News Flash

ढोलताशे, कॅमेरा आणि वेशभूषा

महाविद्यालयात तरुणांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुढीपाडव्याचा उत्साह टिपण्याचे ठरवले आहे.

 

महाविद्यालयीन तरुणाई सध्या परीक्षा आणि प्रकल्पांमध्ये व्यग्र असली तरी गुढीपाडव्यासाठीचा अमाप उत्साह ओसंडून वाहत आहे. तरुण-तरुणींना शोभायात्रांचे वेध लागले आहेत. शोभायात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी पाश्चिमात्य कपडय़ांना बगल देत पारंपरिक कपडय़ांच्या खरेदीला उधाण आले आहे, तर काही जण या सोहळ्याचे छायाचित्रण आणि ढोलताशा पथकामध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. रांगोळी काढण्यासाठी काहींनी सरावही सुरू केला आहे. त्याचा हा आढावा..

आम्ही छायाचित्रकार

महाविद्यालयात तरुणांनी कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुढीपाडव्याचा उत्साह टिपण्याचे ठरवले आहे. शोभायात्रांमधील वातावरण केवळ हौस म्हणून नाही तर शोभायात्रा आयोजकांना भेटून त्यांचे छायाचित्र अधिकृतपणे काढण्याचे आणि त्यातून अर्थार्जन करण्याचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण करू शकतात. दणाणणारे ढोल आणि ताशे शोभायात्रांमधील वेगळी वेशभूषा छायाचित्रांतून दाखविण्याची उत्तम संधी तरुणांसमोर आहे.

चेतन उमरेडकर

यंदाही मला शोभायात्रेची भव्यता कॅमेऱ्यात टिपायची आहे. तरुणाईचा उत्साह आणि जल्लोषाचा मोह प्रत्येकाला असतो. छायाचित्रातून पूर्ण करण्याचा अनुभव वेगळाच असतो.

रोहित वणे

शोभायात्रा ही एक सुवर्णसंधी असते, अशा क्षण कॅमेऱ्याची काळजी घेणे आवश्यक आहे. गर्दीत कॅमेऱ्याला धक्का लागून तो पडण्याची शक्यता असते. अर्थात शोभायात्रेत एक शिस्त असते. प्रत्येकाच्या आनंदात त्यामुळेच तर मिसळता येते.

दीपेश माळी

शोभायात्रा म्हणजे नवा आत्मविश्वास आणि नवी ऊर्जा असते. तेथील उत्साही वातावरणामुळे कधीच थकवा जाणवत नाही. शिवाय आयोजकांकडून प्रसंगी अधिकृत छायाचित्र काढण्यासाठी संपर्क साधला जातो, त्यामुळे काही प्रमाणात पैसेही मिळतात.           – निखिल पवार

 

आम्ही ढोलकरी

ढोलताशांच्या कडकडाटाशिवाय शोभायात्रेला पूर्णत: येत नाही. २५ ते ३० तरुण आणि तरुणी मिळून एका लयीत व तालात वादन करतात. त्यातून एक उत्साह निर्माण होत असतो. शोभयात्रेत किमान सहा ते सात ढोलताशा पथके सहभागी होतात. या महाविद्यालयीन तरुणांचा समावेश असतो. त्यांची जाणून घेतलेली मते.

सध्या माझी महाविद्यालयात सादर होणाऱ्या लघु शोधप्रबंधाची तयारी सुरूआहे; मात्र मी पथकात वादन करत असल्याने त्याच्या तालमीलाही वेळ देत आहे. शोभायात्रेत ढोलवादन करताना नऊवारीचा अनुभव वेगळाच असतो.

तेजश्री परब, साठय़े महाविद्यालय

मी वास्तुविशारदचे (सिव्हिल इंजिनीअरिंग) शिक्षण घेत असल्याने प्रकल्पांचा सतत भडिमार आमच्यावर असतो; मात्र ढोलताशा पथकात वादन केल्याने हा संपूर्ण ताण निघून जातो. मी प्रथमच शोभयात्रेसाठी वादन करत असल्याने उत्साही आहे. त्याची तालीमही महाविद्यालय सांभाळून करीत आहे.

तेजस्विनी शिंदे, रचना संसद

 

कलावंत विद्यार्थ्यांचे अर्थार्जन

शोभायात्रांमध्ये पथनाटय़, मूकनाटय़, लेझीम, दांडपट्टा, मल्लखांब, तलवारबाजी आणि लाठीकाठी असे मराठी मातीतील खेळ प्रामुख्याने खेळले जातात. कला आणि खेळ सादर करणाऱ्या तरुणांना आर्थिक लाभ असतो. काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा रांगोळी कलासमूह आहे. संस्कारभारती यात आघाडीवर आहे. रांगोळ्या काढून रस्त्यावर जणू गालिचे अंथरतात, तर काही मुलांचे मल्लखांब सादरीकरणाचे संघ आहेत त्यांनाही खूप मागणी आहे. या दिवशी संध्याकाळी अनेक विभागांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये लोककलांना विशेष प्राधान्य असते. अशा कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी गायक, वादक, निवेदक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत असतात. काही विद्यार्थिनींचे लावणीचे विशेष कार्यक्रमही आहेत, तर काही ठिकाणी स्थानिक मुलेमुली एकत्र येऊन संस्कृती आणि वारसा भूषवणारे कला प्रकार सादर करणार आहेत.

जरा वेगळे करून बघा..

यंदाच्या शोभायात्रेत नऊवारी साडय़ा, कुर्ता-पायजमा अशा पारंपरिक पेहरावांना बगल देत इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी पाश्चिमात्य, पण पारंपरिकतेची जोड असलेले कपडे तुम्ही पेहरावात आणू शकता. घरात असणाऱ्या साडय़ांचा वापर करून मुली एरवी त्याचे कुर्ते शिवतात; पण त्याच साडीचा आणि त्याच्या काठाचा उत्तम प्रकारे वापर करत ‘वन पीस’ किंवा पूर्ण बाह्य़ांचा ‘फ्रॉक’ शिवल्यास तो उत्तम पेहराव होऊ  शकतो ज्यात पारंपरिक आणि पाश्चिमात्य अशा दोघांचे मिश्रण असेल. शिवाय घागरा आणि त्यावर मोठय़ा लांबीचा कुर्ता हा पर्याय मुलींकडे आहेच. तसेच दागिन्यांमध्ये नथीबरोबर राणी हार, बकुळ हार, शाही हार, कोल्हापुरी साज बाजारात आहेत, तर गजरा तोडा, अनारकली तोडा असे पारंपरिक पण आकर्षक दागिनेही मुलींना घालता येतील. मुलांच्या पारंपरिक वेशात सध्या चलती असणाऱ्या ‘नेहरू जॅकेट’मध्येही वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये खालच्या बाजूने ‘वी’ आकार असणारे किंवा बाराबंदीसारखे आणि पूर्ण बाह्य़ांचे जॅकेट तुम्ही यंदा वापरलेत तर ते वेगळे दिसू शकतात. शिवाय एका रंगाचे कुर्ते वापरण्यापेक्षा ‘जामेवार’ किंवा ‘चिकन’च्या कापडाचे भरलेले कुर्ते वापरण्यास काही हरकत नाही. दर वेळी चुडीदार, पायजमा अथवा धोतर घालण्यापेक्षा घेरदार पटयाला मुलांनी घालून बघावा.

सुन्या सुन्या कट्टय़ावर माझ्या..

‘अगं, तुझ्याकडे अर्थशास्त्राच्या नोट्स असतील तर दे ना, मी जरा पटकन झेरॉक्स मारून आणतो.’ असे काही संवाद सध्या महाविद्यालयाच्या कट्टय़ावर ऐकू येत आहेत. परीक्षेचा हंगाम सुरू झाल्यापासून तो भरलेला नाका, गजबजलेला कट्टा, आता सुनासुना झाला आहे. कट्टेकरी मंडळी कट्टय़ावर असतात मात्र हातात भरलेल्या नोट्स घेऊन. महाविद्यालयात चालणारी विद्यर्थ्यांची धावपळ,गडबड आता कुठे जरा मंदावलेली आहे. खेळामध्ये, नाटकामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रमणारी तरुणाई गेली कुठे? याचं उत्तर मिळतं ते महाविद्यालयाच्या सूचना फलकावर लागलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकात. दहावी आणि बारावीच्या परीक्षांप्रमाणे महाविद्यालयातही परीक्षेचे वारे वाहू लागले आहेत. सातत्याने सुरू असणाऱ्या नवनवीन उपक्रमांना महाविद्यालयात आता अल्पविराम मिळाला आहे. कॉलेजचा नाका-कट्टा आणि अगदी गेटपासून ते गच्चीपर्यंत सगळे विद्यार्थी हातात पुस्तक घेऊन काहीतरी वाचताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी तरुणाईने मंतरलेला कट्टा आज बदलून गेला आहे. असे अनेक कट्टे मुंबईत प्रसिद्ध आहेत. रुईयाचा कट्टा, रुपारेलचा नाका, कीर्तीचा सागरी किनारा, एम.डी.चा गेट, डहाणूकर आणि साठय़ेचा दीक्षित रोड, केळकरचं मैदान, सोमय्याचं कॅम्पस, एसआयडब्लूएसची मागची गल्ली अशा अनेक ठिकाणी आज आपल्याला ही तरुणाई अभ्यासात मग्न दिसते. एकीकडे झेरोक्सच्या दुकानाबाहेर नोट्ससाठी रांगा लागल्या आहेत. तर अनेकांनी व्हॉट्सअप आणि फेसबुकला रामराम ठोकलाय, तर काहींनी ‘डू नॉट डिस्टर्ब’, ‘एक्झाम टाइम’ अशा पाटय़ा लावत सोशल मीडियाला लाल झेंडा दाखवलाय. ७५-२५चे परीक्षा स्वरूप, ७०% हजेरी, वर्गातील सहभाग आणि नव्याने येऊ  घातलेला एटीकेटी फंडा यामध्ये परीक्षेमधील लवचिकता निश्चितच नाहीशी झाली आहे. पुस्तकाबाहेर जाऊन काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्ष वाया जाण्याच्या भीतीने मन लावून अभ्यास करणे आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. म्हणूनच तरुणाई अभ्यासाच्या व्यासंगात बुडालेली आपल्याला दिसत आहे. आम्हाला बरंच काही करायचं असतं. आम्ही सातत्याने काहीतरी नवीन करत असतोच पण कॉलेजमध्ये राहून हे करण्यात जास्त मजा असते. म्हणूनच आता शेवटच्या दिवसात जास्त मेहनत घेऊन पास व्हायचं आहे, असे मनोगत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

संकलन – अक्षय मांडवकर, प्रियांका मयेकर, पराग गोगटे, नीलेश अडसूळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 12:48 am

Web Title: gudi padwa 2017 dhol tasha pathak camera
Next Stories
1 बदलत राहा, म्हणजे टिकाल!
2 शांतता म्हणजेच मूकसंमती
3 आधुनिक शेतीची गरज
Just Now!
X