15 December 2017

News Flash

परंपरा जुनी, पण वाट नवी..

मुंबई विद्यापीठांतर्गत असणाऱ्या लोककला अकादमीमध्ये या लोककला नांदताना आपल्याला दिसतात.

नीलेश अडसूळ | Updated: June 24, 2017 1:25 AM

महाराष्ट्राला लोकपरंपरेचा अथांग वारसा लाभलेला आहे. भारुड, कीर्तन, अभंग अशी भक्तिमय लोककला तर तमाशा, संगीत बारी अशी मनोरंजनपर लोककला तर कुठे विधी आणि कुळाचारांवर आधारलेली जागरण गोंधळ, बोहाडा पंचमी, दशावताराची परंपरा. अशा अनेक प्रकारच्या बहुविध लोककलांनी महाराष्ट्राची भूमी संपन्न आहे. परंतु कालानुरूप याच आपल्या ग्रामीण परंपरा, लोककला लोप पावत चालल्या आहेत. आणि याच लोककलांना जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचे काम मुंबई विद्यापीठाने केले आहे.

मुंबई विद्यापीठांतर्गत असणाऱ्या लोककला अकादमीमध्ये या लोककला नांदताना आपल्याला दिसतात. चर्चगेट येथील मुंबई विद्यापीठ विद्यार्थी भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर लोककला अकादमी स्थिरावली आहे. तिथे पोहोचताच आपल्याला लोककलांचा प्रत्यय येतो. सातत्याने येणारा ढोलकीचा आवाज, भारुडाचे आध्यात्मिक बोल, पारंपरिक लावण्यांचा अनोखा बाज सहज आपल्या कानावर येतो. येथे प्रामुख्याने पाच लोककला शिकवल्या जातात. विशेष म्हणजे लोकपरंपरेतील अंधश्रद्धा बाजूला सारून विद्यार्थ्यांना सकस अशा प्रयोगात्मक लोककला शिकवल्या जातात. गणगौळण तमाशाचे पारंपरिक शिक्षण त्याचबरोबर भारुड, कीर्तन, जागरण-गोंधळ, कोकणातील दशावतार, पोवाडा यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण येथे विद्यार्थ्यांना दिले जाते. एवढेच नव्हे तर ज्या विद्यार्थ्यांना वादन आणि लोकगायन यात विशेष रस आहे त्यांच्यासाठी खास कोर्स येथे उपलब्ध आहे. यातून पुढे विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. नाटक-सिनेमा त्याचबरोबर संशोधन क्षेत्रात लोककला अकादमीचे अनेक विद्यार्थी आज मोठय़ा पातळीवर काम करत आहे. मुंबईत विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे पदव्युत्तर पदविका आणि बारावीनंतर प्रमाणपत्र असे दोन शिक्षण वर्ग सुरू आहेत. लोकनृत्य, लोकसाहित्य, लोकगीतगायन, लोकवाद्य वादन, अभिनय असे या अभ्यासक्रमाचे स्वरूप आहे. तरुणांकडून आपली लोककला पुढे परिवर्तित व्हायला हवी. यातून अर्थार्जनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना आगळ्यावेगळ्या अभ्यासक्रमाचा नक्कीच लाभ होईल. लोकपरंपरेत विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घ्यावा त्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदाही आम्ही विद्यार्थ्यांना परंपरेचा नवीन वसा देऊ असे मनोगत लोककला अकादमीचे विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी व्यक्त केले.

First Published on June 24, 2017 1:25 am

Web Title: folk tradition of maharashtra mumbai university lok kala academy