अगदी आताआतापर्यंत कट्टय़ावर गप्पांचे फड रंगविणारे, कँटीनमध्ये तासन्तास वेळ घालविणारे कॉलेजियन्स सध्या मात्र अभ्यासात बिझी झाले आहेत. प्रथम व द्वितीय वर्षांच्या परीक्षा नुकत्याच सुरू झाल्या असून शेवटच्या वर्षांतील विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाच्या परीक्षाही पुढील महिन्यात असल्याने कॅम्पस कट्टे, कँटीन, मदान, पार्क अशा कॉलेजियन्सनी नेहमीच गजबजणाऱ्या जागा आता ओस पडू लागल्या असून सर्वत्र एक्झाम फीव्हर सुरु झाला आहे. त्यामुळे क्लास टेस्ट,बोर्डाच्या परीक्षा, अ‍ॅन्युअल्स, अभ्यास, नोट्स अशा भारदस्त शब्दांनी सगळ्या महाविद्यालयांमधील वातावरण अगदी परीक्षामय झाले आहे. काही महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरू आहेत, तर काही ठिकाणी लास्ट मिनिट रीव्हिजन, तर कुठे अभ्यासक्रम संपवून स्टडी लीव्हही देण्यात आली आहे. अभ्यासाला सुरुवात आज करू उद्या करू, फेस्टिव्हलनंतर बघू असे करता करता अभ्यासाचा ‘तो’ दिवस काही केल्या आला नाही. त्यामुळे आता सगळेच अभ्यासाला लागले आहेत.

परीक्षा म्हटली की, कॉलेजियन्सची पहिली सुरुवात नोट्स, महत्त्वाचे प्रश्न, पुस्तके मिळवण्याच्या धडपडीपासून होते. त्यामुळे वर्षभरातील सारे ‘आऊटस्टँडिंग’ विद्यार्थी आता नोट्स मिळवण्याच्या धावपळीत आहेत. त्यासाठी मग आपल्या ग्रुपमधील मित्रमपरीक्षा म्हटली की, कॉलेजियन्सची पहिली सुरुवात नोट्स, महत्त्वाचे प्रश्न, पुस्तके मिळवण्याच्या धडपडीपासून होते. त्रिणींसह एरवी ज्यांना आपण ओळखतही नाही अशा क्लासमेटकडून नोट्स मिळवण्यासाठी याचना केली जाते. या दिवसांमध्ये वर्गातील स्कॉलर्सना मात्र अधिक भाव मिळत असतो, कारण परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाला आवश्यक असणारी सारी रसद त्यांच्याकडे उपलब्ध असते. या सर्वाकडून प्रयत्न करून या नोट्स मिळवल्या, की पुढची पायरी म्हणजे त्यांचे झेरॉक्स करणे. त्यामुळे नोट्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांची गर्दी झेरॉक्स दुकानांसमोर ओसंडून वाहत आहे. हे सर्व सोपस्कार पूर्ण करून अभ्यासाचे साहित्य मिळवल्यावर सर्वात महत्त्वाचे असते ते अभ्यासाला बसण्यासाठी ठिकाण शोधणे. प्रत्येक महाविद्यालयाचे विशिष्ट असे कानेकोपरे ठरलेले असतात जिथे परीक्षेच्या दिवसांमध्ये विद्यार्थी हमखास अभ्यास करताना दिसतात. यात एकेकटय़ाने व शांततेत अभ्यास करणारे जसे असतात तसेच ग्रुपबरोबर आणि कोणत्याही ठिकाणी अभ्यास करणारेही असतात. त्यामुळे एरवी जिथे चुकूनही जाणे होत नाही अशा रीडिंग रूम, लायब्ररीपासून ते कॅन्टीन, कॉफी शॉप्सपर्यंत सर्वच ठिकाणी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र सहसा ग्रुप स्टडीजचा मार्गच अवलंबला जातो. त्यामुळे नेहमी गॉसिप्स, थट्टामस्करीमध्ये रमणारे कॉलेजियन्स आता ‘एकमेका साहय़ करू’ वृत्तीने स्टडी टॉक्स करताना दिसत असतात.

यंदाही महाविद्यालयांच्या लायब्ररींमध्ये तर हाऊसफुल्लचा बोर्ड लावावा इतक्या संख्येने विद्यार्थी अभ्यास करताना दिसतात. लायब्ररीमधल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना या काळात सुगीचे दिवस आलेले असतात. प्रत्येक जण ही पुस्तके आपल्या कार्डावर घेण्याच्या प्रयत्नात असतो. पुस्तक नाही मिळाले तर ते ज्याच्याकडे असेल त्याच्याकडून कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले जातात.

तसेच परीक्षांच्या काळात वर्गात कधीही न दिसणारे विद्यार्थीही कॅम्पसमध्ये फिरताना दिसत असतात. स्कॉलर विद्यार्थ्यांना, त्या त्या विषयाच्या शिक्षकांना भेटून महत्त्वाचे प्रश्न, नोट्स, पुस्तके मिळवण्यासाठी हे विद्यार्थी या काळात कॅम्पसमध्ये आलेले असतात. स्कॉलर असणारे विद्यार्थी मात्र आधीपासूनच अभ्यासाला लागलेले असल्यामुळे ते बिनधास्त असतात. त्यामुळे एखादा धडा किंवा काही भाग समजला नसल्यास तो समजावून घेण्यासाठी इतर विद्यार्थी त्यांना शरण येतात. मग हे स्कॉलर आपल्या दिव्य ज्ञानाच्या साहाय्याने या पामरांच्या शंकांना उत्तरे देताना, त्यांना मार्गदर्शन करताना दिसत असतात.

परीक्षांच्या काळात काही सुपीक डोक्यांमधून अभ्यास करण्याच्या विविध कल्पना लढवल्या जातात. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा, सराव प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचा आढावा घेत काही धडे, टॉपिक ऑप्शनला टाकत टाकत एकदाचा अभ्यास उरकला जातो. यंदाही कॉलेजियन्स स्टडी हार्डपेक्षा स्टडी स्मार्टचा फॉम्र्युला राबवताना दिसत आहेत. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार, मार्काच्या वेटेजनुसार आवश्यक तेवढाच अभ्यास करायचा, उगीच फापटपसारा वाचत बसायचा नाही हे अनेकांनी ठरवले आहे; परंतु तरीही अनेक वेळा आपण जे वाचतो त्याविषयी परीक्षेत प्रश्नच येत नाही, तर नेमके आपण ऑप्शनला टाकलेल्या धडय़ावरच जास्त प्रश्न आलेले असतात. अशा वेळी उडणारी तारांबळ ही ज्याची त्यालाच ठाऊक असते.

रात्रीस अभ्यास चाले..

काही वेळा दिवसभर नोट्स मिळवून कधी संध्याकाळ होते हे कळतही नाही आणि मग नाइटआऊट्सचे प्लॅन ठरतात. अनेक जण रात्री मित्रांना घरी बोलावून अभ्यासाचा अड्डा जमवतात. अभ्यासासाठी होणारे हे नाइटआऊट्स म्हणजे वेगळेच वातावरण असते. कधी कधी तर अभ्यास राहतो बाजूला, नुसत्या गप्पाच रंगत असतात; पण यातही भानावर आणणारा स्मार्ट मित्र सोबत असतोच. मग डुलक्या घेत, गप्पा मारत, चहा-कॉफी घेत अभ्यास केला जातो. एकेकटय़ाने अभ्यास करत असल्यास अभ्यासाला सुरुवात करण्याआधी किंवा एखादा धडा वाचून झाल्यावर एकमेकांना व्हॉटसअ‍ॅप करण्याचे मात्र ठरलेले असते; परंतु हे करताना अभ्यास कमी आणि व्हॉटसअ‍ॅप जास्त असे होऊ नये याचीही खबरदारी घेतली जाते. पुस्तके, नोट्स डोळ्यांसमोर धरले, की का कोणास ठाऊक, परंतु अनेकांना झोप यायला लागते. अशा वेळी वर्षभर केलेला टाइमपास, मस्ती, बंक केलेले क्लास आठवू लागतात आणि मग पूर्वीच अभ्यासाला सुरुवात केली असती तर.. असे विचारही मनात यायला लागतात. तासभर अभ्यास केला, की लगेच कंटाळा येऊ लागतो. मग ‘तुझे किती झाले?’, ‘माझे एवढेच झाले आहे’, ‘टेन्शनमुळे काहीच होत नाहीय’.. अशा प्रकारच्या मेसेजेस्नी कॉलेजियन्सचे इनबॉक्स व सेन्ट आयटम्स भरलेले असतात. मात्र यादरम्यानच फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर अपडेट होणारे परीक्षेचे स्टेटस, रात्री मित्रमत्रिणींशी फोनवरून केली जाणारी चर्चा, काय वाचू काय नको? इथपासून ते इतके सगळे एका रात्रीत कसे होणार?, परीक्षेला काय येईल? अशी काळजी करत कसाबसा अभ्यास होत असतो.

शेवटच्या क्षणांची लढाई!

  • त्यामुळे अभ्यासक्रमातील कोणताही भाग नजरेखालून जाण्याचे राहू नये यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पुस्तकात डोकी घातलेले कॉलेजियन्स दिसत असतात. एवढे असले तरी परीक्षेच्या काळात एन्जॉय करणारेही अनेक जण असतात.
  • आता सेमेस्टर पद्धतीमुळे वर्षभरात अनेक वेळा परीक्षा होत असल्यामुळे त्यांच्यापासून सुटका नाही, हे जरी खरे असले तरी मजामस्तीची साथ मात्र आपण सोडायची नाही असेही अनेकांनी ठरवलेले असते.
  • अभ्यास असला तरी धम्माल मस्ती हा आपला ऑक्सिजन असल्याचे सांगत अनेक कॉलेजियन्स परीक्षांच्या काळातही मुव्हीजला तसेच खेळायला जात असतात. ग्रुप मेंबरचा बर्थडे असल्यास तो सेलिब्रेट करण्यासाठीही पुढाकार घेतला जातो.
  • परीक्षांच्या काळात अशा गोष्टी मूड फ्रेश करण्यासाठी गरजेच्या असतात, असे या कॉलेजियन्सचे म्हणणे आहे. हे सर्व करत असतानाच अभ्यासाचा डोंगर पार करण्याच्या प्रयत्नांना मात्र कुठेही कमी पडू दिले जात नाही. त्यामुळे सर्वानीच स्वत:ला परीक्षेच्या तयारीत पूर्णपणे झोकून दिल्याने कॅम्पसमध्ये सध्या तरी ‘शांतता.. अभ्यास चालू आहे!’ असेच चित्र आहे.