आपल्या युवाशक्तीमुळे मोठमोठय़ा जागतिक कंपन्यांपासून ते विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांपर्यंत सर्वाचेच विशेष लक्ष भारताकडे आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रिया व विज्ञान तंत्रज्ञानातील सातत्याने होत असलेले बदल यामुळे उद्योगजगत आमूलाग्र बदलले असून नवी औद्योगिक क्रांतीच जगभर घडत आहे. अतिवेगवान, भव्यदिव्य कॉम्प्लेक्स तसेच मानवी जीवन व्यापणारे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जगभर व आपल्या देशातही साकारत आहेत. मात्र या नव्या उद्योगविश्वाला आवश्यकता आहे ती म्हणजे कुशल मनुष्यबळाची! विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे व योग्य प्रशिक्षण मिळत नसल्याने उद्योग व्यवसायांनाही त्यांना हवे तसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. यामुळेच सध्या आपल्या सरकारकडून युवावर्गाच्या दृष्टीने विविध योजना व कार्यक्रम राबवले जात आहेत. यात नुकत्याच घोषणा झालेल्या स्टार्टअप्स, मेक इन इंडिया या उपक्रमांबरोबरच गेल्या वर्षभरात राबवण्यात येत असलेल्या ‘स्किल इंडिया’ मोहिमेचाही समावेश करता येईल. यात बेरोजगार तसेच शिक्षण अर्धवट सोडलेल्या तरुणांना पारंपरिक अभ्यासक्रमांसह विशेष कौशल्याधारित शिक्षण देऊन नोकरी किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातो. आता तर देशातील सुमारे ७०० विद्यापीठे व ३५ हजार महाविद्यालयांनीही यात सहभागी व्हावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत. याला प्रतिसाद देत अनेक विद्यापीठे व महाविद्यालयांनी आपापल्या ठिकाणी कौशल्याधारित शिक्षणाचा अंतर्भाव करायला सुरुवात केली आहे. यासाठी काही ठिकाणी पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा वेगळे अभ्यासक्रम राबवायलाही सुरुवात झाली आहे. यातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन करत त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सहकार्य केले जात आहे. पूर्वी सुतारकाम, वेल्डिंग, शिवणकाम, नर्सिग यांसारखे नोकरी मिळवून देऊ शकणारी कौशल्ये काही विद्यापीठांमध्ये शिकवली जात होतीच; परंतु आता रीअल इस्टेट, बांधकाम, वाहतूक,  सौंदर्य प्रसाधन व्यवसाय, पर्यटन, बँकिंग, जैवतंत्रज्ञान, कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये उपयोगी पडणारे कौशल्याधारित शिक्षणही विद्यार्थ्यांना दिले जात आहे. यातून विविध भाषा व संवादकला यांपासून सकारात्मक विचार, व्यक्तिमत्त्व विकास, व्यवस्थापन अशा अनेक कौशल्यांसह देशातील तसेच जगभरातील उद्योग व्यवसायांना आवश्यक असणारे मनुष्यबळ निर्माण केले जात आहे. हे कौशल्याधारित अभ्यासक्रम शिकविण्याच्या पद्धतीही वेगळ्या आहेत. निरनिराळे खेळ, गटचर्चा, प्रात्यक्षिके, केस स्टडी अशा अभिनव पद्धतींद्वारे हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवले जातात. सध्या असे अभ्यासक्रम मुंबईमधील काही महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात आले असून विद्यार्थीही त्यात सहभागी होत आहेत. अशाच काही महाविद्यालयांमधील स्किल इंडियासाठी चाललेल्या प्रयत्नांचा आढावा..

रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
Sudden transfer of municipal officials has affected the pre-monsoon work
महापालिका अधिकाऱ्यांच्या अचानक बदलीमुळे पावसाळ्यापूर्वीच्या कामांना फटका

माटुंगा येथील रुईया महाविद्यालय हे कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळालेले मुंबईमधील पहिले महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये व व्यवसायाधिष्ठित अभ्यासक्रम शिकवण्यासाठी येथे ‘कौशल केंद्राची’ स्थापना करण्यात आली आहे. सध्या यात ग्रीन हाऊस व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र तसेच टुरिझमच्या अभ्यासक्रमांची आखणी करण्यात आली आहे. पूर्णवेळ असणाऱ्या या अभ्यासक्रमांमधून विद्यार्थ्यांना या क्षेत्रांमध्ये उपयोगी पडणारे अद्ययावत ज्ञान उपलब्ध करून दिले जाणार आहे. या अभ्यासक्रमांचे वैशिष्टय़ म्हणजे प्रवेशासाठी वयाचे कोणतेही बंधन ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडाव्या लागलेल्या तरुणांना, तसेच या क्षेत्रांमध्ये सध्या काम करत असलेल्यांनाही नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी कौशल केंद्राच्या अभ्यासक्रमांचा उपयोग होऊ शकतो. हे अभ्यासक्रम विद्यार्थी त्यांच्या सोयीने पूर्ण करू शकतात, कारण  अभ्यासक्रमाच्या कोणत्याही वर्षांतून एक्झिट घेऊन पुन्हा प्रवेश घेता येऊ शकतो. त्यामुळे एक वर्ष पूर्ण केल्यास पदविका, दुसऱ्या वर्षांसाठी विशेष पदविका, तर तीनही वष्रे पूर्ण करणाऱ्यास पदवी दिली जाणार आहे. यासाठी विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे अशी फ्लेक्झिबिलिटी असणारे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना नक्कीच आवडू शकतील. याशिवाय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळण्यासाठी तसेच त्यांना व्यवसाय उभा करण्यासाठी मार्गदर्शनही केले जाणार आहे. त्यासाठी कौशल केंद्राकडून विविध उद्योग व कंपन्यांचे सहकार्यही घेतले जाणार आहे.

वझे-केळकर महाविद्यालय, मुलुंड

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांच्या भविष्यातील नोकरी-व्यवसायासाठी आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करावी यासाठी वझे-केळकर महाविद्यालयात निरनिराळे अभ्यासक्रम व उपक्रम राबवले जात आहेत. सौंदर्य प्रसाधने व सुवासिके तयार करण्याचे प्रशिक्षण देणारे पदविका अभ्यासक्रम महाविद्यालयात गेल्या काही वर्षांपासून सुरू असून यात अनेक विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. तसेच येत्या काळात येथे ग्रीन हाऊस तंत्रज्ञान, प्लांट टिश्यू कल्चर, अल्गल जैवतंत्रज्ञान यांपासून ते टुरिझम, रिटेल मार्केटिंग यांसारखे अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहेत. सध्या या क्षेत्रांना असणारे महत्त्व लक्षात घेता महाविद्यालयाने इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनाही ही कौशल्ये व त्यातल्या पद्धती शिकवण्याचे ठरवले आहे. याशिवाय मोडी लिपी शिकवणारे वर्गही महाविद्यालयात दरवर्षी घेतले जातात. यातून मोडी लिपीतील जुनी कागदपत्रे वाचता येऊ शकणारे अनेक विद्यार्थी तयार झाले असून त्यांना यातून रोजगारही उपलब्ध होत आहेत. सध्या महाविद्यालयात व्यवसाय, भाषा व ई-लर्निगसाठी तीन विशेष प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. यातील व्यवसाय प्रयोगशाळेत वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाभिमुख कौशल्ये शिकवली जातात. यात बँकिंग क्षेत्रामध्ये उपयोगी पडणारी तसेच विद्यार्थ्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये व ज्ञान दिले जाते, तर भाषा प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विविध भाषा आत्मसात करता याव्यात यासाठी त्या भाषांमधील शब्दांचे उच्चार, लेखन, वाचन, व्याकरण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शिकवले जाते. तसेच ई-लर्निग प्रयोगशाळेत विद्यार्थी त्यांना हवे असलेले ज्ञान डिजिटल माध्यमातून मिळवू शकतात. यातून विद्यार्थ्यांना आपापल्या अभ्यासक्रमांमधील सध्याचे प्रवाह, होत असलेले प्रयोग, ते शिकण्याच्या विविध पद्धती यांची ओळख होत असते.

आचार्य-मराठे महाविद्यालय, चेंबूर

चेंबूर येथील आचार्य-मराठे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना करियरच्या चांगल्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी त्यांना विविध कौशल्ये शिकवून प्रशिक्षित केले जाते. सध्याच्या काळात  इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यास विद्यार्थ्यांना कोणत्याही ठिकाणी नोकरीमध्ये प्राधान्य दिले जाते. त्यामुळे इंग्रजी भाषेतून संवाद साधता येणे ही प्रत्येकाची गरज निर्माण झाली आहे. आचार्य-मराठे महाविद्यालयही आपल्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी संवादाचे कौशल्य आत्मसात करावे यासाठी ‘टीच इंडिया’ या उपक्रमातून  विशेष प्रयत्न करत आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या पाच तुकडय़ांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थी ‘फर्स्ट जनरेशन लर्नर’ असल्याने त्यांच्यासमोर नोकरीच्या चांगल्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी विविध कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. याचाच एक भाग म्हणून फॅशन डिझायिनगसारख्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून फॅशन क्षेत्रातील विविध बाबींचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते. तीन महिने कालावधीच्या या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे. आपला इतर अभ्यासक्रम पूर्ण करतानाच त्यांना हे अतिरिक्त कौशल्यही यामुळे प्राप्त होत आहे. याशिवाय ‘टेक्नोसव्‍‌र्ह’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय व नोकऱ्यांसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण दिले जाते.

यात महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जातो. तसेच गेल्या वर्षभरापासून टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षणावर आधारित प्रशिक्षणही दिले जाते. यात साठ तासांचा विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून आतापर्यंत सुमारे २५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. सध्याच्या उद्योग व्यवसायांसाठी आपले विद्यार्थी कुठेही कमी पडू नयेत यासाठी महाविद्यालयाकडून अशा प्रकारचे कौशल्य शिक्षणाचे उपक्रम राबवले जात आहेत.