‘लेट्स मीट अप फ्रेंड्स’ असा मेसेज परवा वॉट्सअ‍ॅपच्या ‘सतरंगी’ ग्रुपवर आला. बस्स्.. तो एक मेसेजच अक्षरश: अबोल असलेला ग्रुप अ‍ॅक्टिव्ह करण्याचं स्रोत ठरला. खरंच मग लक्षात आलं, अरेच्चा किती दिवस झाले कॉलेज कट्टय़ाचं दर्शन काही झालंच नाही. झालं तर, मग ठरलं पुन्हा बोलकं करायचं कट्टय़ाला. पण, क्षणातंच वाटलं की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जर दोन महिन्यांची सुट्टी मिळू शकते, तर मग या कट्टय़ाला नको का काहीशी सुटका? पण हीच सुटका कालांतराने भेडसावणाऱ्या शुकशुकाटाचं रूप घेते आणि जाणवू लागतं ते कट्टय़ाचं एकटेपण. असाइन्मेंट्स, प्रोजेक्ट्स, लेखी परीक्षा झाल्या आणि महाविद्यालयीन वर्तुळात साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. ज्युनिअर कॉलेज, सीनिअर (डिग्री) कॉलेज यांच्या जवळपास संलग्न असणाऱ्या परीक्षा या सुमारास संपल्या आहेत. वर्षभर सुरू असणारा तो धुमाकूळ, महाविद्यालयातील प्रोफेसर्स आणि इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडे काही ना काही कामांसाठी मांडलेला उच्छाद, ‘आयडीची लेस द्या’ असं प्युनकडे सततचं लावलेलं रडगाणं, या साऱ्याला आता काहीसा अल्पविराम मिळाला आहे.
सततचे गजबजलेले कॉलेज कॅम्पस, चहाच्या टपऱ्या, मदानं, कट्टे यांसारख्या भागात सध्या अनपेक्षित शांतता आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे संपलेल्या परीक्षा. एरवी एकमेकांची टेर खेचणारी, अभ्यासाला कमीत कमी मनावर घेणारी पण तरीही ‘कट्टय़ावर’ मात्र कमालीची हुशारी आणि चपळाई दाखवणारी मंडळी आता कट्टय़ापासून काहीशी दुरावली आहेत. यापकी काही जण फक्त दोन महिन्यांसाठी तर काही जण कायमचेच या ‘कॅम्पस आणि कट्टय़ा’पासून दूर गेले आहेत. रुईया कट्टा, नरे पार्क, शिवाजी पार्क, गिरगाव चौपाटी यांसारख्या ठिकाणी सहसा लेक्चर्स बंक करून किंवा मग कॉलेजला दांडी मारून जमणारी गर्दी काहीशी कमी झाली आहे. याला उन्हाचा तडाखा म्हणा किंवा मग सुट्टीमुळे आळसावलेला आमच्या ‘कॉलेजिअन्सचा अ‍ॅटिटय़ुड.’
हे ओस पडलेले कॉलेज कट्टे पाहिले की उगाचच प्रश्न पडतो की, ‘एकाएकी इथली गर्दी गेली तरी कुठे? सुट्टीतही स्वत:ला गुंतवून ठेवणारी आजची ही तरुणाई कट्टय़ापासून, कॉलेजच्या वातावरणापासून दूर असली तरीही ‘सोशल नेटवìकग साइट्स’ सोबतचा तसूभरही दुरावा या मंडळींना सहन होत नाही. नेहमीच्या भेटण्याच्या ठिकाणांवर गर्दी नसली तरीही काही ‘वॉट्सअ‍ॅप ग्रुप्स’ किंवा मग ‘पर्सनल चॅट्स’ मात्र अविरतपणे बहरत असतात. त्यामुळे दोस्तांमधला हा टच सुट्टीच्या निमित्ताने काही कमी झाला नाही, असंच म्हणावं लागेल. हो, पण त्या तुलनेत कॉलेजिअन्सचे राग-रुसवे, भांडणं, खुरापती, काहीसा टप्पोरी अंदाज कट्टय़ांचा बहर मात्र कमी झाला आहे. ठरलेल्या ठिकाणी ( सहसा कट्टय़ांवर ) दररोज वायफळ पण, एंटरटेिनग, एक्सायटिंग, इन्ट्रेस्टिंग आणि नेवरएिण्डग अशा गप्पा खरं तर असे ‘गॉसििपग’ केल्याशिवाय कॉलेजिअन्सचा दिवसच उलटत नाही. कोण कोणाला ‘डेट’ करतंय इथपासून ते पुढच्या वर्षीच्या अभ्यासक्रमात काय बदल केले असतील यावरच्या गंभीर आणि चौफेर चर्चाही या ‘कट्टारूपी सभामंडपात’ रंगतात. कोण काहीही म्हणो, कितीही नावं पाडो पण तरुणाईचे हे असे ‘परंपरागत अड्डे’ (जसे रुईया कट्टा) शक्यतो बदलणं कठीणंच. सध्या फक्त या अखंडत्वाला काहीसा विराम मिळाला आहे हेच खरं.
शनिवार-रविवारी मात्र कॉलेजिअन्सच्या भेटीगाठी, हसून हसून थकवणारी खोडकर थट्टा, उपरोधिकपणे ग्रुपमध्ये एकालाच निशाणा करीत ‘त्याची’ किंवा ‘तिची’ उडवलेली खिल्ली पाहण्याची संधी काही ठिकाणांवर अनुभवायला मिळते. त्यामुळे कट्टे शांत असले तरीही ‘कट्टेकरी’ मात्र ‘शांताराम’ घेण्याच्या मूडमध्ये नाहीत हेच खरं. कट्टे आणि आसपासच्या परिसरातील हीच अनपेक्षित शांतता पुन्हा भंग होईल, ती थेट जून महिन्यात. तोपर्यंत ‘एन्जॉय धिस शुकशुकाट..’
– सायली पाटील