News Flash

गेमाड स्वप्ननगरी

भवतालाबाबतच्या आमच्या संकल्पना बदलण्यासही हे खेळ अनेकदा करणीभूत ठरले.

 

आमच्या पिढीचा आणि ‘मारिओ’चा जन्म साधारण एकाच कालावधीतील, ऐंशीच्या दशकातील. त्या वेळी घरोघरी संगणक नसले तरी टीव्हीला जोडायच्या व्हिडिओ गेम्सच्या संचावर मारिओशी ओळख झाली. त्यानंतर सर्कस, एनएफएस सारखे शर्यतींचे खेळ, मारामारीचे खेळ, त्यानंतर स्वत:भोवतीच कोंदण करायला लावणारे आभासी जगातील ‘रिअल टाइमिंग गेम्स’ यांनी मैदाने, माती, पडणे धडपडणे यांना बगल देऊन आमचे बालपण व्यापून टाकले. सध्या ‘ब्लू व्हेल’ या प्रकाराने आणि काही दिवसांपूर्वी आलेल्या पोकेमॉन गो या खेळांमुळे संगणकीय खेळांनी व्यापलेल्या आमच्या मेंदूची चर्चा सुरू झाली. ‘ब्लू व्हेल’ हा खेळ म्हणवला जाणारा प्रकार खेळवेडाचे टोक आहे हे मात्र खरेच, नव्वदच्या दशकात या खेळांबरोबर सुरू झालेल्या आमच्या संगोपनात वेगवेगळ्या टप्प्यांवर या खेळांच्या अधीन आम्ही होत होतो. भवतालाबाबतच्या आमच्या संकल्पना बदलण्यासही हे खेळ अनेकदा करणीभूत ठरले.

नव्वदच्या आसपास हातात मोबाइलसारखाच संच बहुतेक मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय घरातील मुलांच्या हाती आला. ‘ब्लॅक अँड व्हाइट’ स्वरूपातील दृश्यावतार असणाऱ्या संचावर मोजकेच चार दोन खेळ असायचे. समोर येणारे आकार जोडून भिंत बनवायची, असलेली वेडीवाकडी भिंत फोडून ती सलग करायची.. एकएक बिंदू जोडून स्क्रीनवर तयार केलेली अळी कुठेही धडकू नये यासाठी आटापिटा चालायचा. ‘गेम ओव्हर’ होऊ नये म्हणून हातातल्या संचावर तासंतास चाललेल्या खुडबुडीमुळे घरातल्यांच्या शिव्या खाव्या लागल्या, तरीही खेळातले पुढचे टप्पे पार केल्याचा आनंद त्या शिव्यांपेक्षा अनेक पटींनी मोठा होता. सर्वाधिक टप्पे पार करणारा मित्र एखाद्या चित्रपटातील हीरोसारखा भाव खायचा. हातातल्या छोटय़ाशा संचाच्या माध्यमातून आम्ही या ‘गेमिंग’च्या स्वप्नमय वाटाव्या अशा नगरीत ओढले गेलो. टप्प्याटप्प्याने अनेक ‘गेमाड’ कंपन्यांनी आम्हाला सतत नवीनवी स्वप्न विकली आणि आम्ही त्या आभासी विश्वातच स्वत:ला पाहायला लागलो. या खेळांतून काय मिळायचं, तर एक एक टप्पा पार केल्यानंतर कमालीच ‘आत्मसुख’ मिळायचं. राज्यकन्येला पळवणारा राक्षस आणि येणारी संकट पार करून तिला सोडवून आणणारा कुणी नायक हा परिकथांमध्ये वाचलेल्या ढाच्यात लढाई करणाऱ्या हीरोच्या जागी स्वत:ला पाहण्याची मजा मारिओ किंवा तत्सम खेळांतून मिळत होती. बाइक रेसिंग आणि रोड फायटर खेळून तर आता आपल्याला वाहन चालवायचा परवाना कुणीही बिनदिक्कत देण्यास काहीच हरकत नाही असा समज झाला होता. ‘रेसिंग’मध्ये करिअर करण्याच्या निर्णयही अनेकांनी घेऊन टाकला होता. वर्गात शेवटच्या बाकावर बसणारे कुणी ‘मारिओ’ मधले वन अप’ किंवा मध्ये पेट्रोलची गाडी कशी मिळवायची याची ‘ट्रिक’ सांगायचे, तेव्हा त्याचा वार्षिक परीक्षेचा निकाल आम्ही कायमचा विसरून जायचो. काही वर्षांत टीव्हीला जोडायच्या व्हिडिओ गेम्सच्या सेटवरून संगणकावरील गेम्सकडे आम्ही सरकलो. संगणकावर पत्ते खेळण्यापासून सुरू झालेली ‘गेमाडगिरी’ नंतर ऑनलाइन पोकपर्यंत कशी पोहोचली हे कळलही नाही. जुगार खेळणे वाईट असते हा लहानपणापासूनचा धडा आम्ही सहज विसरलो. प्रत्यक्ष पैसे लावून खेळणाऱ्यांचे प्रमाण कमी असले, तरी जुगारात जिंकल्याचा उन्माद आणि हरल्यावर येणारी कमालीची निराशा आणि त्यानंतर पुन्हा जिंकण्यासाठी नवा खेळ ही साखळी जुगारअड्डय़ाला शोभेशीच होती.

रोड फायटर, नंतरच्या काळात मॉर्टल कॉम्बॅक्टने मेंदूचा ताबा घेतला. त्यानंतर युद्ध किंवा मारामाऱ्यांवर आधारित खेळांची जंत्रीच उपलब्ध झाली. मैदानावर खेळून, दमून, मातीत लोळून रागाला मिळणारी वाट बंद झाली होती. ती या माऱ्यामाऱ्यांमधून मिळायला लागली. नकळतपणे पंगा घेणाऱ्याला मारायची खुमखुमी यांतून जिरू लागली. खेळाचे टप्पे पुढे सरकण्याबरोबर आपण कुणीतरी असल्याची, कुणालातरी आपण सहज हरवल्याची िझग डोक्यात जात होती आणि पुन्हा एकदा नव्या खेळाच्या अधीन आम्ही झालो. बदलणारी मानसिकता आमची आम्हालाही ओळखता येत नव्हती, ती गेम्स तयार करणाऱ्या कंपन्यांनी अचूक ओळखली. साधारण दोन हजार सालाच्या आसपास भारतात सायबर कॅफेवर टोळी युद्धाच्या खेळांची चलती सुरू झाली. आपल्या ग्रुपच्या टोळीने या आभासी जगात दुसऱ्या टोळीला मारायचे अशी याची ढोबळ कल्पना. दुसऱ्या टोळीतील खेळाडूंना चकवण्यासाठी काय करायचे याचा चर्चा आणि आराखडे करण्यात तासनतास मेंदू खर्ची व्हायचा. रात्रंदिवस दुसऱ्या टोळीतील खेळाडूला कसे हरवायचे याचेच विचार डोक्यात असायचे. अगदी शाळेतल्या ऑफ पीरिएडला, मधल्या सुट्टीत अमुक या ठिकाणी लपलाय त्याला उडवायला हवं अशा चिठ्ठय़ांची देवाण-घेवाण वर्गातून चालायची. याचाच पुढचा टप्पा होता ‘जीटीए’ म्हणजे ‘ग्रॅन्ड थेफ्ट ऑटो’.. नावातूनच खेळाचे गमक कळावे असा गेम. चोरी किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे म्हणावे असे दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही धडपड करत होतो. यालाच जोडून आम्हाला गुन्हे करणे आणि त्यानंतर ते पचवणे हे शिकवणारे अनेक खेळ आले. पोलिसांना गुंगारा देणे, दुसऱ्या टोळीला नामोहरम करणे, रेस जिंकण्यासाठी वाहतुकीचे नियम तोडणे अशा अनेक गोष्टी करण्यातली ‘मजा’ या खेळांतून मिळत होती. नियम झुगारून देण्याच्या बंडखोरीला या खेळांनी साथ दिली.. परिणाम एकच झाला.. जुने गेम्स मागे पडले आणि पुन्हा एकदा नव्या विश्वाला आम्ही आपलेसे केले. या सगळ्यात वय विसरून खेळांमध्ये रमण्याचा सर्वात मोठा भाग होता तो फेसबुकला जोडलेल्या रिअल टाइम गेम्सचा. फार्मव्हिले, पेट व्हिले, यो व्हिले या खेळांनी काळ-वेळाचे गणितच हरवून टाकले. शेतात लावलेली स्ट्रॉबेरी करपेल म्हणून पहाटे गजर लावून उठण्याची किमया आम्ही करत होतो. दारात आलेल्या कुत्र्याला हाड म्हणून हाकलून देताना आमच्या आभासी घरातली मांजरे भुकेली असतील म्हणून हातातले काम सोडून धाव घेत होतो. यात सर्वात गाजला तो ‘फार्मव्हिली’ हा खेळ. शाळा, महाविद्यालये, सायबर कॅफे, कार्यालये इथल्या किमान पन्नास टक्के संगणकांवर तरी एकिकडे फार्मव्हिली सुरू असलेले दिसायचे. आभासी शेती करायची आणि जास्तीत जास्त नफा कमवायचा या उद्देशाने पछाडलेल्या आम्हाला प्रत्यक्षातही शेती करणे अगदीच सोपे असते असे वाटू लागले होते. शेतातली वांगी, कोबी करपेल म्हणून कौटुंबिक कार्यक्रम, महाविद्यालयातील कार्यक्रम, सहली, कट्टय़ावर जाणे या सगळ्याला आम्ही दांडय़ा मारायला लागलो. ‘आपले शेत’ ही भावना स्वत:च्या घरापेक्षाही प्रबळ होती. शेतीतून नफा कमावून थकलेल्या डोक्याला ‘कॅन्डी क्रश’ चा विरंगुळा सापडला आणि आम्ही बोटे सतत त्याचे टप्पे पार करण्यासाठी मोबाइल स्क्रिनवर नाचू लागली.. नव्या व्यसनाचा शोध सुरूच होता आणि जुना मित्र भेटला.. पोकेमॉन. तिथून नवे पर्व सुरू झाले.. पोकेमॉन गो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 12:54 am

Web Title: mario games children video game
Next Stories
1 श्वास केवळ सामान्यांचा गुदमरतोय..
2 कथेचा खोल तळ..
3 सुवर्ण महोत्सवी युवा जल्लोष!
Just Now!
X