सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांवर तन्मय भट्ट या विनोदवीराने केलाला विनोद हा विकृत असून आधी त्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि विनोदाच्या मर्यादेची आखणी करण्याची गरज असल्याचे मत विद्यार्थ्यांनी मांडले.
विनोद लोकांना खळखळून हसविणारा असतो, मात्र प्रत्येक विनोदाची एक मर्यादा असते. तन्मय भट्ट या कलाकाराने लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या दिग्गज व्यक्तिमत्त्वांवर केलेला विनोद आक्षेपार्ह आहे. यासाठी खरे तर तन्मय भट्ट नुकसानभरपाईसाठी पात्र आहे. याच्या तुलनेत सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचे कर्तृत्व कैक पटींनी मोठे आणि समृद्ध आहे. लोकांच्या मनात त्याच्याविषयी विनोद करण्यापूर्वी तन्मय याने विचार करणे गरजेचे होते. असे करून त्याने स्वत:चे करिअर धोक्यात घातले आहे.
– प्रांजली कुलकर्णी, रूपारेल महाविद्यालय
विकृत विनोद करून प्रसिद्धी मिळविण्याची मानसिकता ही काही नवीन नाही. या आधीसुद्धा एआयबीने अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन चुकीच्या कामासाठी प्रसिद्धी मिळविली होती. सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर विनोद करून तन्मय भट्टने आपली बौद्धिक दिवाळखोरीच दाखविली आहे. अशा व्यक्तींनी स्वत:ला कलाकार म्हणवून घेऊ नये आणि अशांवर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. तोपर्यंत या घटनांवर नियंत्रण आणता येणार नाही.
– आदित्य कुलकर्णी, साठय़े महाविद्यालय
प्रसिद्धी मिळविण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो हे तन्मय भट्ट या कलाकाराच्या विनोदबुद्धीवरून लक्षात येते. सर्वाना अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे, असे जरी असले तरी त्याला काही बंधने आहेत. लताबाई आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या मान्यवर व्यक्तिमत्त्व भारतीयांसाठी प्रिय आहे. यांचा अपमान कुठलाच भारतीय सहन करणार नाही. यानंतर अनेक पक्षांनी पुढे येऊन यावर विरोध दर्शविला. बऱ्याच लोकांकडून तन्मय भट्टला जिवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. एआयबीमधील विनोद काही महिन्यांपूर्वीदेखील चर्चेत होते. यामुळे प्रसिद्धीसाठी खालच्या पातळीवरील विनोद केले जातात अशी शंका येणे साहजिक आहे.
– नीलेश होलगुंडे, चेतना महाविद्यालय
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2016 4:41 am