साधारणत: दुपारी एक दीडचा सुमार ‘नागपूर’ या भारत-भूच्या मध्यवर्ती शहरातील एक महाविद्यालय ‘हिस्लॉप’ आणि त्या महाविद्यालयाचं एक मध्यवर्ती विभाग मंडळ म्हणजे ‘मराठी विभाग’. सांगायचं तात्पर्य हे की अस्मादिक अशा रणरणत्या उन्हात (नागपुरात कुठल्याही महिन्यात दुपारच्या सुमारास वेगळे सांगणे न लगे)! अभ्यासूंनी तापमान विभागातून खात्री करून घ्यावी) वरील उल्लेखीत ठिकाणी ‘प्रा. शेळके’ नामक प्रोफेसरीय मास्तरांस भेटण्यासाठी गेले आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेनेच दुर्लक्षिलेल्या एका व्यथेचा आम्हास शोध लागला.
नेहमी आपल्या विभागात शांततेचे पाईक असल्याप्रमाणे वागणारे शेळके सर आज बाजीप्रभू देशपांडे पार्ट-टू होऊन स्वत:वर होणारे असंख्य शब्दरूपी वार एक तोंडी परतवित होते. आज महाविद्यालयीन प्रवेश अर्जाची शेवटची ‘तिथी’ होती आणि ज्या प्रमाणे निवडणुकीच्या आधी चार वर्षे झोपेत असलेला सत्ताधारी पक्ष शेवटचे वर्ष संपण्यापूर्वी खडबडून जागा होत जनतेवर योजना आणि आरक्षणांचा वर्षांव करतो, त्याच हिरीरीने कितीतरी विद्यार्थी शेवटच्या तारखेस प्रवेशासाठी येऊस सरांचे डोके उठवीत होते.
‘‘सर, टी.सी. आज मिळाली नाही, उद्या दिली तर चालेल?’’
‘‘सर मला ‘इतिहास’ नव्हे ‘समाजशास्त्र’ पाहिजे तेवढं बदलून द्या ना’’
‘‘सर, मी कॅटेगरीत येत नाही, पण काही सवलत मिळेल का?’’
या आणि अशाच बहुरूपी वारांना सर तोंड देत होते आणि दारात आणखी एखादा विद्यार्थी किंवा पालक दिसला की, ‘‘मसणात का जात नाहीस लेका!’’, असे मनात म्हणत चेहऱ्यावरची असहाय्यता दडपण्याचा प्रयत्न करीत होते.
हो! तुम्हाला काय माहीत, प्रत्यक्ष लढाई एकटय़ाने गाजवणाऱ्या नेपोलियनला जर ह्य़ा प्रवेश प्रक्रियेला जुंपले असते तर त्याने अवघ्या दुसऱ्या मिनिटाला बिनशर्त शरणागती लिहून दिली असती.
मुळातच महाविद्यालयाचा प्रवेश हा पहिला प्रवेश अर्ज भरताना चुकणे, त्यात विषयांबद्दल गोंधळ होणे, अर्जात नको तितक्या खाडाखोडी होणे, मानसशास्त्राऐवजी तर्कशास्त्र किंवा तत्सम काही चुका होणे, एखादे कागदपत्र गहाळ होणे व त्यावरून अर्ज भरण्याच्या खिडकीवरून परत येणे इत्यादी प्रक्रियेवाचून पूर्णच होत नाही, असे माझे ठाम मत आहे. अशा या पूर्ण प्रक्रियेचे भार-भरण किती हे त्या विद्यार्थ्यांला आणि प्रवेश अर्ज तपासून देणाऱ्या प्रोफेसराच्या जळत्या जिवाला ठावूक. विद्यार्थ्यांचे त्यातल्या त्या बरे. त्यास सर्व अस्ता भारती करव्या लागत नाही. पण प्रोफेसरंची मात्र कसोटी लागते. एकाकाने भरून दिलेली प्रवेशपत्रे तपासता तपासता त्यास स्वत:लाच डॉक्टरांकडे जाऊन एकदा तपासून घ्यावे, असे वाटायला लागते आणि या संपूर्ण प्रक्रियेचा गोंधळ पाहता ही भावना विनाकारण नाही. हे सहज लक्षात येते. मला तर हा सगळा सावळा गोंधळ बघून सरकारने यासाठी एक स्पेशल कोर्स ठेवावा, असे वाटू लागले.
फक्त प्रवेश प्रक्रियेतीलच नव्हे तर महाविद्यालयीन कामकाजात लागणारे एकूणच सर्व प्रकारचे अर्ज म्हणजे प्रवेश फॉर्म ते स्कॉलरशीप फॉर्म, फ्री-शीप फॉर्म, परीक्षा फॉर्म इत्यादी जेजे म्हणून भरावयाचे असतील तेते सर्व फॉर्म शेवटच्या दिवसातच भरावयाचे असा जणू अलिखित कायदाच आहे! बरे एखाद्या सूज्ञ विद्यार्थ्यांने जरी फॉर्म लवकर भरायचा असे ठरवले तरी विविध कागदपत्रे गोळा करणे हे पहिले आव्हान..कारण नेमकी कुठली कागदपत्रे जोडायची हे खरे तर कोणासही निश्चित ठावूक नसते, त्याला करणार काय? कारण दरवर्षी विद्येचं पीठ दळणारे ते महनीय विद्यापीठ त्यात नवनवीन भर घालतच असते. आदल्या वर्षांपर्यंत लागणारे एखादे सर्टिफिकेट बाद होऊन त्याची जागा एखाद्या दुसऱ्याच अगंतुकाने घेतलेली असते. त्या कागदपत्रांच्या बाबतीत संबंधित विद्यार्थ्यांचा ‘अभिमन्यू’ झालेला असतो.
बरे कागदपत्रांची कशीबशी पुर्तता करून संबंधित खिडकीत आल्यावरही तो ‘बाबू’ नामक महाभाग आपला अर्ज स्वीकारेलच याची खात्री शून्य!!! कोणत्याही त्रुटी न काढता ज्याचा अर्ज पहिल्याच खेपेला स्वीकारला गेला असेल तर त्याने ‘मागच्या जन्मीचे पुण्य फळाला आले असे समजावे! कारण हा योग ९९ टक्के प्रजेच्या ललाटी नाही’!
सांगायची गोष्ट अशी की, अशा अनेक प्रकारचे कागदी घोडे नाचवून दिलेल्या तारखेच्या शेवटच्या दिवशी एकदाचा फॉर्म भरून होतो आणि विद्यार्थ्यांसकट समस्त प्राध्यापक वर्ग टपरीवरचा फर्मास चहा पिण्यास एकदाचा मोकळा होतो.