सध्या जगभरात ऑलिम्पिक स्पध्रेची धूम असून या वर्षी भारताच्या पारडय़ात किती पदके पडणार याची सर्वानाच आस लागली आहे. मात्र स्पध्रेच्या पहिल्या काही दिवसांत अपेक्षेप्रमाणे यश संपादन करता आलं नसलं तरी ‘आस अभी बाकी है मेरे दोस्त’ म्हणत ऑलिम्पिक ध्येय ठेवून सराव कराणारे आमचे कॉलेजवीर क्षणाक्षणाला ऑलिम्पिकच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. ऑलिम्पिकमधील खेळाडूंना जेवढे ग्लॅमर मिळते त्याहून अधिक टीका सहन करावी लागते. इतर वेळी चांगले खेळणाऱ्या खेळाडूंना नेमके मुख्य स्पध्रेत यश हेलकावणी देते. तर शोभा डेसारख्या विचारवंतांचे माहितीअभावी दिलेले विधानही ऐकून घ्यावे लागते. मात्र या यशापयशाची दोर ही महाविद्यालय किंवा तरुणपणात मिळणाऱ्या प्रशिक्षणाशी जोडलेली असते. याबाबतचा सारासार विचार केला तर सध्या ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची नेमकी कारणे लक्षात येऊ शकतात. शाळा-महाविद्यालयांमध्ये खेळांसाठीची मदाने, खेळाचे प्रशिक्षण असलेले प्रशिक्षक, उपकरणे, प्रशस्त जिमखाना मिळविताना विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. तर ‘काय सतत खेळत राहते, कधी अभ्यासपण करत जा’ असे टोमणे मारणारे नातेवाईक आणि शेजारी यांच्या कुत्सित नजराही सहन कराव्या लागतात. महाविद्यालयांच्या तुलनेत तर शाळांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. मोठय़ा शाळा सोडल्या तर शाळेमध्ये मुलांना खेळासाठी मैदान उपलब्ध नसते. हीच परिस्थिती महाविद्यालयांची. ‘खेळत जा’ असे सांगणारे शिक्षक मिळणे अशक्य. त्यामुळे या महाविद्यालयात खेळाची गुणवत्ता असणारे विद्यार्थी संधीअभावी मागे राहतात. तर इतर महाविद्यालयांतील जिमखाना कॉलेजचे तास संपताच बंद होतात. भारताला यश हवे असेल तर त्यासाठी शाळा महाविद्यालयांपासून प्रयत्न सुरू करणे गरजेचे आहे. फक्त ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्यानंतर ओरड करण्यात काय अर्थ आहे? आजही विद्यार्थ्यांच्या मनात खेळात करिअर होऊ शकते याबद्दल विश्वास नाही. त्यामुळे नवीन खेळाडू तयार होत नाहीत. अनेकदा घरातील खेळाचा वारसा चालविणारे या क्षेत्रात उतरताना दिसतात. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये घवघवीत यश मिळवायचे असेल तर महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. आज महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याच्या ध्येयाने मन लावून सराव करीत आहेत. महाविद्यालयात शक्य नसेल तर खाजगी क्रीडा संकुल तर कधी घरी प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने सराव करीत आहेत. तर अनेक क्रीडाप्रेमी या क्षेत्रात पत्रकारिता किंवा विश्लेषक म्हणून तयार होत आहेत. या ऑलिम्पिकमध्ये भारताला किती पदके मिळतील ते सांगता येणार नाही, पण विद्यार्थ्यांचे सरावाचे स्वतंत्र ऑलिम्पिक मात्र ताकदीने सुरू आहे.

खो-खोमुळे इच्छाशक्ती वाढली

महाविद्यालयात आल्यावर खो-खोकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन नव्हता. तर खो-खो खेळण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी होती. त्यामुळे मुले शोधण्यापासून त्यांना खेळ शिकविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यामुळे मित्रांना जमा करून आम्ही टीम बनवीत होतो. मात्र या वर्षी हे वातावरण बदलले असून या वर्षी २३ मुलांनी खेळासाठी नोंदणी केली आहे. महाविद्यालयातूनही आता चांगली मदत मिळत आहे. कबड्डीप्रमाणे खो-खोत ही प्रो खो-खोसारख्या स्पर्धा सुरू झाल्या तर या खेळालाही सुगीचे दिवस येतील असा विश्वास आहे. खेळामुळे शरीराला बळकटी मिळतेच, मात्र मानसिकदृष्टय़ाही सकारात्मक बदल घडतात. मी लहानपणी मानसिकदृष्टय़ा सशक्त नव्हतो. मात्र या खेळातून मला स्वत:चा विकास साधता आला. माझा आत्मविश्वास दुणावला.

आदित्य मडव