शोधक वृत्ती आपले भविष्य उज्ज्वल करण्यास मदत करत असते असे म्हटले जात असले तरी त्याचा योग्य ठिकाणी वापर करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच शोधकवृत्तीतून पोकेमॉन गोला शोधणारी आजची तरुणाई मात्र चुकीचा पायंडा पाडत आहे. काही दिवसांनी गो पोकेमॉन गो हा खेळ नो पोकेमॉन गो म्हणण्या इतपत घातक ठरु शकतो. हा पोकेमॉन गो घरातील वडिलधाऱ्यांबरोबर संसदेतही मंत्र्यांची डोकेदुखी ठरला आहे. भौतिक जगाच्या बाहेर आभासी दुनियेत नेणारा हा खेळ खेळताना तरुणांनी स्वत:वर काही बंधने लावून घ्यावीत. यामुळे पोकेमॉन गो खेळा मात्र जरा जपून असे तरुणाईचे मत झाले आहे.

पोकेमॉन गो खेळासाठी नियमावली आखण्याची गरज

ज्याप्रमाणे महाविदयालयांमध्ये रॅिगग करु नकाचे पोस्टर्स लावले जातात त्याचप्रमाणे काही दिवसांनी महाविद्यालयांमध्ये नो पोकेमॉन गोचे पोस्टर दिसू शकतील. कारण या खेळामुळे होणारे परिणाम अतिशय घातक आहेत. सध्या तर पोकेमॉन गो शोधायचा म्हणून मुले तास बंक करुन रस्त्यावर पोकेमॉन गो शोधत फिरत आहेत. त्यामुळे संपूर्ण पिढीला या खेळाने विळखा घालण्यापूर्वी काही नियमावली आखून देणे गरजेचे आहे. कारण खेळावर बंदी आणून हा प्रश्न सुटणार नाही. या खेळात वेळेचे बंधन नाही त्यामुळे दिवसाला काही तास असे काही बंधन आणले तर काही प्रमाणात र्निबध आणले जाऊ शकतात. य़ुवा वर्ग हा नेहमी नव्या आणि साहसी खेळांकडे आकर्षकि होत आला आहे. त्यामुळे नवीन प्रलोभने आली तर तो गोष्टीकडे आकर्षति होईल हे नक्की. मात्र पोकेमॉन गोचा अतिरेक होऊ नये यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.

– वृषाली गांवकर, डहाणूकर महाविद्यालय

स्वत:वर बंधने आणावीत

आजची तरुणाई पोकेमॉन गो या खेळाला बळी पडली आहे. ऐरवी घरात बसून मोबाईलमध्ये डोके घालून बसलेली मुले घराबाहेर पडली आहे. मात्र ही बाब कौतुकास्पद आहे असे मला वाटत नाही. कारण हा खेळ खेळताना अनेक मुले जखमी झाल्याचा बातम्याही आपण ऐकल्या असतील. या खेळामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होणार असतील तर आपण स्वत:वर काही बंधने लावून घ्यावीत जेणे करुन खेळाचा आनंद घेण्याबरोबर काही चुकीचा पायंडा पडणार नाही. परदेशात याचे वाईट पडसाद उमटले आहेत याची जाणीव ठेवून मुंबई पोलिसांनी पोकेमॉन गो खेळाचा धोका लक्षात घेता काही बंधने लावणार आहेत.

– मुकुंद पाबळे, रुईया महाविद्यालय

तांत्रिक मर्यादाही लक्षात घ्यावयास हव्या

मुळातच पोकेमॉन गो हा गेम खेळण्यासाठी आपल्याला मोबाईलचा जीपीएस आणि डाटा पॅक चालू ठेवावा लागत असल्याकारणाने आपण आपले पैसे वाया घालवतो.तसेच हा गेम खेळण्यासाठी आपण आपली गॅलरी, कॅमेरा आणि फोन क्रमांकाची यादी त्यांना उपलब्ध करुन देत असल्याने या गोष्टींचा गैरवापरही होऊ शकतो.जीपीएस चालू ठेवणे बंधनकारक असल्याने आपण कोणत्या ठिकाणी आहोत याची माहिती लोकांना मिळू शकते. ज्यावेळी गेम खेळताना पोकेमॉन गो दिसतो त्यावेळी मोबाईल वायब्रेड होतो त्यामुळे सततच्या अशा होण्यामुळे आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

– तेजश्री शिंदे, रचना संसद