आतापर्यंत गणवेश आणि पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जाणारी दहावीची यशस्वी मुले लवकरच कॉलेज विश्वात पदार्पण करणार आहेत. मनात बरीच भीती आणि आतुरता आहे. नवं आभाळ खुणावत आहे. आतापर्यंत शाळेच्या पंखामध्ये सांभाळलेली मुले नव्या अवकाशात झेप घेणार आहेत. कॅम्पसही नव्या मुलांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे बारावीच्या वर्गात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनीही आपले करिअरचे ध्येय लक्षात घेऊन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आहे. अशा वातावरणात कॉलेज, विद्यार्थी आणि कॅम्पस नव्या वर्षांच्या नव्या ध्येयांसह सज्ज झाले आहेत. त्यातच पावसाच्या आगमनाने प्रफुल्लित झालेल्या मनांना वेध आहे कॉलेजचा. त्यासोबतच मैत्रीचे धडे आणि अभ्यासापलीकडचे शिक्षण देणाऱ्या ‘कॅम्पसकट्टा’चा.

फॉर्म, कटऑफ, लिस्ट, इनहाऊस कोटा याच शब्दांचे वारे सध्या कॅम्पसमध्ये वाहत आहेत. दहावीचे निकाल लागून आता बरेच दिवस उलटले आहेत. तेव्हा महाविद्यालयीन पायरीवर ‘यो..’ असा सूर लावत काही तरी धम्माल वातावरणात आपण जात असल्याची भावना उत्तीर्ण झालेल्या मंडळींच्या मनात असणार. तर बारावीचा टप्पा ओलांडलेले अनेक जण ‘आता आम्ही डिग्री कॉलेजला जाणार..’ थोडक्यात सीनिअरिटीची पुसटशी भावना यांच्याही मनात असणार. धाकधूक करत बारावीचे निकाल तर लागले. ‘अमुक एका शाखेचा निकाल यंदा कमी लागला, अरे यांना तर मार्क वाटलेत.. तो.. पास होईल असं वाटतही नव्हतं..’ निकालानंतर ही ठरलेली वाक्य अनेकांच्या तोंडी रेंगाळतंच होती. पण ‘पुढे काय करणार..?’ या एका प्रश्नाने मात्र व्हॉट्सअ‍ॅपवरच्या तोंडाला चन लावलेल्या इमोजीप्रमाणे बऱ्याच जणांची तोंडं बंद. या वातावरणात घरातले, मित्रपरिवारातले अनुभवी व्यक्ती  ‘सल्लागार’ ही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ‘कोणता कोर्स घेऊ..?’ इथपासून ‘कोणत्या कॉलेजचा फॉर्म भरू..?’ इथपर्यंतचा अविरत तगादाच या घरगुती काऊन्सेलर्सकडे लावला जातोय. इन्टरनेटसुद्धा बऱ्याच विद्यार्थी मित्रांसाठी एखाद्या काऊन्सेलरपेक्षा कमी नाही. ठरावीक एका डिग्री कोर्ससाठी जायचं असा काही जणांचा निर्णय ठाम झाला आहे, त्यामुळे फॉर्म भरून ही काही कॅटेगरीतली लोकसंख्या ठरलेल्या वाटेवर गेलीसुद्धा. या व्यतिरिक्त  ‘सायन्स.. पुरे बाबा.. आता मार्ग बदलावा असं वाटतंय,’  ‘मी तर मीडिया क्षेत्रात जायचं म्हणतेय.. पण अजूनही एक दोन कॉलेजचे फॉर्म भरून ठेवते,’ असं म्हणत आईबाबांसोबत, मित्रमत्रिणींसोबत आलेल्या गर्दीने कॅम्पसमध्ये गजबजाट आहे. थोडक्यात ‘सालाबादप्रमाणे याहीवर्षी’च्या गर्दीसाठी कॅम्पस सज्ज आहेत.

तर इथे आमचे सराईत कट्टेकरी ‘नया है वह’ कॅरेक्टर शोधण्याच्या तयारीतच आहेत. महाविद्यालयात आल्यावर ‘फॉर्म कुठे मिळणार?’ हा प्रश्न विचारला की, ‘नवीन वाटतं..’ ही कमेंट पाठ फिरताच मिळते. अनेक जण या नव्या वातावरणात चटकन मिसळतात, तर अनेक जण काहीशा संकुचित मनाने अनेक महाविद्यालयांना भेटी देतात. त्यातूनच ‘फॉर्मलाच जास्त पसे गेले यार..’ अशी खंतही व्यक्त  होत असते. सर्टििफकेट्स, जातीचे दाखले, पालकांच्या पेमेंट स्लिप अशा किती तरी झेरॉक्सची बॅग पाठीवर मारत काही विसरलो तर नाही.. असा स्वत:लाच प्रश्न करत महाविद्यालयांच्या दिशेने ही सराट पावलं वळत आहेत.

फॉर्म भरल्यावर पुन्हा टेन्शन लिस्टमध्ये नाव लागेल की नाही याचं. कट ऑफ किती असेल, इनहाऊस कोटा आहे का? पहिल्या नाही तर निदान तिसऱ्या लिस्टला तरी नाव लागलं पाहिजे असे अविरत विचार ‘प्रवेशांती परमेश्वर’ असं काहीसं वाटणाऱ्या दोस्तांच्या मनात घर करून असतात. अनेक जण तर कॉलेजचे फेस्टिव्हल, आयव्हि ‘डे’ज (इन्डस्ट्रिअल व्हिजिट), कल्चरल आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंट हे निकष ठेवत डिग्री कॉलेजच्या दिशेने निवडक पावलं ठेवतात. कॅम्पसमधल्या या कमाल आणि धम्माल ‘नवलाई’च्या वातावरणाची मजा ज्युनिअर्स- सीनिअर्सपासून अगदी शिपाई आणि प्राध्यापकांपर्यंत सगळेत घेत आहेत. तेव्हा कॅम्पसकरांनो तयार व्हा.. कारण नवे चेहरे ‘किमग सून’..

बरं.. महाविद्यालयांच्या बाबतीतही ‘विश लिस्ट’ आलीच. कॅम्पस असंच हवं, क्राऊड चांगला हवा, आयव्ही कुठे कुठे जाते? फॅकल्टी चांगली आहे ना? ही अपेक्षित सूची डिग्री कॉलेजला जाताना अनेकांच्या मनाला पुसटशी का असेना, पण स्पर्शून जाते. ही झाली विद्यार्थ्यांची बाजू. प्रवेश प्रक्रियेच्या या सबंध गोतावळ्यात शिपाई, क्लार्क, शिक्षक फॉर्म तपासून त्यावर महाविद्यालयाचे स्टॅम्प देऊन काहीसा कंटाळवाणा बाजही ओढवतात, त्यातही प्रवेशासाठी कोणी ‘नग’ असेल तर मग या मंडळीचा कधी कधी पाराही चढतो.