महाविद्यालयातील नवीन चेहऱ्यांची ओळख करून घेण्याचा सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचा हक्काचा दिवस म्हणजे ‘मैत्री दिन’ (फ्रेंडशिप डे). या दिवशी एकमेकांना वेगवेगळ्या रंगाच्या फिती (रिबन्स) बांधून आणि चॉकलेटने तोंड गोड केले जाते. जन्मोजन्मीचे जय-वीरू ‘तेरा साथ ना छोडेंगे’ म्हणत एकमेकांचा हात हातात घेऊन या दिवसासाठी एक वेगळी सहल आयोजित करतात. मैत्री ही एकमेकांच्या साथीची, संकटात त्यांच्या पाठीशी उभी राहणारी, चांगल्या कामासाठी प्रेमाची धाप मारणारी आणि कधीकधी कान पिरगळणारीही असते. याबरोबरच सामाजिक बांधीलकी जपून काहीतरी नवे करू पाहणारी आणि प्रोत्साहन देणाऱ्यांसाठी हेच मैत्रीचे हात पुढे येत असतात. अनेक महाविद्यालयांमध्ये मैत्रीच्या दिवसाला एक वेगळे महत्त्व मिळवून दिले आहे. समाजाला या मैत्रीतून एक सामाजिक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत..

अपंगांच्या भेटवस्तूंना महाविद्यालयाची बाजारपेठ

मालाडचे ठाकूर महाविद्यालय गेली अनेक वर्षे मैत्रीच्या दिवसासाठी एक वेगळा प्रयोग राबवीत आहे. महाविद्यालयामध्ये फ्रेंडशिप बँड आणि राखीपौर्णिमेसाठी राख्या विकणारा एक टेबल ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून उभा असतो. मात्र या बँडचे वैशिष्ट म्हणजे मालाडमधील व्ही. डी. इंडियन सोसायटी या संस्थेमधील अपंग मुलांनी हे तयार केले आहेत. या दिवसांमध्ये ही मुले फ्रेंडशिप बँड आणि भेटवस्तू तयार करीत असतात. त्यांना बाजारपेठ मिळावी या हेतूने ठाकूर महाविद्यालयाच्या मुलांनी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्याची सुरुवात केली. या संस्थेतून वस्तू विकत घेऊन महाविद्यालयात विकले जात आहे. या दिवसात मोठय़ा प्रमाणात हे बॅंड आणि राख्या विकत घेतल्या जातात आणि यातून येणारा मोबदला मैत्रीच्या नात्याने या संस्थेला दिला जातो. यासाठी महाविद्यालयातील एनएसएसच्या मुलांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे ऐरवी मित्रमैत्रिणींसोबत धांगडधिंगा करीत साजरा करणारा मैत्रीचा दिवस चांगल्या संदेश देणारा ठरत आहे. यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीही खूप मदत मिळत असल्याचे या महाविद्यालयाच्या ओमकार दळवी याने सांगितले.

– ठाकूर महाविद्यालयॉ

 

सफाई कर्मचाऱ्यांसोबतची मैत्री

एस.आय.ई.एस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षी वेगळ्या पद्धतीने मैत्रीचा दिवस साजरा केला. हा दिवस त्यांनी पलिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला. पालिकेचे सफाई कामगार आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम करीत असतात. वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांना हे काम करावे लागत असल्यामुळे त्यांच्या सोबत मैत्रीचा दिवस साजरा करण्याची योजना या विद्यार्थ्यांच्या मनात आली आणि विद्यार्थ्यांनी भेटवस्तू देऊन मैत्रीचे सामाजिक बंध तयार केले. नेहमीच मित्र आहेत त्यांच्यासोबत हा दिवस साजरा करतो; मात्र शहराची स्वच्छता करणारेही मित्रच आहे. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासोबत साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. हर्षां मेहता यांनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता असणे गरजेचे आहे. अशा उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांची बाजू आणि परिस्थितीही यांना माहीत झाल्याचे ते म्हणाले. याआधी आमच्याशी मैत्री करण्यासाठी कोणी पुढे आले नव्हते, मात्र या लहानग्यांनी मैत्रीचा हात पुढे केल्याने आनंद आहे, अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

– एस.आय.ई.एस महाविद्यालय

 

लाल रंग प्रेमाचा..रक्तदानाचा आणि एचआयव्ही जागृतीचा

रुइया महाविद्यालयाच्या एनएसएसची मुले गेली अनेक वर्षे लाल रंग प्रेमाचा आणि रंग रक्तदानाचा आणि एचआयव्हीच्या जागृतीचा उपक्रम मैत्रीच्या दिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांना लाल रंगाच्या रिबीन बांधून रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि हाच रंग एचआयव्हीच्या जागृतीचा असल्यामुळे या आजाराबाबत लोकांमध्ये अधिक माहिती पोहाचवली जात आहे. यात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांपासून प्राध्यापकही या कार्यक्रमात सहभागी होतात. गेली दोन ते तीन वर्षे आम्ही एनएसएसच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करीत असल्याचे रुईया महाविद्यालयातील रमा नामजोशी हिने सांगितले. यावेळी रक्तदान आणि एचआयव्ही जनजागृती करण्यासाठी पथनाटय़ आणि वेगवेगळे खेळ आयोजित केले जातात. मात्र अशा प्रकारे मैत्रीचा दिवस साजरा करण्यात अधिक आनंद येत असल्याचा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. नेहमीच मजा मस्ती आणि इतर ठिकाणी पैसे खर्च करण्यापेक्षा अशा उपक्रमातून आपण काहीतरी मिळविण्याची भावना येत असते, असे मत येथील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

रुईया महाविद्यालयात मैत्रीचा दिवस हा महाविद्यालयातील दृष्टिहीन मुलांसोबत साजरा केला जातो. यावेळी सर्व मुले मिळून एकमेकांना लाल रंगाची रिबीन बांधून वेगवेगळे खेळ खेळत हा दिवस साजरा करतात. दृष्टिहीन मुलांसोबत गेली तीन वर्षे फ्रेंडशिप डे साजरा करीत आहोत. बऱ्याचदा एकाच वर्गात शिकत असतानाही दृष्टिहीन मुलांशी बोलणे होत नाही मात्र या दिवसाच्यानिमित्ताने दृष्टिहीन मुलांशी ओळख तर होते आणि मैत्रीचे संबंध दुणावतात असा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे.

– रुइया महाविद्यालय