महाविद्यालयीन वर्तुळात महोत्सवांचा बहर संपत आला असतानाच विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक सहलीचे, अर्थात ‘आयव्ही’चे (इंडस्ट्रियल व्हिजिट) चे वारे वाहू लागले आहे. सहलींसाठी पैशांची जुळवाजुळव, कपडय़ांची खरेदी, सामानाची बांधाबांध करण्यात विद्यार्थी सध्या गर्क आहेत. सहल म्हणजे व्यावसायिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्न अशा संस्थांना भेट देऊन त्याचा अभ्यास करणे, हा उद्देश सहलींमागे असतो; मात्र महाविद्यालयीन शैक्षणिक सहलींनी थोडेसे मौजमजेचे रूप धारण केले आहे. या माध्यमातून पर्यटनस्थळी जाणे आणि फक्त धम्माल, मस्ती करणे असेच स्वरूप अलीकडे पाहायला मिळत आहे.

महोत्सवाप्रमाणेच विभागांतर्गत वेगवेगळ्या सहलींचे आयोजन केले जाते. यात ‘बीएमएम’, ‘बीएमएस’, ‘अभियांत्रिकी विभाग’ असे व्यावसायिक अभ्यासक्रमावर आधारित सहलींचे आयोजन असते. पाच ते सहा दिवसांच्या कालावधीत विद्यार्थी मजेत घालवतात, हे सध्या कमीअधिक प्रमाणात पाहायला मिळते.

प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी यामधून नवे मित्र आणि मैत्रिणी बनवता येतात. वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत ओळख यातून वाढविण्याची संधी असते. तसे पाहिल्यास ‘आयवी’मध्ये सहलींचे स्वरूप २० टक्के शैक्षणिक, तर उर्वरित ८० टक्के मौजमजा असते, असे आजवरच्या काही जणांच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. हैदराबाद, जयपूर, केरळ आणि बंगळुरू येथे या सहली जातात. यात काही महाविद्यालयांनी बदल करून गुजरातमधील गीर, मनाली, कन्याकुमारी अशा ठिकाणीही सहली आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. यात वनवास्तव्य, ट्रेकिंग आणि विद्यार्थ्यांमधील साहसी वृत्तीला प्रोत्साहन मिळवून देणारे कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असते.

यातील पहिली पायरी असते ती सहलीच्या शुल्काची. सहलीदरम्यानचा एकूण खर्च पालकांकडून कसा जमा करायचा, त्यांना ते कसे पटवून द्यायचे, यासाठी अर्थातच विद्यार्थ्यांना आई किंवा बाबांची मनधरणी करावी लागते. सहलकाळात आठ ते नऊ  हजार रुपयांची रक्कम मोजावी लागते. त्यासाठी विद्यार्थी निधी संकलनाच्या कामाला लागलेले असतात; परंतु याला काही जण अपवाद ठरतात. सहलीच्या खर्चाचे पैसे जमविण्यासाठी काही विद्यार्थी दोन महिने आधीच छोटीमोठी कामे करतात. काही विद्यार्थ्यांच्या गटातील एखाद्याला पैशांची अडचण आल्यास सर्व जण मिळून स्वत:च्या खिशातून रक्कम भरतात.

दुसरा टप्पा विद्यार्थ्यांच्या सहलींसाठी लागणाऱ्या विशेष कपडय़ांच्या खरेदीचा असतो. शैक्षणिक सहलीच्या मधल्या दिवसांत मुलं वेगवेगळ्या वेशांसाठी असलेले ‘डे’ साजरे करतात. उदाहरणार्थ ‘डेनिम डे’, ‘ट्रेडिशनल डे’, ‘टीशर्ट डे’, ‘फॉर्मल डे’ असे दिवस साजरे केले जातात.

‘आयव्ही’ काळात कंपनीभेटीसाठी फॉर्मल, तर देवस्थानस्थळी पारंपरिक वेश परिधान करतात. याचा निर्णय बहुतेक वेळा शिक्षक घेतात. विद्यार्थिनी सहलीच्या शेवटच्या दिवशी ‘डीजे नाइट’ला ‘वन-पीस’ची खरेदी आवर्जून करतात. त्यावर मॅच करणाऱ्या चप्पल, सोबत दागिने असा जामानिमा असतो.

दोन दिवसांचा रेल्वे प्रवास. यात गाणी, वाद्यवादन, फोटो आणि खवय्येगिरीत विद्यार्थी दंगलेले असतात. शिक्षकांचा उत्साहही या वेळी दुणावलेला असतो. सहलीचे ठिकाण, कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा, खर्चावरील नियंत्रण अशा बाबींवर शिक्षकांना काम करावे लागते. यात कंपनी व्यवस्थापनाकडून सवलत मागवून घेतली जाते. कंपन्या तशी सवलत देतातही. पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सोय, प्रवासासाठी सुसज्ज अशा वाहनांची व्यवस्था, रेल्वे प्रवासातील सवलत अशा पद्धतीच्या सुविधा कंपन्या देत असतात.

सहलनामा

रुईया महाविद्यालय

अर्थशास्त्र विभाग – जैसलमेर

गणितशास्त्र विभाग – गोवा</p>

सांख्यिकी विभाग-  कच्छचे रण (गुजरात)

बीएमएम विभाग – उत्तराखंड

साठय़े महाविद्यालय

बीएमएम विभाग – चेन्नई आणि कन्याकुमारी
व्यवस्थापन विभाग – हैदराबाद

एम डी महाविद्यालय 

बीएमएम विभाग – राजस्थान

गेल्या वर्षी आम्ही गुजरातेतील ‘गीर’च्या जंगलात गेलो होतो. तिथे तंबू बांधून राहण्याचा अनुभव थरारक होता. रात्री विविध प्राणी आणि पक्ष्यांचे आवाज आणि मनात सिंहांची भीती अशा वातावरणात सहल पार पडली. यंदाही तो अनुभव घेणार असल्याने सामानाची बांधाबांध सुरू आहे.

– प्राची सोनवणे, मुंबई विद्यापीठ

यंदा प्रथमच शैक्षणिक सहली कन्याकुमारीला जात आहेत. तिकडच्या वातावरणानुरूप कपडय़ांची खरेदी केली आहे. तिथली सांस्कृतिक वेशभूषा खरेदी करण्याचा माझा मानस आहे. महाविद्यालयातील वरच्या वर्गातील मुलांशीही ओळख निर्माण होईल.

– स्नेहल कटर्नवारे, साठय़े महाविद्यालय

जानेवारीची मी आतुरतेने वाट पाहत आहे. भटकंतीची आवड असल्याने नवीन ठिकाणी जाण्यासाठी मी उत्सुक असते. त्यामुळे शैक्षणिक सहलीला गेल्यावर बऱ्याचदा मी तेथील नवीन गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करते. तिथल्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करते, तर काही गोष्टींची वहीत नोंद करते.

– हिरल महाडिक, विद्यालंकार महाविद्यालय

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असल्या कारणाने आमच्या तांत्रिक महाविद्यालयाच्या शैक्षणिक सहलींमधून वेगवेगळ्या शहरांतील तांत्रिक संस्थांची माहिती मिळत असते, पण यंदा आमच्या महाविद्यालयाने शैक्षणिक सहल न नेण्याचा निर्णय घेतला आहे.

– ओमकार मगदूम, शासकीय तांत्रिक महाविद्यालय