रेल्वेमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक

काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या गोंधळामुळे सर्वसामान्य नागरिकांचा राग अनावर झाला आहे. एसी लोकलचे स्वप्न दाखविणाऱ्या रेल्वेने आधी लोकलच्या वेळा पाळाव्यात. नेहमीच ओव्हरहेड व्हायर्स, एक्स्प्रेस गाडय़ांची कारणे देऊन एक तासाच्या प्रवासाला दीड ते दोन तास लागतात. त्यातही मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना रोजच्या प्रवासासाठी पर्यायी साधन नसल्यामुळेप्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वेमंत्री सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

मुंबईकरांचे रोजचे जीवन सुरळीत सुरू ठेवण्यासाठी रेल्वेचा मोठा वाटा आहे. मात्र एसी लोकलचे स्वप्न दाखविणारे सुरेश प्रभू सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या लोकलच्या वेळा पाळण्यासाठी काहीच प्रयत्न करीत नाहीत. मुंबई उपनगरात राहणाऱ्यांसाठी रेल्वेशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने रेल्वेच्या गोंधळामुळे त्यांची दाणादाण उडते. महाविद्यालयामध्ये सकाळी साडेसातला पोहोचावयाचे असले तरी लोकल धिम्या गतीने चालतात या भीतीने वेळेआधीच निघावे लागते. अनेकदा रेल्वेच्या गोंधळामुळे आमचे महाविद्यालायचे तास बुडतात. एक तर शासनाने त्याच शुल्कात पर्यायी सेवा उपलब्ध करून द्यावी अथवा लोकलच्या वेळा नियमित कराव्यात. बस तिकिटांच्या किमती जास्त असल्यामुळे रोजच्या रोज लांबचा प्रवास करणे शक्य होत नाही. त्यामुळे रेल्वेने जबाबदारीने वागून एसी लोकल आणण्यापेक्षा आहे तीच प्रणाली सुरळीत करावी.

– वृषाली गांवकर, डहाणूकर महाविद्यालय

रेल्वेमध्ये नेहमी होणारा गोंधळ सोडविणे गरजेचे आहे. मात्र याचा अर्थ नवीन योजना आणू नये असा होत नाही. नवीन योजना आणताना जुन्या आणि महत्त्वाच्या दुरुस्त्या करणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांत नवीन सरकार बराच विकास करू शकला असता मात्र त्याचा निकाल सर्वसामान्यांना समाधानी करू शकला नाही. रेल्वे एसी लोकल आणणार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्याचे कौतुकच आहे, मात्र या योजना फक्त कागदोपत्री न राहता त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

– केदार केळकर, रुपारेल

शासन चांगले काम करीत आहेत असा डंका पिटवीत असताना मुंबईकरांची जीवन वाहिनी असलेल्या रेल्वेचा गोंधळ केव्हा बंद होणार? ओव्हरहेड व्हायर्स आणि सिग्नल ही नेहमीची कारणे रेल्वेकडून दिल्या जातात. मात्र देशाचा विकास करायचा म्हणताना सर्वात जास्त गरजेचे आणि लोकांकडून वापरल्या जाणाऱ्या प्रणालीच्या चुकांची कायमस्वरूपी दुरुस्ती केव्हा होणार? नागरिकांना यावर कायमस्वरूपी उपाय हवा आहे. अनेक स्थानकावरील तिकीट खिडक्या तर कायम बंद असतात. यामध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हायला हवी. एसी लोकलचे स्वप्न दाखविणारे रेल्वेमंत्रींनी मूलभूत बाबी प्रथम पूर्ण कराव्यात. मध्य रेल्वेच्या लोकल तर केव्हाच वेळेवर धावत नाहीत. वेळ देऊन रेल्वे सर्वसामान्यांची फसवणूक करीत आहेत. थकून येणाऱ्या नोकरदार वर्गाला एक तासाच्या प्रवासासाठी दोन तास लोकलमध्ये ताटकळत बसावे लागते. तर रेल्वेची स्वच्छता आणि पंखे आणि दिव्याची अवस्था हा तर दुर्लक्षित विषय आहे.

– मुकुंद पाबाळे, रुईया महाविद्यालय.

काही तांत्रिक कारणांमुळे ब्लॉग बेंचर्सहे सदर प्रसिद्ध होऊ शकले नाही.