम, जावेद चिकना या गुडांचा अड्डा म्हणून चोर बाजाराचे नाव घेतले जाते. मात्र या बाजारात जुने साहित्यिक, जावेद अख्तर यांसारखे दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा वावर होता हे प्रकाशात आणले जात नाही, असे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची विद्यार्थिनी सृष्टी मल्होत्रा हिने सांगितले. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून टीसच्या विद्यार्थ्यांनी चोर बाजारातील नागरिकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. शुक्रवारी पहाटे सुरू होणाऱ्या बाजारात जाऊन चित्रीकरण केले आहे. सध्या चित्रीकरणाचे काम पूर्ण झाले असून यातून साधारण एक तासांचा माहितीपट तयार करण्यात येणार आहे.

२०१६ साली साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केलेल्या जेरी पिंटो या साहित्यिकाने ‘बॉलीवूड पोस्टर्स’(२००८) या पुस्तकासाठी चोर बाजारातील मिनी मार्केट दुकानाचे मालक शाहिद मन्सुरी यांची मदत घेतली होती. तर दिग्दर्शक सुभाष घई व नामांकित व्यक्ती चोर बाजारातून विविध वस्तू मागवीत असतात. पुनर्विकास प्रकल्पात चोर बाजारातील काही भागांचा समावेश असल्यामुळे यापुढील पिढीला मुंबईतील १५० वर्षे जुनी हेरिटेज वास्तू पाहता येणार नाही, असे सृष्टीने सांगितले. सध्या चोर बाजारात वापरले जाणारे शब्द, या परिसरात मिळणारी पुस्तके, विविध वस्तू यांचे संशोधन सुरू आहे व याचे दस्ताऐवजीकरणाचे काम सुरू आहे. चोर बाजार, भेंडी बाजारात मोहम्मद रफी, नौशाद अली व मराठीतील नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे यांसारख्या कवींची सोबत लाभली आहे. या दुर्लक्षित गोष्टी समाजासमोर आणण्याचा प्रयत्न संशोधनाच्या माध्यमातून सुरू आहे,

असे उर्दू मर्कझ या संस्थेच्या झुबेर शेख यांनी सांगितले.