12 December 2017

News Flash

सुवर्ण महोत्सवी युवा जल्लोष!

येत्या सोमवारपासून महोत्सवाच्या प्राथमिक फेरीला सुरुवात होणार आहे.

अक्षय मांडवकर | Updated: August 5, 2017 1:09 AM

सर्वच महाविद्यालयांच्या सांस्कृतिक वर्तुळात सध्या मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवाच्या तयारीला जोमाने सुरुवात झाली आहे. येत्या सोमवारपासून महोत्सवाच्या प्राथमिक फेरीला सुरुवात होणार आहे. तालमीही सुरू होणार आहेत. युवा महोत्सवाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे महाविद्यालयाचा महोत्सवावर ठसा उमटविण्यासाठी सर्व जण सज्ज झाले आहेत. यंदा पोद्दार, मिठीबाई, रुपारेल, डहाणूकर या महाविद्यालयांत चुरशीची लढाई होईल, अशी आशा आहे.

पोद्दार महाविद्यालय

मांटुग्याच्या पोद्दार महाविद्यालयामध्ये जूनच्या शेवटी युवा महोत्सवाच्या तालमीला विद्यार्थ्यांनी सुरुवात केली आहे. महाविद्यालयाच्या सभागृहात लोकनृत्य आणि नाटकाच्या तालमींना जोम आला आहे. विद्यार्थी देहभान विसरून तालमीत गुंतले आहेत. नाटकासाठी रंजित पाटील आणि लोकनृत्यासाठी प्रशांत बाफलेकर मार्गदर्शकांची भूमिका बजावत आहेत. युवा महोत्सवाचे यंदाचे ५०वे वर्ष असल्याने मुलांनी चांगली कामगिरी करण्यासाठी महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागे उभे असल्याची माहिती महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समन्वयक वृषाली कणेरी यांनी दिली.

महर्षी दयानंद महाविद्यालय

सांस्कृतिक वर्तुळात मुख्य करून नाटकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या एम. डी. महाविद्यालय यंदाही युवा महोत्सवासाठी सज्ज झाला आहे. नाटक आणि संगीत विभागातील स्पर्धामध्ये उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी विद्यार्थी तालमींना लागले आहेत. हिंदी एकांकिका आणि मुकाभिनय स्पर्धेची तयारी विद्यार्थी स्वत: करत असून मराठी नाटकासाठी ओमकार भोसले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. लोकनृत्य स्पर्धेत महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होत नसले तरी यंदा पहिल्यांदाच पाश्चिमात्य संगीत स्पर्धामध्ये महाविद्यालय सहभागी होत आहे. यासाठी मार्गदर्शकाचा शोध सुरू असून सोमवारपासून त्यासाठीच्या तालमींना सुरुवात होईल अशी माहिती महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक गणेश जोशी यांनी दिली.

साठय़े महाविद्यालय

युवा महोत्सवातील सगळ्याच स्पर्धामध्ये पाल्र्याचे साठे महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होत असल्याची माहिती महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समन्वयक जयश्री गायकवाड यांनी दिली. नाटकासाठी नीलेश गोपनारायण विद्याथ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

नृत्यदिग्दर्शनाची पंचवीस वर्षे

युवा महोत्सवाच्या परिघात लोकनृत्यासाठी परिचयाचे नाव असणारे प्रशांत बाफलेकर यांना युवा महोत्सवासाठी नृत्यदिग्दर्शन करत असताना यंदा २५ वर्षे झाली आहेत. युवा महोत्सवाच्या ५०व्या वर्षांत बाफलेकरांच्या युवा महोत्सवातील प्रशिक्षकाच्या कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मागील पंचवीस वर्षे बाफलेकर विविध महाविद्यालयांमध्ये लोकनृत्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडत आहेत. पारंपरिकतेला धरून लोकनृत्याची मांडणी करत असल्याने विद्यार्थ्यांच्या ते अधिक आवडीचे मार्गदर्शक आहेत. यंदा बाफलेकर बारा महाविद्यालयांमध्ये युवा महोत्सवासाठी लोकनृत्याचे प्रशिक्षण देत आहेत. लोकनृत्याची मांडणी करत असताना महाविद्यालयाला त्यासाठी येणारा खर्च लक्षात घेऊनच नृत्य बसवत असल्याची माहिती बाफलेकर यांनी दिली.

एकाच गुरूंचे तीन विद्यार्थी आमनेसामने

‘मेनका’ या शास्त्रीय नृत्यासाठी देण्यात येणाऱ्या मानाच्या पुरस्कारासाठी एकाच गुरूचे तीन विद्यार्थी युवा महोत्सवात आमनेसामने आले आहेत. प्रसिद्ध कथ्थक गुरू मयूर वैद्य यांचे आदित्य गरुड, निशा चव्हाण आणि सई कानडे हे विद्यार्थी युवा महोत्सवाच्या रिंगणात समोरासमोर येऊन ठाकले आहेत. निशा ही रुपारेल महाविद्यालयातून, सई ही रचना संसद महाविद्यालयातून तर आदित्य हा सोमय्या महाविद्यालयातून शास्त्रीय नृत्य विभागात सहभागी झाले आहेत. यामध्ये निशा आणि सई या दोघी प्राथमिक फेरीतच एकमेकींच्या स्पर्धक म्हणून लढत देणार आहेत. सध्या या तिघांचीही जोरदार तयारी गुरू मयूर वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

प्राथमिक फेऱ्यांचे वेळापत्रक

सादरीकरण स्पर्धा

  • मुंबई – १६ ते २० ऑगस्ट
  • ठाणे – २१ ते २२ ऑगस्ट

साहित्य आणि फाइन आर्ट

  • मुंबई – १४ ऑगस्ट
  • ठाणे – १४ ऑगस्ट आणि २२ ऑगस्ट

डॉ. भानूबेन नानावटी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद

श्री. विलेपार्ले केलवाणी मंडळ यांच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने ‘न्यूरोडेजनरेटिव डिसिस’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेत विविध तज्ज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले. या परिषदेत आण्विक न्यूरोबायोलॉजी, न्यूरॉनल क्रोसस्टॉक, रोगनिवारण पद्धती यांबाबत एकत्रितरीत्या सुसंवाद साधण्यात आला. यासाठी आयआयटी मुंबई आणि दिल्ली, टीआयएफआर, आयआयएसईआर-पुणे, एनआयआय-दिल्ली आणि आयटीसी या देशातील नामांकित संस्थांच्या तज्ज्ञांनी परिषदेत मार्गदर्शन केले. या परिषदेमुळे पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी.च्या विद्यार्थ्यांना त्यांचे शोधनिबंध मांडण्याची संधी मिळाली.

 

बुद्धिबळ स्पर्धेत ३३ महाविद्यालयांचा सहभाग

वडाळा येथील एसआयडब्लूएस महाविद्यालयाने २६ जुलै रोजी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मुंबईतील ३३ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. स्पर्धेअंती प्रथमस्थानी रुपारेल महाविद्यालय, द्वितीयस्थानी विद्यालंकार तांत्रिक महाविद्यालय, तृतीयस्थानी पोद्दार महाविद्यालय तर उत्तेजनार्थ पारितोषिक एच. आर. महाविद्यालयाने पटकावले. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उषा सुकुमार अय्यर, मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. उत्तम केंद्रे, खालसा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक श्री. ओमकार सिंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. प्रकाश भामरे यांनी केले होते.

महारोजगार मेळावा 

मराठा मंदिरचे बाबासाहेब गावडे ‘इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटेक्निक आणि मॅनेजमेंट स्टडीज’ या संस्थेत नुकताच महारोजगार मेळावा झाला. ‘फ्रेशर्स जॉब फेयर इन’ यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात अनुभवी आणि अननुभवी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्राथमिक फेरीत ४० टक्के विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात अनेक विद्यार्थ्यांना नवीन नोकरीची संधीही देण्यात आली. मेळाव्यात इन्फोसिस, रिलायन्स, बजाज अलायन्स, युरेका फोर्ब्स, जिंदाल इलेक्ट्रिकल, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अपोलो हेल्थ, अ‍ॅक्सिस, जेटकिंग, कोटक महिंद्रा, एनआयआयटी, सीड, इंटरनेट ग्लोबल सव्‍‌र्हिसेस, कॅटलिस्ट टॅलेन्ट मॅनेजमेंट, सिनर्जी ग्लोबल, टाटा सस्टेनेबिलिटी ग्रुप, लेन्सकार्ट या कंपन्यांनी सहभाग घेतला होता.

मेळाव्यात सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, आयटी प्रशिक्षणार्थी, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर, फायनान्स, अकाऊंट्स, ऑपरेशन, एचआर, फॅसिलिटी, सेल्स, मार्केटिंग, कस्टमर सपोर्ट, इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस, नॉन व्हॉइस प्रोसेस, टेक्निकल सपोर्ट , बीपीओ, बॅक ऑफिस, डिजिटल मार्केटिंग रिटेल सेल्स आदी क्षेत्रांत नोकरीची संधी विद्यार्थ्यांना मिळाली.

या वेळी मराठा मंदिर संस्थेचे सचिव विनायक घाग, संचालिका डॉ. विद्या हट्टंगडी, प्रा. डॉ. दिलीप जयस्वाल, प्रियदर्शन पाटील यांनी आयोजनाची जबाबदारी पार पाडली.

रुईया विद्यार्थ्यांचे हरित स्वप्न

रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात वृक्षरोपांची लागवड केली. २९ जुलै रोजी पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यात उटावली गावात विद्यार्थ्यांनी २०० वृक्षरोपांची लागवड केली. यात त्यांना गाव सरपंच आणि ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. वृक्षलागवड मोहीम यशस्वी करण्यात ‘एनएसएस’च्या ६० विद्यार्थ्यांना प्रा. पोतदार यांनी मार्गदर्शन केले.

First Published on August 5, 2017 1:09 am

Web Title: mumbai university yuva festival college festival