महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला एकांकिकांच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून देणाऱ्या लोकसत्ता लोकांकिकाया राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे हे तिसरे वर्ष. राज्यातील नाटय़वेडय़ा तरुणाईचे भावविश्व मोहरून टाकण्याची भूमिका या स्पर्धेने दोन वर्षे नेटाने बजावली. सवंग हिंदी सिनेमे आणि तद्दन बॉलीवूडपटांचे गारूड तरुणाईवर असणाऱ्या या दिवसांत लोकसत्ता लोकांकिकाला याच तरुणांकडून मिळणारा प्रतिसाद हा लक्षणीय आहे. गेल्या तीन वर्षांत लोकांकिकांमधील ताऱ्यांनी व्यावसायिक रंगभूमीसह आशयघन मराठी चित्रपटांत दर्जेदार अभिनय तर केलाच आहे, पण राज्यभरातील एकांकिका स्पर्धाचे आव्हानही लीलया पेलले आहे. लोकांकिकांमधून पुढे आलेली ही मंडळी या चांगल्या कामांमुळे नाटय़क्षेत्रातल्या पुढील दमदार वाटचालीसाठी सज्ज झाली असून लोकांकिकांनी घडवले हीच प्रतिक्रिया सध्या व्यक्त करताहेत..

‘लोकसत्ता लोकांकिका’ची तिसरी घंटा येत्या २६ नोव्हेंबरपासून राज्यातील आठही केंद्रांवर ऐकू येणार आहे. यंदाही संपूर्ण राज्यातून महाविद्यालयांनी मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतल्याने चुरशीच्या स्पर्धाचा आनंद निश्चित मिळेल यात शंका नाही. गेल्या महिनाभरापासून मुंबई-ठाण्यामधील या महाविद्यालयांमध्ये एकांकिकांच्या तालमी सुरू असून ‘कट्टय़ापासून कँटिनपर्यंत’ या स्पर्धेत उत्तम कामगिरी कशी साधायची याचीच चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत या तालमी रंगत असून, प्रॉपर्टी, सेट, रंगभूषा, पोशाख आदींसाठी सहभागींकडून मेहनत घेतली जात आहे. तर गेल्या वर्षी सादर झालेल्या एकांकिकांमध्ये आपले महाविद्यालय मागे का पडले, तेव्हा मान्यवर परीक्षकांनी काय सल्ले दिले होते, याचीही उजळणी या तालमींतून सुरू आहे. पास होऊन बाहेर पडलेले माजी विद्यार्थी पुन्हा महाविद्यालयाच्या बाकावर येऊन या तालमींना प्रोत्साहन तर देतच आहेत, पण योग्य ठिकाणी मार्गदर्शनदेखील करीत आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक मंडळीही यात मागे नाहीत. ते विद्यार्थ्यांना स्वत: उपस्थित राहून मोलाचे चार सल्ले देत आहेत. थोडक्यात, काय तर मुंबई-ठाण्यासह राज्यातील बहुतांश महाविद्यालयीन तरुणाईचे अवकाश ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेने व्यापून टाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अल्पावधीतच या स्पर्धेने महाविद्यालयीन नाटय़ चळवळीतील एक मानबिंदू प्रस्थापित केला तर आहेच, पण उगवत्या ताऱ्यांना दिशा दिली आहे. राज्याला लाभलेला नाटय़क्षेत्राचा संपन्न वारसा जपण्याचे काम एकांकिकांच्या माध्यमातून व्हावे आणि विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला चालना मिळावी, असा हेतू घेऊन सुरू झालेल्या या स्पर्धेला राज्यात आता एक मानाचे वलय लाभले आहे. दोन वर्षांच्या या स्पर्धा काळात नाटककार महेश एलकुंचवार, अभिनेता मकरंद अनासपुरे, निर्मात्या आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांसह अनेक कलावंतांनी स्वत: उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच त्यांचे मनोबल उंचावण्याचे काम केले आहे. गेल्या वर्षी मुंबई-ठाण्यातील ‘मित्तर’, ‘अर्बन’, ‘भग्न देवालय’, ‘सुशेगात’, ‘चक्र’, ‘वी द पीपल’ या एकांकिकांनी या परीक्षकांसह उपस्थितांची मनेजिंकली होती. यामुळे स्पर्धेतून प्रेरणा घेऊन अनेक होतकरू विद्यार्थी आपल्या कलागुणांना पारखू लागली. खास स्पर्धेसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी मंडळी लेखन करू  लागली वा दिग्दर्शनाकडे वळू लागल्याची उदाहरणे या दोन वर्षांत पुढे आली. ही निश्चितच नाटय़क्षेत्रासाठी सुखावणारी बाब आहे. सर्जनाच्या नवनिर्मितीचा हा आनंद आज अनेक विद्यार्थी पुढे येऊन मांडत असून त्यांना ‘लोकसत्ता लोकांकिका’मधील कामानंतर आलेले अनुभव थक्क करणारे आहेत. काहींना इतर एकांकिकांमध्ये भूमिका मिळाल्या तर काहींना दिग्दर्शनाची संधी मिळाली तसेच काहींना व्यावसायिक नाटकात पदार्पण करता आले. एवढेच नव्हे तर, संपूर्ण देशात गाजलेला मराठी चित्रपट ‘सैराट’ यातील ‘आनी’ची भूमिका करणारी अभिनेत्री अनुजा मुळ्ये हिनेदेखील ‘लोकांकिका’मध्ये ‘चिठ्ठी’ या एकांकिकेत काम केले होते. त्यामुळे ‘लोकसत्ता लोकांकिका’चा मूळ हेतू तर साध्य होतच आहे, पण या स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण झालेली एक कलासंपन्न पिढी महाराष्ट्रातील नाटय़ रसिकांना पुढील काळात कलास्वाद निश्चितच देईल यात शंका ती नाहीच.

दिग्दर्शनाकडे वळलो..

‘लोकसत्ता लोकांकिकां’मध्ये सहभागी झाल्यावर आमच्या महाविद्यालयाने आम्हीच स्पर्धेसाठी लेखन व दिग्दर्शन करावे याची सक्ती केली होती. अन्य महाविद्यालयांनी लेखक व दिग्दर्शकांना बाहेरून पाचारण केले होते. मात्र आम्ही स्वत: लेखन व दिग्दर्शनाचे आव्हान स्वीकारले. यातूनच मला स्वत:ला दिग्दर्शनाची संधी मिळाली. त्या स्पर्धेतील माझ्या कामानंतर इतर दोन एकांकिकांचे दिग्दर्शन करण्याची मला संधी मिळाली. इतकेच नव्हे तर ‘समतोल एक्स्प्रेस’ हे व्यावसायिक नाटकही मला करता आले. यात मी अभिनेत्याची भूमिका केली होती.

पुष्कर ओक, वी.जे.टी.आय. महाविद्यालय, माटुंगा

 

भाषेची अडचण दूर झाली..

मी मराठी भाषक नसून माझी मातृभाषा गुजराती आहे, पण तरीदेखील ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत आम्ही मराठी एकांकिका सादर केली. एकांकिकेतील ५० टक्केकलाकार हे मराठी भाषक नव्हते, पण यावर मात करत आम्ही एकांकिका सादर करण्यात यशस्वी झालो. एकांकिका सादर केल्यावर परीक्षकांनी अनेक बाबी समजावून सांगितल्या. त्या पुढे इतक्या फायदेशीर ठरल्या की ही एकांकिका आम्ही ४-५ ठिकाणी सादर केली. या कामामुळेच मला पुढे ‘कॅन आय हेल्प यू’ हे इंग्रजी व्यावसायिक नाटक करता आले.

धवल ठक्कर, मिठीबाई महाविद्यालय, विलेपार्ले

 

समकालीन विचार अनुभवता आले..

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत आम्ही ‘मित्तर’ ही एकांकिका सादर केली होती. या एकांकिकेतून आम्हाला यश मिळाले, पण आम्ही कोणीच हुरळून गेलो नाही. एकदा का एकांकिकांमध्ये यश मिळाले की मुले लगेच लघुपट, व्यावसायिक नाटक, चित्रपट आदींच्या मागे लागतात. मात्र आम्ही अजूनही याची घाई न करता हे क्षेत्र समजून घेत आहोत. त्याचा अभ्यास करतो आहोत. तसेच, आमच्या सोबत राज्याच्या इतर भागांतून आलेले तरुण एकांकिकांमधून कोणता विचार घेऊन पुढे आले आहेत, त्यांचे जगण्याचे संदर्भ काय आहेत याकडेही आम्ही कुतूहलाने पाहिले. त्यामुळे आमच्या पुढील वाटचालीस ही स्पर्धा मोलाची ठरणार आहे.

ओंकार जयवंत, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे

 

अभिनयाची बाजू भक्कम झाली..

या स्पर्धेत सहभागी होऊन छान अनुभव आला. मी पंजाबी माणसाची भूमिका केली होती. अनेकांना ही भूमिका आवडल्याने माझे कौतुक झाले. परीक्षकांचे मार्गदर्शन घेऊन काही गोष्टींमध्ये सुधारणाही केली. त्यामुळे हीच एकांकिका पुढील स्पर्धामध्ये सादर केल्यावर उत्तम अभिनेत्याचे पारितोषिकही मिळाले. त्यामुळे इथून पुढे अभिनय क्षेत्रातच राहून काम करण्याच्या माझ्या भूमिकेला पाठबळ मिळाले आहे.

शुभांक राऊळ, कीर्ती महाविद्यालय, दादर

 

प्रेक्षक पसंती लाभली..

‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठीच ही एकांकिका महाविद्यालयातील कलाकारांनी लिहिली होती. काही कारणांमुळे स्पर्धेत आमच्या चमूला यश नाही आले. परंतु पुढे राज्यात तब्बल २२ ते २३ स्पर्धामध्ये ही एकांकिका आम्ही सादर केली. कोकणात प्रयोग झालेच, पण दादरला शिवाजी मंदिरलाही आम्ही या एकांकिकेचा प्रयोग सादर केला. एकांकिकेमधील सगळ्याच कलावंतांनी उत्तम काम केल्याने आम्हाला प्रेक्षक पसंती मिळाली.

अमेय परब, चेतना महाविद्यालय, वांद्रे

sanket.sabnis@expressindia.com