भारतातील अर्थशास्त्रीय संशोधन

मुंबईच्या कलिना कॅम्पसमध्ये विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र या विभागाच्या वतीने मंगळवारी ८ मार्च रोजी अरविंद सुब्रमनिया मुख्य अर्थशास्त्र सल्लागार, भारत सरकार यांनी भारतातील अर्थशास्त्रीय संशोधन या विषयावर विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या व्याख्यानासाठी विद्यापीठाव्यतिरिक्त इतर महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

मुंबईचा इतिहास

साठे महाविद्यालयाच्या इतिहास आणि एआयसी विभागाने मुंबईचा इतिहास या विषयावर संशोधन करणाऱ्या तत्कालीन संशोधकांचे अभ्यासपत्र सादर करण्यात आले. यासाठी डॉ. कविता रेगे यांनी पुढाकार घेतला असून इतिहास विभागाच्या प्रमुख अभिदा धुमटकर व त्यांच्या सहकारी प्राध्यापकांनी कार्यक्रम घडवून आणला. मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख मंजिरी कामत यांनी परिसंवादाचे उद्घाटन केले. या वेळी त्यांनी ‘मुंबईच्या इतिहासाचे लेखन’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यामध्ये मुंबईमधील कामगार, नागरीकरण अशा अनेक विषयांवर अभ्यासकांच्या पुस्तकांचे दाखले देत मुंबईचा इतिहासाचा परिचय करून दिला. या वेळी पहिल्या सत्रात प्राच्यविद्या आणि नाणकशास्त्र या विषयावर नाणकशास्त्राचे अभ्यासक महेश कालरा यांनी अभ्यासपत्र सादर केले. यानंतर ‘आधुनिक मुंबई’ यावर वझे-केळकर महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. प्रीता नीलेश यांनी आपला अभ्यास मांडला. याशिवाय या सत्रात १५ अभ्यासपत्रे सादर करण्यात आली. यामध्ये प्रार्थना समाज, कापड उद्योग यांसारख्या अनेक विषयांच्या इतिहासाची माहिती या परिसंवादाच्या माध्यमातून विद्याथ्र्र्याना मिळाली. चैतन्य भिडे यांनी ‘स्मशानभूमी’ या विषयावर, तर संजय जोशी यांनी ‘बेस्ट बस सेवा’ या विषयावरील आपला अभ्यास सादर केला. याबरोबरच परिसंवादाच्या शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांची आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावर विद्यार्थ्यांनी मुंबईतील वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून अभ्यासपत्र सादर केले होते. यामध्ये प्रथम पारितोषिक साठे महाविद्यालयाच्या आकाश पवार या विद्यार्थ्यांला उत्कृष्ट अभ्यासपत्रासाठी देण्यात आले.

अर्थशास्त्राचा ‘प्रभाव’

वित्त संस्थांच्या कामकाजापासून ते त्यांच्यासमोरील आव्हानांपर्यंतच्या विविध विषयांचा आढावा घेणारा ‘प्रभाव’ हा एकदिवसीय कार्यक्रम ११ मार्च रोजी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पार पडणार आहे. हा कार्यक्रम ‘जमनालाल बजाज इंस्टिटय़ूट व्यवस्थापन संस्थे’च्या ‘वित्त व्यवस्थापन’ विषयाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला आहे.

हा कार्यक्रम सकाळी ८.३० ते सायं. ४ या वेळात पार पडणार आहे. यामध्ये ‘आदित्य बिर्ला’ वित्तीय सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय श्रीनिवासन, ‘पे-टीएम पेमेंट बॅंके’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रींजिनी कुमार, ‘कोटक महिंद्रा म्युच्युअल फंड’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश किरकिरे, एचएसबीसीच्या बॅंकिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील संघई, ‘आदित्य बिर्ला’ खासगी गुंतवणूकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुथ्थुकुमारन, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे विशेष अधिकारी कौस्तुभ धावसे, ‘डीबीएस’ बॅंकेच्या विक्री विभागाचे मुख्य अरविंद नारायणन आदी मान्यवर वक्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. आर्थिक क्षेत्रातील बदलते चित्र, खासगी क्षेत्रात गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन या विषयांवर परिषदेत चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

वेलिंगकरमध्ये पदवीदान समारंभ

सामाजिक कार्यकर्ते, महारोगी सेवा समितीचे सचिव आणि मुख्य अधिकारी डॉ. विकास आमटे यांनी वेलिंगकर संस्थेतील व्यवस्थापन विषयातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या वर्गाला पदवीदान समारंभप्रसंगी संबोधित केले. वेलिंगकरच्या व्यवस्थापन संस्थेच्या प्रांगणात अलीकडेच एक पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी इस्रायलचे वाणिज्य दूत डेव्हिड एकोव्ह विशेष अतिथी म्हणून आणि वी स्कूलचे समूह संचालक प्रा. उदय साळुंखे यांच्या हस्ते दीक्षान्त प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. मीसुद्धा एका विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतो, जो अशा वंचित लोकांचा समुदाय आहे, ज्यांना समाजाने कुष्ठरोग झाला म्हणून फेटाळले, लाथाडले, निष्कातीत केले. या लोकांना त्यांची प्रतिष्ठा आणि सन्मान परत मिळवून देण्याची आमची तीव्र इच्छा आहे. जर तुम्हाला बदल घडवायचा असेल त्यासाठी तुम्ही त्या क्षणापासून काम सुरू करायला हवे. याचबरोबर आमटे म्हणाले की, जेव्हा तुम्ही व्यावसायिक जगतात पदार्पण कराल तेव्हा एक माणूस या नात्याने इतर माणसांच्या उन्नतीसाठी योगदान देण्यासाठी तुमची कर्तव्ये आणि भूमिका कायम स्मरणात असू द्या.