हिंदी विद्या प्रचार समिती यांच्या रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाच्या ‘मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटन सोहळा नुकताच झाला. या वेळी प्रसिद्ध लेखक आशुतोष जावडेकर यांनी ‘कथा : स्वरूप आणि आव्हाने’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डॉ. सुधा जोशी पुरस्कृत ‘कथारंग’ या कार्यक्रमाच्या चौथ्या पुष्पात या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. एमपीएसएस सभागृहात वाचकप्रिय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

कथा म्हणजे काय? याचे सविस्तर विवेचन करून कथेच्या सर्व प्रकारांचा आढावा घेण्यात आला. गोष्ट ते नवकथा पुढे साठोत्तरी, नव्वदोत्तरी कथा असा कथेचा व्यापक पट त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. लघुकथा, दीघरेत्तरी कथा, चार ओळींची कथा, चार शब्दांची कथा यातील बारकावे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

कथेत गोष्ट असतेच, पण गोष्ट म्हणजे कथा नव्हे. कथा ही गोष्टीच्या पलीकडे जाते. ती खोलात जाते. एखादा विशिष्ट अनुभव का आला? याचा ती विचार करते. कथेचा अवकाश छोटा असतो. ती कादंबरीपेक्षा भिन्न असते असे त्यांनी सांगितले. शिवाय कादंबरी अनेककेंद्री असते तर कथा ही एककेंद्री असते. अशा कथेच्या विविध पैलूंचा त्यांनी आढावा घेतला.

या वेळी जनाबाईंच्या अभंगांचे गायन झाले. कथा ही कवितेत कशी असते, हेही त्यांनी स्पष्ट केले. जनाबाईंचे भग्न जीवन, त्यातील व्यथा जावडेकरांनी मांडली. दृक्श्राव्य माध्यमाचा वापर करत कथेची वा कुठल्याही साहित्य प्रकाराची समीक्षा ही चित्र आणि व्हिडीओच्या माध्यमातून अधिक प्रभावीरीत्या मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाङ्मय मंडळाच्या अध्यक्षा डॉ. स्नेहा देऊस्कर यांनी केले. प्रभारी प्राचार्य डॉ. हिमांशू दावडा यांनी स्वागताचे भाषण केले. पाहुण्यांची ओळख डॉ. लतिका भानुशाली यांनी करून दिली. तर याप्रसंगी उपप्राचार्या शुभांगी वर्तक, सीमा रत्नपारखी तसेच प्रतिभा सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

उत्तम दिग्दर्शक बना..

मालाडमधील ‘प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स’च्या वतीने यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी ‘फिल्म सोसायटी’ची स्थापना करण्यात आली. सोसायटीच्या शुभारंभाचा कार्यक्रम ५ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. ‘बिग सिनर्जी’ आणि ‘कोलोसिअसम’चे विपुल मयांक हे उपस्थित होते. विविध विषयांवर आधारित लघुपट, माहितीपट, टीव्ही मालिका, म्युझिक व्हिडीओ या फिल्म सोसायटीत विद्यार्थी तयार करू शकणार आहेत. यासाठी तज्ज्ञांच्या कार्यशाळांचे आयोजनही करण्यात येणार आहे. उत्तम संवाद कौशल्य, कॅमेऱ्याचे तांत्रिक ज्ञान आणि सिनेमाबद्दलचे कौशल्य समजून घेण्याची क्षमता वाढविण्यात मदत होईल. या सोसायटीमध्ये माध्यम विभागासोबतच इतर विभागांतील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला आहे. या सोसायटीमध्ये विद्यार्थिनींचा सहभाग अधिक आहे.

प्रश्नांचे शास्त्र

‘आयआयटी मद्रास’च्या वतीने मुंबईत प्रथमच प्रश्नमंजुषा स्पर्धा होत आहे. ‘शास्त्र’ या महोत्सवांतर्गत राष्ट्रीय स्तरावर १८ शहरांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

१३ ऑगस्ट रोजी मुंबईत या स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. प्राथमिक फेरीत पाच संघाशी निवड दुसऱ्या फेरीसाठी निवड केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या फेरीअंती २५ संघांची निवड अंतिम फेरीसाठी केली जाणार आहे. अंतिम फेरीसाठी या संघांना ‘आयआयटी मद्रास’मध्ये आमंत्रित केले जाणार आहे.

संपर्क- ८५५४९६९७२४ .

कसं असेल भविष्यजीवन?

‘अथर्व कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’मध्ये सध्या ‘टेकीथॉन’ची जोरदार तयारी सुरू आहे. वार्षिक आंतरमहाविद्यालयीन तांत्रिक महोत्सव असेही याला संबोधले जाते. अस्सल अभियंत्याची ओळख तांत्रिक स्पर्धा आणि कार्यक्रमांमधून होत असते. जागतिक पातळीवर असे अभियंते चमकतात.

यंदा टेकीथॉनचा मुख्य उद्देश हाच आहे

दरवर्षी नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन हा महोत्सव साजरा केला जातो. ‘फुच्युरोपिया’ ही भविष्यातील जीवनशैलीशी निगडित असलेली संकल्पना यंदाच्या महोत्सवासाठी निवडली गेली आहे. या संकल्पनेद्वारे नवीन उपक्रम आणि शोधांसोबतच लोकांचा तांत्रिक क्षेत्रातील सहभाग वाढवण्याचा प्रयत्न आहे.  २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सवात सर्जनशील कल्पना आणि नवीन उपक्रमांचे प्रदर्शन मांडलेले असेल. याशिवाय यंत्रमानवयुद्ध

(रोबो वॉर) ‘वेब डिझायनिंग’ यांसारख्या स्पर्धा तसेच लेझर टॅग, निऑन स्पोर्ट्स (क्रिकेट, बुद्धिबळ) लॅन गेमिंग यांसारख्या प्रकाराचा समावेश यात असेल. कार्यशाळा आणि परिसंवाद महोत्सवात घेण्यात येणार आहेत. यंदा महोत्सवाचा मुख्य केंद्रबिंदू हा आंतरमहाविद्यालयीन तंत्र संमेलन असेल.