नावीन्यपूर्ण संकल्पना व आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ घालत ‘वेगवान इलेक्ट्रिक कार’ घेऊन येणाऱ्या ‘आयआयटी बॉम्बे रेसिंग’ने यंदाही वेगवान गाडीच्या निर्मितीची परंपरा कायम राखली आहे. या वेळी ‘आयआयटी बॉम्बे रेसिंग’ हे इलेक्ट्रिक कार नव्हे तर चक्क एक ‘किलर व्हेल’ आपल्यासमोर घेऊन आले आहे. ‘आयआयटी मुंबई’मध्ये २९ मे रोजी झालेल्या कार्यक्रमात बॉम्बे रेसिंगने त्यांची ‘ओरका’ ही इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. ओरका या शब्दाचा अर्थ किलर व्हेल हा असून अवघ्या ३.४७ सेकंदांत ० ते १०० किमी प्रती तास वेग गाठणाऱ्या या गाडीने पोर्शे, टेल्सा आणि लँबोर्गिनी यांसारख्या अनेक बडय़ा कंपन्यांना वेगाच्या स्पर्धेत मागे टाकल्याचा दावा ‘आयआयटी’ कडून करण्यात आला आहे.

युनायटेड किंग्डमकडून दरवर्षी जुलैमध्ये भरवण्यात येणाऱ्या मानाच्या ‘फॉर्मूला स्टुडंट युके’ या जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आयआयटी मुंबईच्या ‘आयआयटी बॉम्बे रेसिंग’ विभागाने या ‘ओरका’ या इलेक्ट्रिक कारची निर्मिती केली आहे. वेगाच्या ओढीने भारावलेला आयआयटीतील ७५ विद्यार्थ्यांचा समूह ‘आयआयटी बॉम्बे रेसिंग’मध्ये सहभागी असून ‘फॉर्मूला स्टुडंट युके’ (एफएसयुके) स्पर्धेसाठी भारतीय विद्यार्थी गटाचे प्रतिनिधित्व करतो. जगातल्या प्रमुख स्पर्धापैकी ही एक स्पर्धा असून संपूर्ण जगभरातून विद्यार्थ्यांचे १०० समूह या स्पर्धेत अत्याधुनिक गाडय़ांसह आपले नशीब आजमावतात. अभियांत्रिकी, रचना, किंमत, उपयोगिता, उत्तम क्षमता या गुणांच्या आधारे येथे

गाडय़ांचे गुणांकन केले जाते. ‘आयआयटी बॉम्बे रेसिंग’ची या स्पर्धेत सहभागी होण्याची पाचवी वेळ असून क्षणात वेगवान होणाऱ्या एक आसनी ‘ओरका’ या इलेक्ट्रिक कारची निर्मिती केली आहे.

किंमत लाखात

गेल्या वर्षी ‘आयआयटी बॉम्बे रेसिंग’ने निर्माण केलेली ‘इवो ४’ ही कार गाजली. मात्र यंदाच्या कारमध्ये त्यांनी अमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला. आता या गाडीचा खर्च लाखात पोहचला आहे. परदेशात नेण्यापर्यंतचा एकूण खर्च ४५ लाखांपर्यंत गेला आहे. यातील एकतृतीयांश खर्च हा आयआयटी मुंबईने उचलला असून त्यांच्यासह अनेक खाजगी कंपन्यांनी यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

ओरकाची खासियत

वेळ : १.८६ सेकंद

(०-६० किमी प्रती तास)

वेळ : ३.४७ सेकंद

(०-१०० किमी प्रती तास)

पॉवर : २ ७ ४० केडब्लू किंवा १०८ बीएचपी

वजन : २४० किलोग्रॅम

सर्वोच्च वेग – १४५ किमी प्रती तासाहून अधिक

चॅसीस : स्टीलच्या फ्रेमध्ये बांधणी

ड्राइव्ह : रिअर व्हील ड्राइव्ह