बँका व एटीएममध्ये पैसे कमी झाल्याने आता रोकडरहित व्यवहारांचा मुद्दा पुढे आला आहे रोकडरहित व्यवहारांना समाजाकडून सकारात्मक प्रतिसाद कितपत मिळेल असे तुम्हाला वाटते.

व्यवहार तसा सोपा

नोटाबंदीच्या निर्णयानंतर आर्थिक व्यवहार करणे लोकांना मुश्कील झाले आहे. त्यामुळे एकंदरच लोकांच्या नाका-तोंडाशी पाणी आल्याने त्यांना ‘कॅशलेस’ व्यवहारांकडे वळावेच लागले. इतके दिवस मीदेखील ऑनलाइन व्यवहार करणे टाळले होते. मात्र आता मीसुद्धा हा पर्याय निवडला आहे. आता मलाच कळले की, ‘कॅशलेस’ व्यवहार ही सोपी बाब असून ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर लगेच अंगीकारता येईल. नागरिकांनी ‘कॅशलेस’ व्यवहार समजून घ्यावे.

अथर्व चव्हाण, रुपारेल महाविद्यालय

 

कॅशलेसव्यवहार उत्तम पर्याय

बँक व एटीएम केंद्रांवर पैसे कमी झाल्याने जरी गोंधळ कमी झाला असला तरी त्यात सरकार पूर्वतयारीत कमी पडले असे मला वाटत नाही. कारण सरकारने आता ‘कॅशलेस’ व्यवहारांचा उत्तम पर्याय पुढे आणला आहे. परदेशातील बहुतांश व्यवहार हे ऑनलाइनच होतात. त्यामुळे नागरिकांनी चिडून न जाता कॅशलेस व्यवहारांचे सूत्र अंगीकारले पाहिजे. त्यात त्यांचाच त्रास कमी होईल.

प्रियांका मयेकर, रुपारेल महाविद्यालय

 

निर्णय योग्य, मात्र सामान्यांचे हाल

सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे, मात्र या निर्णयानंतर सामान्य माणसांचे हालच झालेले दिसतात. परवा बँकेच्या रांगेत पैसै काढण्यासाठी उभा होतो, तेव्हा काही ज्येष्ठ महिलांना झालेला त्रास पाहवला नाही. ज्येष्ठांना आज बँकांचे व्यवहार नीट जमत नाहीत, तर ते ‘कॅशलेस’ व्यवहार तरी कसे करणार? सामान्य माणसांना सरकारने प्रथम समजून घेणे आवश्यक आहे.

अक्षय खुडकर, कीर्ती महाविद्यालय

 

ग्रामीण भागाचे काय?

मुंबईसारख्या शहरी भागात ‘कॅशलेस’ व्यवहार चालतील, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना संपूर्ण देशात ‘कॅशलेस’ व्यवहार होणे अपेक्षित आहे. ते इतक्या लगेच साध्य होऊ शकणार नाही, कारण देशातील ग्रामीण भागात आधीच बँक व्यवहारांबातीत नागरिक अनभिज्ञ आहेत, तर ऑनलाइन व्यवहार त्यांना ठाऊकच नाहीत. त्यामुळे यात ग्रामीण जनतेचे हाल होण्याचीच शक्यता अधिक आहे.

मुकुंद पाबळे, मुंबई विद्यापीठ