पाचशेहजाराच्या नोटांवरील बंदीनंतर बँकांच्या रांगेत होणाऱ्या ज्येष्ठांच्या मृत्यूला सरकार जबाबदार आहे, असे तुम्हाला वाटते का?

ज्येष्ठांसाठी पूर्वनियोजन हवे

काळ्या पशांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने घेतलेला पाचशे-हजारांच्या नोटांच्या बंदीचा निर्णय योग्यच आहे असे मला वाटते. तरीही निर्णय लागू करण्यापूर्वी काही  धोरणांबाबत बँका आणि सरकार यांच्यामध्ये चर्चा होणे आवश्यक होते. कारण बँकांबाहेर लावण्यात आलेल्या रांगेत ज्येष्ठांसाठी अशा कोणत्याही वेगळ्या रांगेचे नियोजन केले गेलेले नसते. तसेच पसे खात्यात टाकण्यासाठी आणि काढण्यासाठी स्वत खातेधारक त्या ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक असल्याने ज्येष्ठ व्यक्तींना त्या ठिकाणी येणे भागच आहे. त्यामुळे ज्येष्ठ मंडळींसाठी सरकारने वेगळ्या उपायांचे नियोजन चलनबंदी पूर्वीच करणे अपेक्षित होते.

भारती मोरे, विद्यालंकार महाविद्यालय

 

सरकारला दोष नको

सध्याचे चलनबंदीचे वातावरण बघता बँकांबाहेरील रांग पाहून तरुणांनाच घाम फुटतो, तर तिथे ज्येष्ठांची काय अवस्था होत असेल हे आम्ही समजू शकतो. सध्या बँकांच्या बाहेरील रांगेत मृत्युमुखी पडणाऱ्या ज्येष्ठांची वाढती संख्या पाहता त्यांच्यासाठी सरकारने तात्काळ ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. पण बँकांच्या रांगेतील ज्येष्ठांच्या मृत्यूनां पूर्णपणे सरकार जबाबदार आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल.

दीप्ती बाडीक, सरदार पटेल तांत्रिक महाविद्यालय

 

कुटुंबांची जबाबदारी

बँकांच्या रांगेत गरज असल्यास ज्येष्ठांनी उभे राहावे अन्यथा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सहकार्य करावे. सध्याच्या काळात बऱ्याचदा घरची मंडळी ज्येष्ठांना रांगेत प्राध्यान दिले जाईल या कल्पनेने त्यांना रांगेत उभे करतात. त्यामुळे सरकारने आपल्यासाठी उचललेल्या सकारात्मक पावलावर आपण चांगले पाऊल उचलणे गरजेचे आहे. ज्येष्ठांना पाठवण्याऐवजी अन्य कुटुंबीयांनी जाणेच योग्य आहे.

रोहित येसारे, कीर्ती महाविद्यालय