29 September 2020

News Flash

कॅम्पस डायरी : गणित-विज्ञान विषयाची गोडी

तीन दिवसांच्या कार्यशाळेमध्ये पहिल्या दिवशी मुलांना गणित विषय शिकवला.

आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी यासाठी पाल्र्याच्या मुकेश पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी एक आगळीवेगळी कार्यशाळा आयोजित केली होती. गणित आणि विज्ञान हा विषय बहुतांश मुलांना कठीण जात वाटत असतो मात्र हाच विषय प्रयोगाच्या माध्यमातून आणि खेळीमेळीच्या वातावरणात शिकवला तर त्यांना हा विषय चांगल्या प्रकारे समजावला जाऊ शकतो. याच मुद्दय़ाला केंद्रस्थानी ठेवून मुकेश पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या मुलांना वेगवेगळ्या प्रयोगांच्या साहाय्याने गणित व विज्ञान या विषयांचे प्रशिक्षण दिले. या वेळी शाळेप्रमाणे काठी घेऊन किंवा ओरडून शिकविणारे शिक्षक नसल्यामुळे मुलांनी आनंदाने आपल्याला न आवडणारे विषयदेखील आवडीने शिकले. दहा ते बारा वयोगटातील मुले या कार्यशाळेत सहभागी झाली होती. तीन दिवसांच्या कार्यशाळेमध्ये पहिल्या दिवशी मुलांना गणित विषय शिकवला. या वेळी त्यांना आकडेमोड करण्यापासून सोप्या पद्धतीने, रोजच्या दैनंदिन आयुष्यात त्याचा कसा उपयोग केला जाऊ शकतो याचे वेगवेगळे प्रकार या कार्यशाळेत सांगण्यात आले. त्याबरोबरच ओरिगामी वापरून पक्षी बनविणे, मोज्यांच्या साहाय्याने कळसूत्री बाहुल्या बनविणे या खेळात मुलांनी मनसोक्त आपल्या कल्पनेप्रमाणे वस्तू बनविल्या. तर दुसऱ्या दिवशी मुलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी यासाठी चित्रफितीच्या माध्यमातून मुलांना जागृत करण्याचा प्रयत्न केला गेला. तिसऱ्या दिवशी विज्ञानातील साध्या प्रयोगातून पदार्थाचे गुणधर्म शिकविण्यात आले. या वेळी सर्वच मुलांना खूप मजा आली आणि विज्ञान अभ्यासतानादेखील मजा येऊ शकते याची प्रचीती या वेळी त्यांना आली असे या कार्यशाळेचे आयोजक प्रा. मंजूषा जोशी यांनी सांगितले. अशा प्रकारची कार्यशाळा इतर संस्थामध्ये आयोजित करावयाची इच्छा असल्यास त्यांनी े्नेंल्ल्न४२ँं12@ॠें्र’.ूे या पत्त्यावर संपर्क साधावा.

शिवाजी महाराजांच्या नावाने हिंसक आंदोलन

शिवाजी महाराजांच्या नावाने विविध संघटनांकडून केल्या जाणाऱ्या िहसक आंदोलनांना आमच्या पक्षाकडून कधीच पाठिंबा दिला जाणार नसून राजकीय संघर्ष करत असताना शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्याची गरज असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाकडून आयोजित ‘शिवाजी महाराज-मतमतांतरे व वादचर्चा’ या नुकत्याच पार पडलेल्या दोन दिवसीय परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या शिवाजी महाराज आणि समकालीन राजकीय पक्ष या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांच्या आक्रमक राजकारणाच्या शैलीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

आम्ही शिवाजी महाराजांना राजकारणाचा ब्रॅण्ड मानत नसून ते राष्ट्रीय जीवनाचा आधार आहेत. त्यामुळे एखाद्या विशिष्ट चौकटीतून शिवाजी महाराजांविषयी केली जाणारी मांडणीच बरोबर आहे, असे समजण्याची गरज नाही. शिवाजी महाराजांना समजून घ्यायचे असल्यास इतर चौकटीतून न पाहता त्यांना त्यांच्याच चौकटीत अभ्यासण्याची आवश्यकता असल्याचेही ते या वेळी म्हणाले. तुळशीदास भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात शिवसेना पक्षाचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील व रिपाइंचे प्रवीण मोरे हेही सहभागी झाले होते.

माणसाच्या विचारांमध्ये उत्क्रांती होत आल्याने विचार, ज्ञान व मूल्ये यांच्यात सतत बदल होत आला आहे. आजच्या काळात जी मूल्ये हवी आहेत, ती इतिहासात असतीलच असे नाही. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता यांसारखी मूल्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासात शोधण्याचा आग्रह पुरोगाम्यांनी धरू नये, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक डॉ. अभिराम दीक्षित यांनी परिसंवादाच्या पहिल्या दिवशी केले. ‘शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा पुरोगामी अन्वयार्थ’ या विषयावर बोलताना त्यांनी पुरोगामी इतिहासलेखकांकडून लिहिल्या गेलेल्या इतिहासाचे विवेचन केले. पुढे ते म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या संदर्भात औरेंगजेबाचे वर्णन करताना आतापर्यंत त्याची प्रतिमा धर्मवेडा, असहिष्णू येथपासून उदार, राष्ट्रीय, धर्मनिरपेक्ष अशीही रंगवली गेली आहे. त्यामुळे पुरोगामी दृष्टिकोनातून औरंगजेबाच्या प्रतिमेचा झालेला प्रवास कुठून कुठे झाला आहे, हेही पाहण्याची गरज असल्याचे ते या वेळी म्हणाले. परिसंवादाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’चे अध्यक्ष श्री. मा. भावे यांच्या बीजभाषणाने झाली. ऐतिहासिक व्यक्तींचे मूल्यमापन करताना विविध प्रसंगांतील त्याची धडाडी, प्रतिभेचा आविष्कार व त्याने बाळगलेली नीतिमूल्ये या बाबी पाहण्याची गरज असून या कसोटीला शिवाजी महाराज पूर्णपणे उतरतात, असे सांगत भावे यांनी आपला समाज सरंजामी वृत्तीतून पुरेसा बाहेर न पडल्याने शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत लोकशिक्षणापेक्षा लोकानुरंजनाचा सोपा मार्ग स्वीकारला असल्याचे मत या वेळी व्यक्त केले. परिसंवादाच्या पहिल्या दिवशी शिवाजी महाराजांचे शेतीविषयक विचार, त्यांचे दुर्गस्थापत्य व जलव्यवस्थापन, मोडी लिपी, वतनदारी पद्धत, चित्रपट, मालिका व कवितेतून त्यांचे करण्यात आलेले चित्रण आदी विषयांवरील १२ चर्चासत्रांतून डॉ. अरुणा पेंडसे, डॉ. उत्तरा सहस्रबुद्धे, डॉ. सोनाली पेडणेकर, राजेश खिलारी, डॉ. दत्ता पवार आदी अभ्यासकांनी आपले विचार मांडले. यात शेतकरी नेते शरद जोशी तसेच इतिहासकार कॉ. शरद पाटील यांच्या शिवाजी महाराजांविषयीच्या इतिहासाच्या अन्वयार्थाबाबत अनुक्रमे राजीव बसग्रेकर व विलास सोनावणे यांनी विश्लेषण केले.

शिवाजी महाराजांचा समाज माध्यमांमध्ये होत असलेला वापर व त्यातून केल्या जाणाऱ्या आभासी राजकारणापासून ते समाकालीन मराठा जातीचे राजकारण, मराठी भाषेविषयी शिवाजी महाराजांनी घेतलेली भूमिका, त्यांचे राजकीय अर्थशास्र या विषयांवरील चर्चासत्रांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विविध पलू समोर आले. यात दत्ता बाळसराफ, डॉ. प्रकाश परब, नौशाद उस्मान, न. ब. पाटील, डॉ. नीरज हातेकर, प्रतिक काटे आदी अभ्यासकांनी मांडणी केली. या वेळी शिवचित्रे व शिवस्मारक या विषयावर बोलताना चित्रकार सुहास बहुलकर यांनी शिवाजी महाराजांच्या विविध चित्र, शिल्पांची माहिती देत असताना अरबी समुद्रात होणार असलेल्या शिवस्मारकाच्या प्रकल्पाबाबत विरोधी मत व्यक्त केले. शिवस्मारकासाठी समुद्रात कृत्रिम बेट तयार करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून यापेक्षा सराकरने नसíगक बेटांकडे व दुर्ग-किल्ल्यांकडे लक्ष पुरवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. तर शिवाजी महाराजांच्या आरमाराविषयी डॉ. सचिन पेंडसे यांनी विविध प्रकारची माहिती देत शिवकाळापासून ते त्यानंतरच्या मराठा आरमाराविषयीही त्यांनी माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2016 10:07 am

Web Title: maths and science subject interest
टॅग Maths
Next Stories
1 यंदाची धुळवड पाण्याशिवाय
2 कट्टय़ावरून वाचनालयात
3 ..तर शेतकऱ्याची नोंद केवळ नामशेष प्रजाती म्हणून राहील
Just Now!
X