29 February 2020

News Flash

राहा फिट : ऋतुचक्र आणि फलाहार

मनाला मोहवणारी ही रंगीबिरंगी फळे तर आपल्या अन्नाचा एक अत्यावश्यक घटक आहे

डॉ. अविनाश सुपे

प्रगत शेती तंत्रज्ञानामुळे बरीचशी फळे बाजारात सदासर्वकाळ उपलब्ध असतात. ऋतूनुसार त्या त्या फळांचे सेवन करणे आवश्यक असून त्यामधील गुणधर्म समजून घेऊया..

हल्ली हॉटेलमध्ये किंवा लग्नाच्या बुफे जेवणामध्ये एक स्टॉल केवळ फळांचाच असतो. जिथे ताजी व टवटवीत द्राक्षे, स्ट्राबेरी, चेरी मांडलेली असतात. अंजीर, चिकू, किवींची प्लेट असते. मोसंबी- संत्री सोलून ठेवलेली असतात. दुसऱ्या बाजूला ताजे, रसरशीत किलगड, पपई व खरबूज कापून ठेवलेले असतात.

मनाला मोहवणारी ही रंगीबिरंगी फळे तर आपल्या अन्नाचा एक अत्यावश्यक घटक आहे. अनेकदा लहान मुलांमध्ये फळांची नावड दिसून येते. याचे कारण मोठय़ा माणसांमध्ये लपलेले आहे.  घरातली मोठी माणसे नेहमी फळे खात नसतील किंवा मुलांना वयाच्या खूप लवकर फळांची चव चाखू देत नसतील तर मुलांना त्याची गोडी कशी कळणार?

बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर जेव्हा आपण वरचे खाणे सुरू करतो त्याच वेळी त्यांना एका-एका फळाची गोडी लावायला सुरुवात करावी. ही सवय मग आयुष्यभर टिकते. शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांनी इतकेच नव्हे तर मोठय़ा माणसांनीही डब्यामध्ये रोज कोणते तरी फळ नेण्याचा परिपाठ ठेवावा. फळे खाताना त्यातील जीवनसत्त्वे, क्षारांची माहिती आणि त्यामुळे होणारे फायदेही मुलांना सांगावेत. मग मुले आवडीने फळे खातात.

आयुर्वेदात याबाबत विस्तृत विवेचन आहे. दुसऱ्या प्रदेशातील आणि खंडातील फळे चुकीच्या वेळी काढून शीतकपाटात पिकवली जातात, तेव्हा ती पित्त, कफ व वात दोष निर्माण करतात. यासाठी प्रकृतीप्रमाणे वेगवेगळी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. खासकरून उतारवयात ऋतुचक्रानुसार आणि शक्यतो सूर्य आकाशात असताना फळे खावीत आणि त्यांचा आहाराने रोग हरवण्यासाठी उपयोग करा, असे आयुर्वेद सांगते.

शहरात हल्ली काही विशिष्ट फळे सोडल्यास सर्व फळे बाराही महिने उपलब्ध असतात. पूर्वी असे नसे. हल्ली प्रगत शेतकी विज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. जसे की द्राक्षे, संत्री, स्ट्रॉबेरी केवळ थंडीत येतात. जांभळे, आंबे, फणस केवळ उन्हाळ्यात दिसतात तर पीच, चेरी, प्लम किंवा आलूबुखार हे पावसाळ्यात उपलब्ध होतात. परंतु अलीकडे सफरचंद, किवी वर्षभर बाजारात मिळतात. तहान भागवणारी खरबूज व टरबूज पूर्वी केवळ उन्हाळ्यात दिसत असत. परंतु आता मात्र नवीन तंत्रज्ञानामुळे ती सदैव उपलब्ध असतात. फळे नेहमीच ताजी खावीत. मोसमी फळे त्या त्या मोसमातच खावी. फ्रिजमध्ये ठेवून सहा महिन्यांनी खाऊ नयेत. कारण त्यातली जीवनसत्त्वे व खनिजे नष्ट होतात.

सध्या आंबा बाजारात यायला सुरुवात झाली आहे. जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘क’ शिवाय फायबर यांनी संपृक्त असे हे फळ. त्वचा व डोळ्याचे आरोग्य सांभाळते. रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल वाढू देत नाही आणि शरीराच्या वजनातही नियंत्रण आणते. याच मोसमात येणारे फणस हे फळ बरेचसे पिष्टमय पदार्थ आणि फायबर यांनी भरलेले. फणस शरीराला भरपूर ऊर्जा देतो. यात काही उपयुक्त खनिजे असतात, यात कोलेस्टेरॉल अजिबात नसते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो.  जांभूळ, करवंद, काजू या फळांमध्ये खूप फायबर असते, ज्यामुळे पोट साफ राहते. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. आपल्या रक्तामध्ये शरीरातील बरेचसे टाकाऊ पदार्थ फ्री रॅडिकल्सच्या स्वरूपात असतात. अँटीऑक्सिडंट्स या सर्व टाकाऊ पदार्थाना नष्ट करतात, शरीरीची प्रतिकारशक्ती वाढवतात, आजारांना पटकन घालवतात आणि त्वचा व डोळ्याचे आरोग्य राखतात.  यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीस येणारे प्लम, पीच व चेरी यांसारखी फळे जास्त ऊर्जा देत नाहीत म्हणून रक्तदाब व वजन नियंत्रणात ठेवतात. ही फळे मानसिक ताणतणाव कमी करतात, निद्रानाश घालवतात, वृद्धत्वाला दूर ठेवतात.  म्हणूनच यांना आपण चिरतारुण्य व शांतता प्रदान करणारी फळे म्हणू शकतो. या सर्व फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म प्रामुख्याने असतो.

First Published on April 16, 2019 3:17 am

Web Title: fruit nutrition facts and the health benefits of fruits
Next Stories
1 मस्त मॉकटेल : कोकोमेलन
2 शहर-ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण
3 मूल्यमापनाची ‘तिसरी भूमिका’ शिक्षणाने स्वीकारावी
X
Just Now!
X