गांधी व्यवस्थापन महाविद्यालयात पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा झाला. गेली दोन वर्षे महाविद्यालय गणेशोत्सव साजरा करीत आहे. यंदा गणेशोत्सवासाठी विद्यार्थ्यांनी ‘ट्री गणेशा’ मूर्तीची निवड केली होती. लालमातीची ही मूर्ती पाण्यात सहज विरघळते. शिवाय उद्यानात ठेवून ती मातीत मिसळून जाते. त्यावर रोपांच्या बिया टाकल्यास त्यावर रोपे लावता येतात. हीच संकल्पना राबवत गणेशोत्सव साजरा केला. गणपतीभोवती वारली चित्रकलेची आकर्षक सजावट करण्यात आली होती. शिवाय प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा आयोजन केले होते. रांगोळी, कथाकथन, भजन विद्यार्थ्यांनी गणेशजन्माची नाटुकलीही सादर केली. महाविद्यालयाच्या आवारात या गणेशाचे विसर्जन करण्यात आले.

उदरभरण नोहे..

एस. के. सोमय्या महाविद्यालयातील बीएमएम विभागाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन ‘डोन्ट बी अ मंकी’ हा कार्यक्रम सादर केला. याअंतर्गत समाजातील विविध समस्यांबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला. २०१५ पासून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. रस्ता सुरक्षा आणि रेल्वे सुरक्षा उपाय अशा संकल्पना यशस्वीरीत्या आयोजिल्या गेल्या. यंदा ‘अर्बन एट हेल्थी’ ही संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांनी काम केले. शहरी भागात आरोग्याचे महत्त्व हा या संकल्पनेमागील मुख्य हेतू होता. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी ‘फॅन चॅलेंज’च्या (फीड अ निडी) हे आव्हान विद्यार्थ्यांनी उचलले होते. यात आजूबाजूच्या परिसरातील भुकेल्या व्यक्तींना अन्नदान करायचे होते. या वेळी त्यांच्यासोबत एक छायाचित्र घेऊन ते समाजमाध्यमांवर  #फॅनचॅलेंज #अर्बनएटहेल्थी #डोन्टबीअमंकी लिहून पाठवायचा होता. शिवाय ओळखीच्या पाच व्यक्तींना ‘टॅग’ करून त्यांनाही असे काम स्वीकारण्याचे आव्हान करायचे होते. रोज आपण सकस आहार घेतो. आवडीनिवडीनुसार एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली की लगेच आई किंवा वडील तो पदार्थ उपलब्ध करून देतात. पण तो खाताना आजूबाजूला अनेक लोकांना अन्न मिळत नाही, याची जाणीव व्हावी यासाठी तरुण-तरुणींना आवाहन करण्यात आले. केवळ स्वत:चे पोट न भरता दुसऱ्याच्या भुकेचा विचार करा, असा संदेश यातून देण्यात आला.

व्यवसायात नफ्यात राहा..

डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, वरळी या अजिंक्य डी. वाय. पाटील समूहाचा भाग असलेल्या संस्थेने यंदा ‘टेडेक्स युथ इव्हेंट’ आयोजित केला होता. ९ सप्टेंबर रोजी नेहरू सेंटर, वरळी येथे हा कार्यक्रम होईल. वक्त्यांमध्ये ‘एआयबी’चे रोहन जोशी सहभागी होणार आहेत. ते ‘स्टॅण्डअप कॉमेडी’मधील करिअरविषयी माहिती देतील. मनोरंजन क्षेत्राचे अभ्यासक मयंक शेखर हे जगभरात असलेल्या बॉलीवूडच्या जादूची आणि लोकांना असलेल्या त्याच्या आकर्षणाबाबत माहिती देतील. आदरातिथ्य उद्योगात व्यावसायिक आणि ‘हॉस्पिटॅलिटी अचीव्हर ऑफ दि इयर’ पुरस्कार मिळालेले रोमी रात्रा हे आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) उद्योगाचा बदलता चेहरा या विषयावर मते मांडतील. याशिवाय युनिव्हर्सल बिझनेस स्कूलचे सहसंस्थापक आणि रॉयटर्सचे माजी जागतिक प्रमुख तरुण आनंद हे सामाजिक पातळीवर जबाबदार राहताना व्यवसाय नफ्यात कसा करायचा याची माहिती देतील.