देशात १ जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या खिशाला भार सोसावा लागत आहे. खासकरून शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना हॉटेलात जाऊन खाणेही थोडे महाग झाले आहे. हॉटेलातील (नॉन एसी) जेवणावर १२ टक्के जीएसटी लागू केल्यामुळे कँटीनमधील खाण्यावरच समाधान मानावे लागणार आहे. १ जुलैच्या आधी कपडे खरेदीचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. मात्र जीएसटीनंतर कपडय़ांच्या खरेदीवर १२ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. १००० रुपयांवरील कपडय़ांच्या खरेदीवर विद्यार्थ्यांना या कराचा फटका बसणार आहे. एकूणच विद्यार्थ्यांना मासिक खर्चाचे गणित सोडवताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

जीएसटीच्या सवलतीत कपडे खरेदी

दरवर्षी महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी कपडय़ांची खरेदी होतेच; मात्र दरवर्षी सवलतीच्या दरात खरेदी होत नाही. यंदा मात्र जीएसटीच्या भीतीने म्हणा हवं तर कपडय़ांची मोठी खरेदी सवलतीच्या दरात खरेदी झाली. एकूणच जीएसटी लागू होण्याआधी कपडय़ांची चंगळच झाली आहे.

 – निकिता सुर्वे, सरदार पटेल तांत्रिक महाविद्यालय.

 

छोटय़ा बजेटमध्ये भरपूर खरेदी

दरवर्षीप्रमाणे मला महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी घरामधून कपडे खरेदीसाठी काही पैसे मिळाले. दरवर्षी ही रक्कम तेवढीच असते; मात्र यंदा जीएसटीच्या सवलती मिळाल्यामुळे मी दरवर्षीपेक्षा जास्त कपडय़ांची खरेदी केली. शिवाय फ्रेशर्स पार्टीसाठी लागणाऱ्या कपडय़ांची खरेदी मी माझ्या पॉकेटमनीमधून करीत होते; यंदा त्याच खर्चातून ‘फ्रेशर्स’च्या कपडय़ांची खरेदी झाली.

भारती मोरे, विद्यालंकार महाविद्यालय

 

ब्रॅण्डेडकपडेही स्वस्तात

ब्रॅण्डेड कपडय़ांच्या किमतीत जीएसटी लागू होण्याआधी ‘ब्रॅण्डेड’ कपडय़ांच्या खरेदीवरही मोठय़ा प्रमाणात सवलत मिळाल्याने ती खरेदी मी केली.

स्वाती निंबाळकर

 

वाढीव खर्च आहेच

जीएसटीमुळे जीवनावश्यक गोष्टींवरील कर कमी झाला असला तरी सौंदर्यप्रसाधनांवरील कर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आहेत त्या गोष्टी सांभाळून व विचारपूर्वक वापराव्या लागत आहेत.आता गोष्टी विकत घेताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

प्रियांका मुखर्जी, मुंबई विद्यापीठ

 

जेवण खर्चात वाढ

जीएसटीमुळे राइस प्लेटची किंमत पूर्वीपेक्षा वाढली आहे. त्यामुळे घरातून जास्त पैसे मागावे लागत आहेत.

ऐश्वर्या पेवाल

 

खर्च जैसे थे

जीएसटी लागू झाल्यामुळे रोजच्या जीवनात फारसा फरक पडलेला नाही. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या किमती आहेत तशाच आहेत. जेवढे पैसे आधी खर्च व्हायचे तेवढे १ जुलैनंतरही होत आहेत. त्यामुळे मला असे वाटते की माझ्यासारखे बाहेरून मुंबईत शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना याचा फारसा फटका पडला नसावा.

साहिल इनामदार, मुंबई विद्यापीठ

जीएसटी लागू झाल्यापासून वातानुकूलित उपाहारगृहांमध्ये १८ टक्के  तर वातानुकूलित नसलेल्या उपाहारगृहांवर १२ टक्के जीएसटी लागू झाला आहे. शिवाय खाद्यपदार्थाच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील कँटीनमध्ये जे पदार्थ मिळतील त्याच्यावर पोट भरण्याचा अनेकांचा इरादा आहे. येत्या काळात कँटीनमधील खाद्यपदार्थामध्येही वाढ झाल्यास खर्चात कपात करावी लागणार आहे. काही महाविद्यालयांच्या कँटीनमध्ये जीएसटीनंतर विद्यार्थ्यांना दिलासा देणारं वातावरण आहे तर काही कँटीनमध्ये मात्र काही महिन्यांच्या कालावधीतच भाववाढ होणार आहे. आता ही भाववाढ अंदाधुंद आहे की अभ्यासपूर्ण यात जरा शंकाच आहे. ‘आम्ही खाद्यपदार्थाचे भाव काही अंशी वाढविणार आहोत; परंतु विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या बिलात जीएसटीची नोंद नसेल. शिवाय विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन ही वाढ मोठी नसेल, असे महाविद्यालयांमधील कँटीन व्यवस्थापकांनी सांगितले.

(संकलन : नीलेश अडसूळ, सुयश देशपांडे, पराग गोगटे)