उत्तेजक द्रव्यांबाबत जागृतीची गरज

काही दिवसांपूर्वी कुस्तीपटू नरसिंह यादव यांना उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र त्यानंतर नाडाने हा आरोप चुकीचा ठरवत त्यांची निर्दोष मुक्तता केली. खेळ विश्वात उत्तेजक पदार्थाचे काही नियम आहेत. खेळाडूंना आजारावरही औषध घेतले आणि त्यादरम्यान उत्तेजक चाचणी झाली तर खेळाडू अडकण्याची शक्यता असते. मात्र आपल्या देशात खेळाडूंना याबाबतची माहिती देणाऱ्यांची वानवा आहे. अनेकदा माहीत नसल्यामुळे भारतीय खेळाडू अनेक स्पर्धासाठी मुकले जातात. त्यामुळे नरसिंह यादव प्रकरणानंतर सरकारला जाग आली असणार हे नक्की. मात्र सरकारने  खेळाडूंना उत्तेजक द्रव्यांबाबत ज्ञान देणारी यंत्रणा सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे.

नक्कीच, भारतात आता कुठेतरी क्रीडा क्षेत्राला महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे आणि त्यातच डोपिंगने तोंड वर काढले आहे. आपले खेळाडू हे तसे खेळाविषयी निष्ठा ठेवणारे आणि प्रामाणिक असतात, पण त्यांना उत्तेजकांविषयी पुरेसे ज्ञान नसते. अशा वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. खेळाडूंना घडवताना त्यांच्या जडणघडणीपासूनच उत्तेजकांचे ज्ञान त्यांच्या प्रशिक्षकाने द्यायला हवे. खेळाच्या प्राथमिक टप्पातच उत्तेजक प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन झाले तर डोपिंगचा विळखा क्रीडा क्षेत्राला कधीच बसणार नाही.

– नारायण परब, साठय़े महाविद्यालय

सर्वसामान्य औषधांच्या सेवनालाही उत्तेजक द्रव्यांमध्ये गणले जाऊ लागल्याने भारतीय खेळाडूंना याविषयीचे ज्ञान देण्यासाठी डॉक्टर किंवा मार्गदर्शकाची गरज असून त्या दृष्टीने पाउल उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण भारतीय खेळाडू याबाबत जागृत नसतात, त्यांना जिल्हा, विभागीय, राज्य, राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत भाग घेताना जगाच्या कानाकोपऱ्यात जावे लागते व तेथील हवामानाचा, खाण्यापिण्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. सर्दी, पोटदुखी, ताप यांसारखे काही झाल्यास जी काही औषधे घेतली जातात त्यात उत्तेजक द्रव्ये आहेत की नाही याचे खेळाडूंना ज्ञानच नसते. त्यानंतर उत्तेजक चाचणीत हे खेळाडू दोषी ठरतात आणि त्यांच्यावर कारवाई  होते. म्हणून अशा वेळी त्यांच्यासोबत डॉक्टर असणे आवश्यक आहे. मी एक स्वत: तलवालरबाजीची खेळाडू असल्या कारणाने यासगळ्याकडे डोळसपणे पाहते.

– प्राजक्ता बोरकर, रुईया महाविद्यालय

मुळातच आपण दोन्ही बांजूनी विचार करायला हवा. आपण म्हणतो की, खेळाडूंना उत्तेजक द्रव्याच्या मार्गदर्शनासाठी डॉक्टरांची आवश्यकता असते, पण या डॉक्टरांची फी सर्वसामान्य खेळाडूंना परवडणारी नसल्याने शासनानेही या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच डोपिंगच्या संस्थेकडून उत्तेजक औषधांबाबत जी यादी प्रसिद्ध केली जाते त्यात कोणती औषधे घेऊ नये याची माहिती दिली जाते असे करण्याऐवजी कोणती औषधे घेऊ नयेत याची माहिती दिली तर ते अधिक सोयीचे ठरेल.

–  आकाश नवरे, साठय़े महाविद्यालय