परळमधील हाफकिन संस्थेच्या संग्रहालयात दिनांक १८ मे रोजी ‘जागतिक संग्रहालय दिन’ साजरा करण्यात आला. ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्युझियम’ या संघटनेने या दिवसाचे आयोजन केले होते. दर वर्षी नवीन संकल्पना घेऊन या दिवसाचे आयोजन केले जाते. या वर्षी ‘म्युझियम अ‍ॅण्ड कंटेस्टेड हिस्टरिज, सेइंग अनस्पिकेबल इन म्युझियम्स’ ही संकल्पना निवडण्यात आली होती. हाफकिन संस्थेतील संग्रहालयामध्ये विज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त अशी अत्यंत मोलाची माहिती संग्रहित करण्यात आली आहे. देशभरातील अनेक राज्यांमधून विविध शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठाचे विद्यार्थी

तसेच विविध देशांतील पर्यटक या संग्रहालयाला भेट देतात. जागतिक संग्रहालय दिनाच्या निमित्ताने हाफकिन संस्थेतील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबासाठी १८ मे रोजी संग्रहालय खुले ठेवण्यात आले होते. तसेच अनाम प्रेम या संस्थेतील सदस्यांनीदेखील हाफकिन संग्रहालयाला भेट दिली आणि हाफकिन संस्थेतील संग्रहालयामार्फत माहितीचा व ज्ञानाचा प्रचार करीत असल्याबद्दल संचालिका, डॉ. निशिगंधा नाईक व हाफकिन संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.