महाविद्यालये सुरू होऊन दोन महिने उलटले तरी मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे पदवी विद्यार्थ्यांचे निकाल लागता लागत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. संगणकाधारित ऑनस्क्रीन मूल्यांकनाबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला अपयश येत आहे. यातच राज्य सरकारने ३१ जुलैपर्यंत दिलेल्या मुदतीची वाट विद्यार्थी पाहात आहेत. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही चिंतेत आहेत. सर्व शाखांच्या १८ लाख उत्तरपत्रिकांचे एकाच वेळी ऑनस्क्रीन मूल्यांकन करण्याचा विद्यापीठाने घेतलेला निर्णय विद्यापीठालाच भोवत असल्याचे दिसत आहे. या साऱ्याचा फटका परराज्यातून मुंबईत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अप्रत्यक्षरीत्या बसणार आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांना वर्गावर शिकविण्याऐवजी मूल्यांकनाच्या कामाला वेळ द्यावा लागत आहे. अशा वेळी विद्यार्थी वर्गात उपस्थित आहेत, मात्र त्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच अनुपस्थित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गणपती आणि दिवाळीच्या सुट्टीत जादा वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी महाविद्यालयांच्या माथी येणार आहे.

द्विधा मनस्थिती

मी आता इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. पहिल्या वर्षांतील दुसऱ्या चाचणीचा निकाल अजूनही न लागल्याने आणि तो कधी लागणार आहे याची फुसटशीही आशा न दिसत असल्याने माझी द्विधा मन:स्थिती निर्माण झाली आहे. सध्या मी दुसऱ्या वर्षांतील तिसऱ्या चाचणीचा अभ्यास करीत आहे. मात्र दुसऱ्या चाचणीत मला एक पेपर कठीण गेल्यामुळे त्यात जर एटीकेटी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्की तिसऱ्या चाचणीच्या अभ्यासाला लागू की निकाल न लागत असल्याने एटीकेटीच्या अभ्यासाची सुरुवात करू अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

पूजा डांगे

नापास झालोय की पास

पदव्युत्तर शिक्षणाच्या पहिल्या चाचणीचा निकाल उशिरा लागून त्याची गुणपत्रिका ही दुसऱ्या चाचणीच्या प्रवेशप्रक्रियेच्या वेळी मिळाली. अशा प्रकारचा विद्यापीठाचा ढिसाळ कारभार आम्हाला दुसऱ्या चाचणीच्या वेळही पाहावयास मिळत आहे. तिसरी चाचणी अभ्यासक्रमाला सुरुवात होऊन दोन महिने उलटले तरीही अजून निकालाचा पत्ता नाही. त्यामुळे निकाल नक्की लागला  नाही की नापास झाला आहेस म्हणून सांगत नाहीस असा सूर माझ्या घरचे लगावत आहेत.

रोहित अडसुळे

विद्यपीठाने उत्तर द्यावीत

पदवीचा निकाल लावण्याच्या गडबडीमध्ये विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तास बुडले जात आहे. या विद्यार्थ्यांच्या एम.ए. भाग एकच्या दुसऱ्या चाचणीच्या निकालाबाबत अजूनही काही बोलले जात नाही आहे. त्याचबरोबर सर्व शिक्षक कायम पेपरतपासणीसाठी असल्यामुळे अभ्यासक्रम अपुरा राहण्याची भीती आमच्यापुढे निर्माण झाली आहे. याचा परिणाम परीक्षांवर होईल का, हा ही एक प्रश्नच आमच्यासमोर आहेच. याही प्रश्नांची उत्तरे विद्यापीठाने द्यावीत.

पूजा धडस

वर्ष वाया जाण्याची भीती

पदवी परीक्षा देऊन आज तीन महिने उलटले असून त्या दरम्यान मी मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष चालू होऊन दोन महिने झाले तरी अजून माझा पदवी परीक्षांचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे पदवी परीक्षेत मला केटी लागली तर मी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र ठरणार नाही. त्यामुळे माझे वर्षही वाया जाईल, शिवाय मला विद्यापीठातील माझी जागासुद्धा गमवावी लागेल.

सुमित कांबळे