पाणी आणि वीज हे आपल्या दैनंदिन जीवनाशी अधिक निगडित असलेल्या बाबी आहेत. आपली सर्व कामे यांच्या वापरातूनच सुकर होत असतात; परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यभरात पाणी व विजेचा तुटवडा जाणवत असल्याने आता पावसाळ्यापर्यंत कसे निभावून न्यायचे, असा प्रश्न सर्वासमोरच उभा आहे. यात ग्रामीण भागात असणाऱ्या दुष्काळी परिस्थितीच्या  झळा आता शहरांपर्यंत पोहोचू लागल्या आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या महानगरात आता पाणी व विजेचा वापर करताना काळजी घेतली जात आहे. घरोघरी पाणी व वीज जपून वापरण्यासाठी जसे प्रयत्न होत आहेत, तसेच प्रयत्न महाविद्यालायंमध्येही जाणीवपूर्वक केले जात आहेत.

महाविद्यालयांच्या भव्य इमारती, अनेक वर्ग, विद्यार्थ्यांची संख्या यामुळे पाणी व वीज मोठय़ा प्रमाणात वापरले जाते. विशेषत: वसतिगृहे, स्वच्छतागृहे व प्रयोगशाळांमध्ये अधिक पाणी व वीज वापरले जाते. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा व विजेचा वापर जपून करण्यासाठी सध्या निरनिराळे उपाय केले जात आहेत. यात काही ठिकाणी पावसाचे पाणी साठवण्यासाठी व्यवस्था केली जात असून त्यातून पाणी जमिनीमध्ये झिरपण्यसाठी प्रयत्न केले जात आहेत. तर काही महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळांमधील पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची बचत केली जात आहे. तसेच सौर ऊर्जेचा वापर करून महाविद्यालये विजेच्या प्रश्नावरही उत्तरे शोधत आहेत. मात्र पाणी आणि विजेच्या संवर्धनासाठी मोठी यंत्रणा निर्माण करावी लागते. अशी यंत्रणा निर्माण करण्यासाठी महाविद्यालयांकडे पुरेसा निधी, जागा उपलब्ध नसल्याने व्यापक व्यवस्था जरी नाही करता आली तरी आपापल्या स्तरावर मुंबईमधील महाविद्यालये पाणी व विजेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत. यातील काही मोजक्या महाविद्यालयांचे प्रयत्न..

महाविद्यालयात ठिबक सिंचन

भव्य कॅम्पस लाभलेले विद्याविहारमधील के.जे. सोमय्या महाविद्यालय पाणी आणि वीज बचतीसाठी स्वयंस्फूर्तपणे विविध उपाय करत आहे. महाविद्यालायाच्या विस्तीर्ण जागेत असणारी बाग व इतर हिरवळीवर आधी पाण्याचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात असे; परंतु महाविद्यालयाने इथे पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था केल्याने आता झाडांना व हिरवळीवर अतिरिक्त जाणारे पाणी वाचले जाते. तसेच पावसाचे पाणी साठवण्यासाठीही इथे व्यवस्था करण्यात आली असून दरवर्षी सुमारे दीड ते दोन लाख लिटर पाणी यातून उपलब्ध होत असते. या पाण्याचा वापर स्वच्छतागृहांमध्ये केला जात असतो. पाणी बचतीच्या या उपायांबरोबरच पाण्याच्या प्रदूषणाला आळा घालणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून महाविद्यालयाकडून पाण्याचे प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेतली जाते. यासाठी रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतून बाहेर टाकल्या जाणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यातून रसायने काढून घेण्यासाठी ‘निरी’ या संस्थेने शोधलेल्या ‘फायरॉइड’ या तंत्राचा वापर केला जातो. यात प्रयोगशाळेतून बाहेर येणाऱ्या पाण्याला आधी गाळून त्यातील मोठे कण बाजूला केले जातात. त्यानंतर पुढे हे पाणी विशिष्ट प्रकारच्या वनस्पती लावलेल्या जागेत सोडले जाते. या वनस्पती पाण्यातील प्रदूषके शोषूण घेतात. त्यामुळे या पाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यास मदत होते. पाणी बचतीच्या या उपायांबरोबरच वीज बचतीसाठीही येथे प्रयत्न केले जात आहेत. यात सौर ऊर्जेच्या वापराबरोबरच महाविद्यालयाचे वीज वापर परीक्षण करून विजेचा वापर किती केला जात आहे, कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात वीज वापरली जात आहे याचा अभ्यास करून विजेच्या वापरासाठी नियोजन केले जाते.

प्रयोगशाळेतील पाण्याचा पुनर्वापर

पाण्याच्या बचतीसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातील प्रयोगशाळेत पाण्याचा पुनर्वापर केला जातो. येथील रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत

कंडेन्सर वापरून केल्या जाणाऱ्या प्रयोगांमध्ये वापरलेले पाणी वाया जाऊ न देता त्याचा पुन्हा वापर केला जातो. यात कंडेन्सरला दिले जाणारे पाणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एका टबमध्ये जमा केले जाते.

या पाण्याला पुन्हा पंपाच्या साहाय्याने त्याच प्रयोगात वापरून

पाण्याची बचत केली जाते. पूर्वी या प्रयोगामध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी वाया जात असे; परंतु आता या पाण्याचा पुनर्वापर केला जात असल्याने मर्यादित पाण्यात खूप वेळा हा प्रयोग करणे शक्य झाले आहे. अशा प्रकारे नेहमीच्याच प्रयोगात वाया जाणाऱ्या पाण्याची बचत करण्याचा साधा असला तरी स्मार्ट मार्ग महाविद्यालयात अवलंबल्याने पाणी जपून वापरण्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंतही पोहचला आहे.

सौर तबकडय़ांतून विद्युत प्रावाह

रुपारेल महाविद्यालयाने पावसाचे पाणी साठवून भूजल पातळी वाढवण्यासाठी व्यवस्था तर केलीच आहे; परंतु याशिवाय वीज बचतीसाठीही विविध प्रकारच्या उपायांमधून प्रयत्न केले जात आहेत. महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये सौर जलतापक वापरून वीज न वापरता पाणी गरम केले जाते. तसेच सौर ऊर्जेच्या साहाय्याने विविध कामांसाठी लागणारी वीजही मिळवली जाते. सौर तबकडय़ांचा वापर करून मिळवलेली वीज भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत विविध प्रयोगांसाठी वापरली जाते. याच विजेचा वापर करून सूचना फलकांवरील दिवेही उजळले जातात. त्यामुळे यासाठी लागणारी वीज वाचवली जाते. या वीज व पाणी बचतीच्या उपायांबरोबरच याविषयीच्या जागृतीसाठीही महाविद्यालय प्रयत्न करत असते. गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागात असणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थी सुट्टीमध्ये गावाला जाण्याऐवजी मुंबईमध्येच राहणे पसंत करत आहेत. त्यामुळे यंदा महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना सुट्टीमध्येच पाणी व वीज संवर्धनासाठी  विविध प्रकल्पांचा अभ्यास करायला सांगितले जाणार आहे.

पाणी हे जीवन व झाड हे सावली उपक्रम

स्वच्छतागृहे व प्रयोगशाळांमध्ये पाण्याचा मोठय़ा प्रमाणात वापर होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागृती केल्यास त्याचा वापर जपून केला जाईल. यासाठी दादर येथील कीर्ती महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पाण्याचा वापर जपून करण्याबाबत नेहमीच सूचना दिल्या जातात. तसेच महाविद्यालयाच्या बागेत झाडांना नळाने पाणी न देता िस्प्रकलरचा वापर करून पाण्याचा अपव्यय टाळला जातो. याशिवाय स्वच्छतागृहांमधील नळ, फ्लश यांना कमी दाबाने पाणीपुरवठा करून या ठिकाणी पाण्याचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच महाविद्यालयाने गेल्या काही वर्षांपासून ‘पाणी हे जीवन व झाड हे सावली’ ही अभिनव कल्पना राबवून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या स्वयंस्फूर्त उपक्रमातून पाणी व झाडे यांच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. याशिवाय येत्या काळात सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठीही प्रयत्न केला जाणार आहे. तर वीज बचतीसाठीही पंखे, दिवे गरज नसताना बंद ठेवण्याबाबत विद्यार्थ्यांना नेहमीच सांगितले जाते.

सौर जलतापकाने वीज बचत

आपल्याकडे सहसा विविध कार्यक्रमांमध्ये, परिषदांमध्ये सहभागींना, पाहुण्यांना पिण्यासाठी सीलबंद बाटल्यांमधून पाणी देण्यात येते; परंतु त्या बाटल्यांमधील सर्व पाणी प्यायले जातेच असे नाही. त्यामुळे खूपवेळा यातील किमान अध्रे पाणी हे न प्यायल्याने वाया जात असते. माटुंगा येथील वेिलगकर व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेने मात्र यात पाणी बचतीसाठी गेल्या काही दिवसांपासून एक उपक्रम राबवला आहे. तो म्हणजे महाविद्यालयात नेहमी होणाऱ्या कार्यक्रम, परिषदांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सीलबंद बाटल्यांचा वापर टाळून सर्वाना नेहमीप्रमाणे साधे पाणी दिले जाते. महाविद्यालयाच्या साऱ्याच कार्यक्रमात हे कटाक्षाने पाळले जाते. त्यामुळे या कार्यक्रमांतून नेहमीप्रमाणे पाणी वाया न जाता आवश्यक तेवढेच पाणी वापरले जाते. याशिवाय पाण्याबरोबरच वीज बचतीसाठीही प्रयत्न करण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाच्या वसतिगृहांमध्ये सौर जलतापक बसवण्यात आले आहे. यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पारंपरिक विजेचा वापर न करताच सौर ऊर्जेच्या साहाय्याने अंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध होत असते.