समर इंटर्नशिप हा व्यवस्थापन शिक्षणातील अविभाज्य घटक आहे. एमबीए किंवा तत्सम पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष संपल्यानंतर येणाऱ्या उन्हाळी सुटय़ांमध्ये ही इंटर्नशिप करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नोकरीचा अनुभव मिळावा, एखाद्या प्रकल्पावर काम करण्याचा अनुभव मिळावा, हे या योजनेमागील उद्दिष्ट. व्यवस्थापन अभ्यासक्रम करणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसतो. व्यवस्थापकीय दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या कामाचा अनुभव घेण्याची संधी कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करताना मिळत असते.
विद्यार्थ्यांना त्यांच्या नियोजित अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षी विपणन, अर्थ, मनुष्यबळ विकास, उत्पादन व सेवा, माहिती तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय व्यापार, संशोधन पद्धती या विषयांची तोंडओळख झालेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयांत इंटर्नशिप करता येते. या प्रशिक्षणाच्या काळात कामाव्यतिरिक्तही अनेक गोष्टी शिकता येतात.
आपल्यातील क्षमतांची, कमतरतांची जाणीव या कालावधीत होऊ शकते. कामाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नकारात्मक असतो, तो चांगल्या कंपनीत काम करण्याची संधी मिळाली तर सकारात्मक होतो. मार्गदर्शक विद्यार्थ्यांना सर्वेक्षण किंवा अशा स्वरूपाचे काम देत असतात. कंपनीचे अधिकारीही विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून काम करत असतात. कंपनीत नेमके कसे काम चालते याची माहिती या कालावधीत होतेच, मात्र त्याचवेळी प्रामाणिकपणे काम करण्याची सवयही होते. कंपनीत कसे वागावे याचेही ज्ञान अनुभवातून मिळत असते. सर्वेक्षणाचे अहवाल कसे तयार करावेत, प्रश्नावली कशी तयार करावी, त्याचे विश्लेषण कसे करावे याची माहिती प्रकल्पाच्या माध्यमातून मिळत असते. प्रत्यक्ष सर्वेक्षण करताना लोकांचा अनुभव घेता येतो. या सगळ्या गोष्टीतून सर्वागीण विकास होत असतो. समर इंटर्नशिपनंतर अनेक अबोल विद्यार्थी बोलके आणि कामसू होतात, असा अनुभव दरवर्षी शिक्षक घेत असतात. इंटर्नशिपमध्ये दोन गोष्टी असतात. दैनंदिन कामाची माहिती घेणे आणि प्रकल्प करणे, प्रकल्पाचा विषय निवडताना तो वेगळा असावा यासाठी आवर्जून प्रयत्न करावा. दोन वर्षांपूर्वी एका विद्यार्थ्यांने इंजिनीअरिंग स्टोअर्समध्ये येणाऱ्या मटेरिअलची विभागणी कशी करावी यासाठी संकेतांक कसे करावेत या विषयावर प्रकल्प केला. तो प्रयोग यशस्वी झाला आणि कंपनीच्या अडचणीवर तोडगा मिळाला. व्यवस्थापन अभ्यासक्रम हे ‘स्पेशलायझेशन’चे क्षेत्र आहे. इंटर्नशिपच्या काळात मिळणारा अनुभव, आवड या आधारे आपला स्पेशलायझेशनचा विषय निवडण्यासाठीही मदत होते. आपला विषय ठरला असेल, तर त्या विषयाशी संबंधित कंपनीतच इंटर्नशिप केल्यास त्याचा फायदा होतो. उदाहरणार्थ, एखाद्याला फायनान्स विषयात स्पेशलायझेशन करायचे आहे, तर त्या विद्यार्थ्यांने शेअर ट्रेडिंग कंपन्या, बॅंका, विमा कंपन्या अशा ठिकाणी इंटर्नशिपसाठी प्रयत्न करावेत. या काळात आपण शिकलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करणे आणि त्याचवेळी नवे काही शिकणे अशी दुहेरी प्रक्रिया असते. त्यामुळे इंटर्नशिप प्रामाणिकपणे करण्याची आवश्यकता आहे.
इंटर्नशिप कशी मिळवायची हा एक विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न असतो. त्यासाठी शिक्षण घेत असलेली संस्था मदत करते. संस्थेच्या माध्यमातून विविध कंपन्यांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असतात. त्याचवेळी बहुतेक कंपन्यांच्या संकेतस्थळावर ‘करिअर्स’ या विभागामध्ये इंटर्नशिपबाबत माहिती दिलेली असते. संधी कशी आहे, कामाचे स्वरूप, अर्ज कसा करायचा अशी माहिती येथे मिळू शकते. काही कंपन्यांमध्ये उन्हाळी आणि हिवाळी अशा दोन टप्प्यांत दोन दोन महिन्याची इंटर्नशिप असते, तर काही सलग पाच महिनेही इंटर्नशिप ठेवतात. आपला प्राधान्यक्रम, विषय लक्षात घेऊन कंपनीची निवड करावी.
ज्या संस्थेत काम करायची संधी मिळेल ती प्रत्येक संस्था आपापल्या पद्धतीने ज्ञान देण्याचा, विद्यार्थ्यांना तयार करण्याचा प्रयत्न करतच असते. दोन महिन्यांच्या कालावधीत कंपनीचे अधिकारी विद्यार्थ्यांच्या क्षमता जोखत असतात. कंपन्यांनाही चांगले मनुष्यबळ हवे असते. जे विद्यार्थी कंपनीच्या दृष्टीने चांगले काम करतात, त्यांना अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर या कंपनीत कायमस्वरूपी नोकरीची संधीही मिळू शकते.
– डॉ. अभिजित शिवणे, सहायक प्राध्यापक, आयएमडी