विकासाच्या नावाखाली जागतिकीकरणाचे जाळे राज्यभर पसरले गेले. यातून हजारो, लाखो झाडांच्या कत्तली करण्यात आल्या. ही तोड भरून काढण्यासाठी राज्य शासनाने दोन कोटी झाडे लावण्याचे जाहीर केले. मात्र झाडे लावताना कुठे आणि कसे झाड लावले जावे याचे भान मात्र राज्यकर्त्यांना राहिले नाही. पावसाळ्यात कुठेही झाड उगवते या वचनातून डांबरी रस्त्यांवरही ही झाडे लावली जात आहेत. मात्र यामध्ये झाडे टिकवण्याच्या उपक्रमाचा अभाव दिसत आहेत. फक्त वृक्ष लावून राज्याचा विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास टाळता येणार नाही यासाठी वृक्षांच्या संगोपनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

वाढत्या जागतिकीकरणामुळे मोठय़ा प्रमाणात वृक्षांची तोड केली जाते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नैसर्गिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी राज्य शासनाने झाडे लावण्याचा उपक्रम राबविला. यासाठी अधिकाऱ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सारेचजण झाडे लावण्याच्या उपक्रमात सहभागी झाली होती. पण ही झाडे कुठे लावली जात आहे याबद्दलची विचारणा करण्यात आली नाही. झाडे लावण्याबरोबरच त्याचे संगोपन होणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण अनेक ठिकाणी डांबरी रस्ते खोदून झाडे लावण्यात आली आहे तर झाडांच्या फांद्या तोडून डांबरी रस्त्यात रोवण्यात आल्या आहेत. संख्या वाढल्याचा परिणाम गुणवत्तेवर होत असतो. या उपक्रमाबाबतही नेमके हेच झाले आहे.  अशी झाडे किती काळ टिकतील यात शंका आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन केले तर दोन कोटी लावण्याचा उपक्रम करण्याची वेळ येणार नाही.

– सागर नेवरेकर, साठय़े महाविद्यालय