दुष्काळ असताना शहरात धुळवड पाण्याने साजरी करणार की नाही याबाबत तरुणाईकडून मते जाणून घेली. तरुणाईनेही सामंजस्य दाखवत पाण्याशिवाय होळी साजरी करण्याचा निर्धार केला आहे.

रंगपंचमीमध्ये दर वर्षी पाणी वाया घालवले जाते. या दिवसांमध्ये होळीसाठी वृक्षतोड केली जाते तर मद्य प्राशन करून धिंगाणा घातला जातो. अशाने सणांचे पावित्र्य मलीन होत आहे. सण साजरे करताना परंपरा जपताना निसर्गाची आणि पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेणे आपल्या सर्वाची जबाबदारी आहे. नैसर्गिक रंगानी, पाण्याचा वापर न करता, एकमेकांशी भेटून, आपल्या विचारांचे आदान-प्रदान करूनही आनंदाने रंगपंचमी साजरी केली जाऊ शकते. होळीचा खरा अर्थ आपल्यातील तमोगुण, विकृती जाळून सत्कार्याची आणि सद्भावनेची होळी साजरी करणे हा आहे. त्यामुळे या होळीमध्ये आपल्या हातून सत्कार्य होईल यासाठी प्रयत्न करी.

– नीलेश अडसुळ, रुईया महाविद्यालय

दर वर्षी रंगपंचमीच्या काळात पाण्याने भरलेले फुगे मारणे, पाण्याने होळी खेळणे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करणे याच्या परिणामांचे तोटे आपल्यालाच सहन करावे लागत असतात. याऐवजी सामाजिक भान जपत अशा दुष्काळग्रस्तांसाठी काही मदत मिळवून देऊ शकलो तर ही होळी खऱ्या अर्थाने दु:ख हरणारी ठरेल. यासाठी आपण सर्वानी संकल्प करून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करावयास हवे. मुंबईमध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवणूक करीत त्याचा उपयोग रोजच्या वापरासाठी करावा. रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा आणि हानिकारक रंगांचा वापर टाळत साध्या पद्धतीने ही होळी साजरी केली तर सण-उत्सवांमधून खऱ्या अर्थाने आनंद घेता येईल.

– दीपक बने, विकास महाविद्यालय

सण-उत्सवांच्या नावावर आपल्याकडे ज्या प्रकारे धांगडधिंगा केला जातो यातून माणसे जोडण्यापेक्षा तोडण्यावर आपला भर जास्त आहे. येत्या रंगपंचमीमध्ये मोठय़ा प्रमाणात पाण्याचा अपव्यय करणे, हानिकारक रंगांचा वापर करणे, फुगे मारणे यांसारख्या प्रकारांमुळे या सणाच्या आनंदापेक्षा नुकसानच व्हायचे आहे. मात्र यासाठी बदल आपण स्वत:पासून सुरू करण्याची गरज आहे. मुंबईमध्ये गोंधळात सहभागी न होता या वर्षी आम्ही माझ्या गावी जाऊन गावकऱ्यांसोबत रंगपंचमी साजरी करणार आहोत. त्यांना सणाच्या निमित्ताने भेटवस्तू म्हणून सोलर लॅम्पही देणार आहोत. रंगपंचमीच्या दिवसात रंगाची खरेदी आणि मित्रांसोबत हॉटेलमधील पार्टी यामध्ये वायफळ खर्च न करता शेतकऱ्यांना उपयोगाच्या वस्तू देण्याची आमची इच्छा आहे.

– अथर्व चव्हाण, डी.जी. रुपारेल महाविद्यालय

लहानपणी आमच्याकडे रंगपंचमी खूप जल्लोषात साजरी केली जात होती. त्या वेळी घरातील लहानांपासून मोठय़ांपर्यंत सारेच जण खूप उत्साहाने यात सहभागी होत असत. मात्र मोठी होत गेले तसे या सणांमधील चुकीच्या पद्धतीची जाणीव होत गेली. होळी हा जर आनंदाचा, आप्तस्वकीयांना भेटण्याचा सण असेल तर लोकांना त्रास देत सण का साजरा करावा. यासाठी आपल्यातील सदसद्विवेकबुद्धी जागृत करण्याची गरज असून दुष्काळी भागात पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या करीत असताना आपण एकमेकांना भिजविण्यासाठी पाण्य़ाचा वापर कसा करू शकतो? दोन दिवसांपूर्वी एका मुलाने पाण्याऐवजी अ‍ॅसिडचा फुगा एका मुलीच्या दिशेने भिरकावला, यामध्ये तिचे कपडे जळाल्यानंतर फुग्यामध्ये अ‍ॅसिड होते हे तिच्या लक्षात आले. सण साजरे करावयाची ही कुठली पद्धत आहे? प्रत्येकाने स्वत: प्रश्न विचारत आपण काय करीत आहोत याची तपासणी करण्याची गरज आहे आणि सण साजरे करण्याची हीच पद्धत असेल तर ही असहिष्णुता आहे.

– एकता नारायणकर, मुंबई विद्यापीठ

संकलन : मीनल गांगुर्डे