25 November 2017

News Flash

हितसंबंधी मंडळींचा मैदानाबाहेरचा ‘सामना’

लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी बहुसंख्य लोक शहाणे असावे लागतात, परंतु लोक जेव्हा सार्वभौम होतात,

अक्षय शारदा शरद | Updated: July 8, 2017 3:26 AM

‘‘देभपं’चा दंभ’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत. 

लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी बहुसंख्य लोक शहाणे असावे लागतात, परंतु लोक जेव्हा सार्वभौम होतात, तेव्हा आपण शहाणे होण्याची गरज आहे याचा त्यांना विसर पडतो. भारताच्या सद्य:स्थितीला अगदी साजेसे असे हे विधान म्हणजे आपल्या दयनीय स्थितीचे काहीसे चिंताजनक वास्तव म्हणावे लागेल. आपल्या देशात कधी, कोणत्या कारणाने आपले देशप्रेम, देशभक्ती, राष्ट्रवाद उफाळून येईल याचा काही नेम नाही. काश्मीर असो वा पाकिस्तान संदर्भातली कोणताही मुद्दा, आपल्या राष्ट्रवादाचा पारा कसा अधिक चढतो हे मागील वर्षी घडलेल्या काही घटनांमधून आपल्याला पाहावयास मिळालेच आहे. सध्या त्यात भरीस भर म्हणजे उन्मादी क्रीडाप्रेमींच्या (नवराष्ट्रवादी..) अपरिपक्व, अविवेकी कृती. जागतिक बाजारपेठीय अर्थकारणाचा विचार करता हीच अपरिपक्व कृती तथाकथित राष्ट्रप्रेमींच्या अविवेकी दिशादर्शनाची भूमिका स्पष्ट करते. असो.. खेळ हा खेळ असला पाहिजे. त्यालासुद्धा आपण राष्ट्रीय अस्मितेची लेबले लावून अधिकाधिक संकुचितवादाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची सुरुवात केलीय. खेदाने म्हणणे अपरिहार्य. मात्र हेच आजच आपले वर्तमान आहे. खेळ आणि कला यांना सीमा नसतात हे आपण जगाला दाखवून दिले. आज मात्र खेळच नव्हे तर कलेच्या बाबतीतही आपण किती धरसोड वृत्ती दाखवल्यात याची अनेक उदाहरणे देता येतील. मुळातच खेळ आणि राष्ट्रप्रेम या बाबी एकमेकांस पूरक असल्या तरी प्रत्येक गोष्टीप्रमाणे यालाही अस्मितांची लेबले लावून आपल्या पराभवाचे खापर इतरांवर फोडणे यातून नेमके काय हासिल होणार आहे याचा विचार अग्रक्रमाने करणे गरजेचे आहे, किंबहुना प्रतीकात्मकतेच्या जंजाळात स्वत:ला अडकून घेत आपण आपले भारतीयत्व सिद्ध करण्यास कुठे तरी कमी पडतो आहोत याचा विसर पडणे हेच आपल्या नैतिक पराभवाचे सर्वात मोठे कारण आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. विसाव्या शतकाच्या आठव्या दशकात अमेरिका व चीन यांनी राजनयिक संबंध जोडण्यासाठी क्रीडा क्षेत्राचा आधार घेतला होता. त्यांनी टेबल टेनिस या खेळाच्या माध्यमातून परस्परसंबंध दृढ करण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही नीती त्या वेळी ‘पिंग पौन्ग डिप्लोम्सी’ या नावाने ओळखली गेली. २००५ मध्ये भारत व पाकिस्तान यांनीही आपापसातील राजनयिक संबंध पूर्ववत करण्यासाठी क्रिकेटचा आधार घेतला. तो आपल्या धोरणाचाच एक भाग होता हे विसरता नये. नंतरच्या काळात मात्र पाकिस्तान वारंवार करत असलेल्या दगाबाजीच्या धोरणामुळे भारतीय नागरिकांकडून पाकिस्तानशी मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास विरोध झाला. सध्याही त्यात काही बदल झालेत अशी स्थिती नाही. मुळातच पाकिस्तानसंबंधी व इतर देशांसंदर्भात आपले परराष्ट्र धोरण वेगळे राहिले आहे. पाकिस्तानने काही कुरापती केल्यास प्रक्षुब्ध होणारे आपले जनमानस इतर देशांच्या बाबतीत काहीसे शांतच असते. राष्ट्रवादाची बीजे कशी एककल्ली पेरली जाताहेत याचे हे निर्देशक म्हटले तर वावगे ठरू नये आणि मग त्यातूनच धर्मावर आधारित विद्वेषाची पिके घेण्याचा प्रयत्न आपसूकच होतो. भारताने हॉकीच्या मैदानात पाकिस्तानच्या केलेल्या धुव्व्यापेक्षा क्रिकेटमध्ये भारताचा झालेला पराभव अधिक चर्चिला गेला. निश्चित कार्यकारणभावामुळे का होईना भारताची हार समोर दिसताच अनेकांचे लक्ष हॉकीकडे वळले आणि हा आपला राष्ट्रीय खेळ असल्याचा साक्षात्कार यानिमित्ताने का होईना अनेकांना झाला असावा हेही नसे थोडके.. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन सुपरसीरिजमध्ये किदम्बी श्रीकांत याने प्रतिस्पध्र्यास चितपट करत विजेतेपद मिळवणे तेही चिनी खेळाडूस नमवून. हेसुद्धा आशादायक चित्र होते.

क्रिकेटप्रेमाचा ‘अति’ ज्वर चढलेल्यांस ते दिसणे तसे धूसरच. दुसरीकडे महिला चॅम्पियन स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज ही क्रिकेटच्या इतिहासात सलग सातव्या सामन्यात अर्धशतक झळकावणारी पहिला महिला ठरली. या नारीशक्तीचा यथोचित गौरव टीआरपीसाठी आसुसलेल्या माध्यमीय चर्चेत जेव्हा होताना दिसत नाही तेव्हा ती सल अधिक बोचते. वरील संदर्भ पाहता भारतीय क्रीडा क्षेत्राची ही शोकांतिका म्हणावी लागेल आणि म्हणूनच या बाबींचा आज अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. चॅम्पियन करंडक स्पर्धेत भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर आपल्या देशातील काही भागांत जल्लोष करण्यात आला, त्यामुळे उत्साही राष्ट्रप्रेमींना अधिकच ज्वर चढला. पाकिस्तान व भारतासंदर्भातील कोणताही प्रश्न असो, दोन्ही बाजूंची ‘हितसंबंधी मंडळी’ तो तापवण्याचा प्रयत्न करून आपली पोळी (राजकीय असो की धार्मिक..) भाजण्याचा प्रयत्न करणार.. नेहमीप्रमाणे हाही विषय त्याला अपवाद नाही. मुळातच पाकिस्तानबाबत बोलायचे तर भारताचा द्वेष करण्याच्या एकमेव गरजेपोटी ‘भारतविरोध’ हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे मुख्य सूत्र पाकिस्तानने ठेवले आहे. त्यामुळे अशा द्वेषी वृत्तीला (आणि हो अशाच स्वदेशी प्रवृत्तींनासुद्धा..) आपण कितपत किंमत द्यायची हे विचारीजनांनी आपल्या विवेकबुद्धीवर सोडणे जास्त श्रेयस्कर ठरेल.

अक्षय शारदा शरद

(कीर्ती महाविद्यालय, दादर)

First Published on July 8, 2017 3:26 am

Web Title: loksatta blog benchers winner marathi articles